पॅलेस्टिनी जनतेच्या मुक्ततेसाठी लढत असल्याचा दावा करणाऱ्या हमास या अतिरेकी संघटनेने इस्रायलवर केलेल्या राॅकेट हल्ल्याला सोमवारी, दि. ७ ऑक्टोबरला वर्ष पूर्ण होईल आणि ही वर्षपूर्ती त्या टापूत रक्तपातानेच साजरी होत आहे. या युद्धात आता इराणने उडी घेतली आहे. मंगळवारी रात्री भारतीय वेळेनुसार साडेदहा-अकरा म्हणजे स्थानिक वेळेनुसार आठ-साडेआठच्या सुमारास इराणने तीनशेच्यावर क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली. त्या क्षेपणास्त्रांचा रोख लष्करी ठाणी, विमानतळे असला तरी त्यापैकी काही नागरी वस्त्यांवरही पडली. इस्रायलच्या एक कोटीवर नागरिकांनी दोन तास बंकर्समध्ये काढले. कारण, हवाई हल्ले रोखणारी इस्रायलची डोम यंत्रणा भेदण्यात क्षेपणास्त्रे काही प्रमाणात यशस्वी ठरली. हा डोम भेदण्यात असेच यश वर्षभरापूर्वी हमासच्या राॅकेट्सना मिळाले होते. लेबनाॅनवरील इस्रायलचे हल्ले हे नव्या संघर्षाचे व इराणच्या आक्रमकतेचे निमित्त आहे.
हिजबुल्लाह ही शिया मुस्लिमांची दहशतवादी संघटना लेबनाॅनच्या भूमीवरून इस्रायलला लक्ष्य बनवित असल्याने हमासनंतर इस्रायलने तिच्याकडे मोर्चा वळविला. एकाचवेळी हवाई व जमिनी हल्ले चढविले. गेल्या आठवड्यात हिजबुल्लाह संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा खात्मा केला. इस्रायली सैन्य आता लेबनाॅनमध्ये घुसले असून, हिजबुल्लाह दहशतवादी व त्यांच्या नेत्यांना आश्रय देणारी गावे लक्ष्य बनविली जात आहेत. दोन दिवसांत ४६ गावांतील नागरिकांना इतरत्र जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच इस्रायली लष्कराने दावा केला की, गाझा पट्टीतील हमासच्या समांतर सरकारचा प्रमुख रावी मुस्तहा आणि समेह अल सिराज व सामी ओदेह हे दोन कमांडर तीन महिन्यांपूर्वी मारले गेले आहेत. थोडक्यात, इस्रायलसाठी त्रासदायक ठरणाऱ्या अतिरेकी, दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना एकेक करून टिपण्यात येत आहे. अशारीतीने मध्य-पूर्वेत मोठ्या युद्धाला तोंड फुटले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू एकमेकांना धमक्या देत आहेत. अमेरिकेचेही इराणला इशारे सुरू आहेत. भूमध्य सागराच्या पूर्व किनाऱ्यावरील लेबनाॅन, त्याच्या दक्षिणेकडे इस्रायल, त्यापुढच्या खोबणीत पॅलेस्टाईनची गाझा पट्टी या किनारी देशांच्या पूर्वेकडे सिरिया, इराक व नंतर इराण असा पश्चिम आशियाचा सगळा टापू सध्या धगधगतो आहे. त्याच्या झळा युरोप, अमेरिकेपासून भारतापर्यंत जगातल्या अन्य देशांना बसत आहेत. हा सगळा तेलउत्पादक टापू असल्यामुळे जगभरातील इंधनाच्या किमती भडकण्याची भीती आहे.
भारतासारख्या तेलासाठी आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशात तर ही मध्य पूर्वेतील युद्धाची झळ थेट सामान्य नागरिकांना बसणार आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईनंतर तसेही जग युद्धाचे दुष्परिणाम भोगत आहेच. युक्रेन हा प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादक देश आहे. तसेच खतनिर्मितीसाठीही अनेक देश युक्रेनवर अवलंबून आहेत. अशावेळी जगाच्या नकाशावर युक्रेनपासून जवळ असलेला आणखी एका भाैगोलिक टापूमध्ये युद्ध पेटल्यास अख्खे जगच त्यात ओढले जाऊ शकते. युक्रेनवरील रशियाचे आक्रमण असो की आता इस्रायल-हमास संघर्षाला इराणने दिलेले अधिक घातक वळण असो, प्रत्येकवेळी ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरणार का अशी विचारणा होतेच होते. या दोन्ही संघर्षावेळी पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्या महाशक्ती जुन्याच आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. युक्रेनच्या पाठीशी उभी राहणारी नाटो संघटना किंवा अमेरिका आणि रशियाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे चीन, उत्तर कोरिया यांसारखे देशच इराण-इस्रायल संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इस्रायलच्या पाठीशी अमेरिका खंबीरपणे उभी आहे व भविष्यातही राहणार हे माहिती असतानाही इराणने शेकडो क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागण्याचे धारिष्ट्य दाखविले. कारण, इराणला रशिया, चीनचे पाठबळ आहे.
अमेरिका, रशिया, चीन या महाशक्ती अशी सूत्रे केवळ एखादा देश, एखादी संघटना नेस्तनाबूत करण्यासाठी हलवितात असे नाही. त्या हालचाली, डावपेचांमागे शस्त्रास्त्रांचा व्यापार व इतर आर्थिक हितसंबंध असतात. अर्थात, पूर्ण ताकदीचे युद्ध किंवा महायुद्ध जगात कोणालाच नको आहे. सामरिक किंवा आर्थिक हेतू साध्य झाले की, शांततेेची भाषा सुरू केली जाते. यात राजकीय हेतुदेखील साधले जातात. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलचे अल्पमतातील पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची खुर्ची बळकट झाली, तर इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत उमटत आहेत. हे पाहून प्रश्न पडतो की, असे पडसाद हा युद्धाचा परिणाम आहे की पडद्यामागील खरे कारण?