महाराष्ट्रात काँग्रेसचा धुव्वा का उडाला? समस्या महायुतीसमोर जास्त होत्या...
By विजय दर्डा | Published: December 9, 2024 07:38 AM2024-12-09T07:38:07+5:302024-12-09T07:40:34+5:30
देशातील सर्वांत जुना पक्ष काँग्रेसला झाले आहे तरी काय? गांधी कुटुंब हे 'सामर्थ्य' असले तरी, काँग्रेसजनांना आपापली मशाल पुन्हा पेटवावी लागेल!
- डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथग्रहण समारंभाला मी उपस्थित होतो. प्रचंड गर्दीत उद्योग आणि चित्रपट जगतातील दिग्गज उपस्थित होते. 'लाडक्या बहिणी' आणि सामान्य लोकही पुष्कळ दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे तर उपस्थित होतेच; शिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक तथा महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, १९ राज्यांचे मुख्यमंत्री तसेच मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते. ही उपस्थिती एकता आणि संघटन क्षमतेचा संदेश देत होती हे निश्चित.
तेथून निघताना मनात विचारांची गर्दी झाली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना राज्यात मिळालेल्या उत्तम यशाने त्यांच्यात जास्तच आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळेच कदाचित, विधानसभेच्या निकालाआधी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे नेते हवेत होते. परंतु, निकाल लागताच पायाखालची जमीन सरकली. इतिहासात असे कधी झाले नव्हते. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. या जिल्ह्यांत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे हा पट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो; परंतु तेथेही धुव्वा उडाला. मराठवाडा आणि विदर्भात चमत्कार होईल असे काँग्रेसवाले छातीठोकपणे सांगत होते. पण तसे झाले नाही. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने गप्पांच्या ओघात मला सांगितले होते, 'विदर्भ, मराठवाड्याने हात दिला, तर आम्ही निश्चित सरकार स्थापन करू शकू.' आणि तसे झालेही.
काँग्रेस पक्षात संघटना अशी काही नव्हतीच. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पेटाऱ्यातील जादूसुद्धा गायब झाली. बडे काँग्रेस नेते धराशायी झाले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले कसेबसे वाचले. मग 'महायुतीचा विजय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमुळे झाला आहे' अशी कुरबुर सुरू झाली. 'ईव्हीएममध्ये छेडछाड शक्य आहे', असे म्हणून एलन मस्क यांनी आगीत तेल ओतले. अशा प्रकारे विजय मिळवता येतो किंवा कोणाला हरवता येते हे खरे तर सिद्ध करून दाखवता आले पाहिजे.' जम्मू-काश्मीर आम्हाला दिले आणि हरयाणा स्वतः मिळवले, झारखंड दिले आणि महाराष्ट्र ठेवून घेतला' , असेही बोलले गेले. 'ईव्हीएमची जादू चालती तर प्रियांका गांधी काही लाख मतांनी कशा जिंकल्या?' असा प्रश्न एका व्यक्तीने मला विचारला. त्यावर एका काँग्रेसी नेत्याचे उत्तर होते, 'आपण स्वच्छ आहोत हे दाखवण्यासाठी एवढे तर करावेच लागणार.'
काँग्रेसजन अशा प्रकारे विचार करत असतील तर सध्याच्या स्थितीतून ते कधीही बाहेर पडणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत चेन्नीथला यांचा प्रवेशही खूप उशिरा झाला. त्यांनी चांगल्या उमेदवारांना तिकिटे दिली. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे उत्तमच झाले. परंतु गावागावांत जर संघटनच शिल्लक राहिले नसेल तर एक माणूस काय करू शकतो? महायुतीच्या त्सुनामीतही यवतमाळमधून अनिल ऊर्फ बाळासाहेब मांगुळकर, नागपूरमधून विकास ठाकरे निवडून आले असले तरी संघटनेची ताकद असती तर त्यांचे मताधिक्क्य वाढले असते. जातीपातीच्या राजकारणानेही काँग्रेसचे मोठे नुकसान केले आहे.
समस्या महायुतीसमोर जास्त होत्या. सोयाबीन आणि कापसाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज होता. मराठा आंदोलन पेटलेले होते. परंतु हिंदुत्वाच्या लाटेत या सगळ्या गोष्टी वाहून गेल्या. व्होट जिहादमुळे आमच्यासाठी ही निवडणूक धर्मयुद्ध आहे असे भाजपने म्हटले. 'एक है तो सेफ है', 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणा दिल्या गेल्या. मुस्लीम आणि दलित एकत्र येऊ शकतात तर सगळे हिंदू का एक होणार नाहीत? हा मुद्दाही चालला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांच्या ९० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भाजपला निवडून आणण्यासाठी गावागावांत २२ हजारांपेक्षा जास्त बैठका घेतल्या. तरीही, इतका मोठा विजय होईल असे कोणालाही वाटले नव्हते. फक्त एका व्यक्तीला खात्री होती; तिचे नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस!' भाजप १३५ जागा जिंकेल' असे त्यांनी म्हटले आणि खरोखरच १३२ जागांवर विजय मिळाला. शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. अमितभाई शाह यांचे प्रखर राजकारण, देवेंद्रजींनी घेतलेले कष्ट, बावनकुळेंचे संघटन कौशल्य, एकनाथ शिंदे यांची दिलदारी आणि लाडकी बहीण योजना या गोष्टींना मी या विजयाचे श्रेय देईन. 'भविष्यातला नेता मी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा' हे पटवून देण्यात अजित पवारही यशस्वी झाले.
राज्यात आशा-अपेक्षांना नवे नाव मिळाले : देवाभाऊ. ते मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले आहेत. शिंदे आणि पवार यांच्या रूपात दोन शक्ती त्यांच्याबरोबर आहेत. देवेंद्रजींच्या पहिल्या कार्यकाळात समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो परियोजना आणि गावागावांत जलयुक्त शिवार या योजनांचा बोलबाला झाला. काही अपूर्ण कामे आता पूर्ण करावयाची आहेत. राज्यांचे मागासलेले भाग नव्या योजनांच्या प्रतीक्षेत आहेत. विदर्भाला ऑटोमोबाइल उद्योगांची अपेक्षा आहे. काँग्रेस नेत्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रत्येक गोष्टीसाठी गांधी परिवाराकडे पाहण्याचा उपयोग नाही. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या नावावर कुठवर काम चालेल? काँग्रेसचे ऊर्जा केंद्र गांधी कुटुंब आहे हे नक्की. पण काँग्रेसजनांना स्वतःचा असा प्रकाश पाडावाच लागेल. सशक्त लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्ष लागतो. यावेळी सदनात विरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेता नसेल. देवेंद्रजी म्हणाले, 'आम्ही बदल्याच्या भावनेतून नाही तर महाराष्ट्र बदलण्याच्या भावनेतून काम करू'। हे ऐकून दिलासा वाटला! देवेंद्रजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा.