- सचिन जवळकोटे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसे मूळचे फोटोग्राफर. त्यांच्या कॅमे-याला पंढरीची वारी तशी नवी नाही. चंद्रभागेलाही त्यांच्या हेलिकॉप्टरचं विशेष काही वाटत नाही. मात्र यंदाच्या ‘वारी’त त्यांची ‘सवारी’ सर्वाधिक ट्रेंड बनून गेली. त्यांची झटपट महापूजा चर्चेचा विषय होऊन गेली. ‘सीएम’च्या दौ-यात काय घडलं नेमकं त्या दिवशी? असं का घडलं नेमकं याच काळात ? तीन अंकी नाट्यातील अनेक गूढ प्रश्नांना बत्ती. होय...लगाव बत्ती...
अंक पहिला...
ठाकरे सरकार. होय.. खरोखरच ‘सिंहासनावरचं सरकार’. आजपावेतो केवळ ‘मातोश्री’वर बसून अख्ख्या महाराष्ट्राला हादरे देण्याची हातोटी त्यांना पूर्वजांकडून प्राप्त. कोणत्याही प्रश्नात भूमिका कणखर. वाणीही दमदार; मात्र काही शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शारीरिक तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिलेला. अशातच ‘कोरोना’च्या संकटकाळात तीन गोष्टींचं संरक्षण करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली. पहिलं जनतेचं राज्य. दुसरं आघाडीचं सरकार. तिसरं स्वत:चं आरोग्य. अशा परिस्थितीतही त्यांचा कारभार ‘फेसबुक लाईव्ह’वरून छानपैकी सुरू झालेला. यातच आषाढी एकादशी आली. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा जपण्यासाठी दौ-याची आखणी सुरू झाली. याच काळात पंढरपुरात ‘रेड झोन’ जाहीर करण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्या डॉक्टरांनी या दौ-याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांपर्यंत ‘सीएम् प्रोग्राम’ जाहीर होत नव्हता.
मात्र त्यांच्या नजीकच्या राजकीय सल्लागारांनी ‘पूजा न केल्यास किती चुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचेल,’ याची जाणीव करून दिली. मग काय.. डॉक्टरांचा सल्ला धुडकावून ‘सरकार’ पंढरीच्या दौ-यासाठी तयार झाले. यात पूजा वगळता बाकीच्या सर्व गोष्टींना फाटा देण्याचा निर्णय झाला. एकाही व्यक्तीला जवळ येऊ न देण्याच्या बोलीवर दौरा आखला गेला.
अंक दुसरा...
आतापर्यंतचे मुख्यमंत्री थेट हेलिकॉप्टरनं सोलापूरला यायचे. तिथून कारनं पंढरपूरला जायचे. ‘सीएम’ येणार म्हणून सोलापूर विमानतळावरही बंदोबस्ताची तयारी सुरू झाली; पण नंतर मेसेज आला की, ते थेट पंढरपूरला जाणार. मग तिथल्या हेलिपॅडची डागडुजी करण्याची यंत्रणा सरसावली; परंतु तिथंही नंतर समजलं की, ते थेट ‘बाय रोड’ येणार. सारेच गोंधळात पडले. एखादे ‘सीएम’ कधी मुंबईहून पंढरपूरला कारनं आल्याचं अलीकडच्या काळात तर ऐकण्यात आलं नव्हतं. सर्वात मोठा हादरा तर ‘रेस्ट हाऊस’वर बसला. हेलिकॉप्टरमध्ये पायलटच्या बाजूला बसावं लागतं म्हणून कारनं येणा-या या फॅमिलीनं गाडीमध्येही चालक सोबत घेतला नव्हता. जेव्हा स्वत: गाडी चालवत ते पंढरपुरात आले, तेव्हा अनेकांना कौतुकाश्चर्याचा धक्का बसला; पण ही तर सुरुवात होती. अजून ब-याच धक्कादायक गोष्टी पुढं घडणार होत्या, हे किती जणांना ठावूक होतं..?
दरवर्षी एकादशीच्या आदल्या रात्री पंढरीचं रेस्ट हाऊस कसं हाऊसफुल्ल असायचं. सीएमचे एकनिष्ठ आमदार मुख्य हॉलमध्ये. आमदारांचे प्रामाणिक कार्यकर्ते शेजारच्या खोलीत. कार्यकर्त्यांचे जवळचे चमचे बाहेर पोर्चमध्ये.. अन् चमच्यांचे चमचे फाटकाजवळ. यंदा मात्र एक दिवस अगोदरच अख्ख रेस्ट हाऊस रिकामं केलेलं. गळ्यात उपरणं घालून फिरणा-या जुन्या कार्यकर्त्यांपासून पंचवीस-तीस लाखांच्या लक्झरी गाडीत फिरणा-या नव्या पदाधिका-यांपर्यंत सारेच पंढरपूरच्या बाहेर. होय.. थेट बाहेर. आमदार बिमदार तर सोडाच, पालकमंत्रीही ‘भक्त निवास’कडेच. रेस्ट हाऊसमध्ये कुण्णीऽऽ म्हणजे कुण्णीऽऽही नाही...आतमध्ये फक्त ठाकरे फॅमिली.
ते जोपर्यंत इथं होते, तोपर्यंत स्वच्छतेसाठीही त्यांच्या सूटमध्ये स्थानिक कर्मचाºयाला नव्हती परवानगी. त्यांना सेवा देणारी मंडळी आली होती थेट मुंबईहून. विशेष म्हणजे त्यांच्या चहा-पाण्याची अन् जेवणाची तयारीही याच मंडळींनी केलेली. एकादशीचा उपवासाचा फराळ याच मुंबईकरांनी तयार केलेला. त्याचं साहित्यही तिकडूनच आलेलं. इथं होता फक्त विठ्ठल...बाकी सारा मुंबईचा प्रसाद.
अंक तिसरा...
स्थळ : विठ्ठल मंदिर. वेळ : मध्यरात्रीचीमंदिराच्या गाभा-यातही फक्त चौघांनाच प्रवेश. मुख्यमंत्री दाम्पत्य अन् त्यांचे दोन चिरंजीव. बाकी सारे बाहेरच्या सभा मंडपात. पूजेचा विधी सुरू असतानाच सोळखांबीतून उठून ‘आदित्य’ उर्फ छोटे सरकार मंदिराबाहेर आले. रस्त्यावर लावलेल्या स्वत:च्या गाडीत जाऊन त्यांनी पाण्याची बाटली बाहेर काढली. पाणी पिऊन काहीकाळ गाडीतच बसले; नंतर पुन्हा मंदिरात गेले. कुणी म्हटलं, ‘आतमध्ये श्वास घुसमटतो.’ कुणाला वाटलं, ‘इथलं पाणी त्यांना चालत नसावं.’
पूजाही केवळ सत्तर मिनिटात संपविण्याचा आदेश अगोदरच दिला होता. जिथं स्पर्श होईल, असा कोणताच विधी न करण्याचाही निर्णय अगोदरच घेतला गेला होता. त्यामुळं विठ्ठलाच्या पायावर पंचामृत सोडणं असो की देवाचा तुळशी हार गळ्यात टाकणं असो.. नो म्हणजे नो. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल की या दाम्पत्याच्या कपाळावर विठुरायाचा टिळाही का दिसला नाही ? असो.
विठ्ठलाच्या साक्षीनं वयस्कर वारकरी दाम्पत्याला लवून नमस्कार करणारा मुख्यमंत्री उभ्या महाराष्ट्रानं कदाचित पहिल्यांदाच पाहिला असावा. पूजेनंतर पहाटे ही फॅमिली मंदिराबाहेर पडली. थेट रेस्ट हाऊसवरच पोहोचली. सकाळी उपवासाचा फराळ करून पुन्हा स्वत: गाडी चालवत ते मुंबईकडं निघाले. हायवेला इंदापूरच्या फाट्यावर ‘देशपांडें’नी आपल्या हॉटेलात त्यांच्या फराळाचीही सोय केलेली. मात्र फॅमिली येणार असल्याची कुणकुण लागल्यामुळे काही कार्यकर्ते अगोदरच तिथं उभारलेले. त्यामुळं गर्दी झालेली.. मग काय, कारचा ताफा तस्साऽऽच स्पीडमध्ये पुढं निघून गेला.
जाता-जाता : सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे केवळ आपल्या कारमध्ये त्यांनी चालक घेतला नसला तरी त्यांच्या ताफ्यात पुढं-मागं होत्या जवळपास बारा ते पंधरा गाड्या. चाळीस ते पन्नास माणसं. अहोऽऽ शेवटी ते सरकार म्हणजे सरकार. ठाकरे सरकार. साºयाच गोष्टी कशा जगावेगळ्या. लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)