डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
वायनाडव्यतिरिक्त राहुल गांधी आणखी कोठून निवडणूक लढवतील याची अखंड चर्चा या निवडणुकीत झाली. चर्चा अमेठीविषयीही होतीच. १५ वर्षे खासदार राहिल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राहुल यांना अमेठीत पराभवाचा सामना करावा लागला होता. अमेठीशी गांधी परिवाराचे जुने नाते आहे. संजय गांधी १९८० मध्ये अमेठीतून निवडून आले. त्यानंतर तीन वेळा राजीव गांधी, एकदा सोनिया गांधी आणि तीन वेळा राहुल गांधी यांना या मतदारसंघाने लोकसभेत पाठवले. परंतु, यावेळी राहुल गांधी अमेठीतून का उभे राहिले नाहीत? ‘हा मतदारसंघ तुमच्यासाठी सुरक्षित नाही?’ असे त्यांच्या हितचिंतकांनी सांगितले असेल का? माझ्या मते त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवायला हवी होती. यावेळी निवडूनही आले असते.
काँग्रेसने गांधी कुटुंबाचे निकटवर्ती किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून मैदानात उतरवले आहे. प्रियांका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील असा अंदाज होता, पण आपण किशोरीलाल शर्मा यांचा जोरदार प्रचार करू, असे त्या म्हणतात. प्रियांका खुद्द मैदानात असत्या तर विजयाची शक्यता नक्कीच बळकट झाली असती. त्या निवडणूक लढवत नाहीत आणि राहुल यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गांधी-नेहरू कुटुंबाची पाळेमुळे रायबरेलीत जास्त जुनी आणि खोलवर गेलेली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत फिरोज गांधी रायबरेलीतूनच संसदेत पोहोचले होते. इंदिरा गांधी तीनवेळा येथून निवडणूक जिंकल्या. सोनिया गांधींनी २००४ पासून सलग चार वेळा रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले. रायबरेलीत राहुल गांधी यांनी गाजावाजा करत उमेदवारी अर्ज भरला.
भाजपचे एक महोदय उपहासाने मला म्हणाले, ‘राहुल गांधी तर म्हणत होते ईडीने काँग्रेसचे बॅंक खाते सील केले आहे; आणि त्यांच्याकडे रेल्वेचे तिकीट घ्यायलासुद्धा पैसे नाहीत. मग ते स्वतः विमानातून कसे आले?’ - त्या विमानात अशोक गहलोत आणि केसी वेणुगोपालही होते. दुसऱ्या विमानातून सोनिया गांधी, प्रियांका, रॉबर्ट वड्रा आणि तिसऱ्या विमानातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही रायबरेलीत आले. किशोरीलाल शर्मा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यांच्यापैकी कोणीही अमेठीमध्ये गेले नव्हते, हे भाजपच्या ‘त्या’ महोदयांनी मला ऐकवलेच!- ते कसली संधी सोडतात? पुढे जाऊन भाजपने तर असाही दावा करून टाकला की राहुल गांधी घाबरून वायनाडमधून पळाले. ‘आमच्या तगड्या उमेदवारासमोर राहुल गांधी यांचे निवडून येणे कठीण आहे’, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले असले, तरी राहुल यांच्या तिथल्या विजयाची शक्यता बळकट आहे!
- समजा, राहुल गांधी दोन्ही जागांवर निवडणूक जिंकले तर ते कोणती जागा ठेवतील? माझ्या मते, कुटुंबाची परंपरागत जागा म्हणून रायबरेलीला ते प्राधान्य देतील. उत्तर प्रदेशावर कब्जा होत नाही तोपर्यंत देशावर राज्य करण्याचा विचार करणेही अशक्य होय, हे ते जाणतात.राहुल गांधी भले काँग्रेसचे अध्यक्ष नसोत, पण त्यांच्याशिवाय काँग्रेसचे पान हलत नाही आणि दुसरीकडे भाजपचेही त्यांच्यावाचून अडतेच! पंतप्रधानांपासून प्रत्येक मोठ्या नेत्याचे भाषण राहुल गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांना ‘पप्पू’ ठरवण्याचे प्रयत्न झालेच! मी म्हणतो, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी इतकी अयोग्य असेल तर पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचे नाव का घेता? परंतु, राहुल गांधी यांच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. देशाच्या निर्माणात गांधी कुटुंबाचे योगदान आणि त्या कुटुंबाने केलेले प्राणार्पण कसे विसरता येईल? लालकृष्ण अडवाणी एकदा मला म्हणाले होते, ‘काँग्रेसला आमचा राजकीय विरोध आहे. परंतु, ते आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही!’
हल्ली अनेक लोक राहुल गांधींच्या वेशभूषेवरही टिप्पणी करतात. राजीव गांधी अतिशय आधुनिक होते; परंतु राजकारणात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या खादीचा स्वीकार केला, सोनियाही साडी नेसायला लागल्या. परंतु, राहुल अल्ट्रा मॉडर्न आहेत. ते तरुण वेशभूषेत असतात. खरेतर, राजकारणात पोशाखाला खूप महत्त्व असते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, मिलिंद देवरा, टी पी सिन्हा यांच्यासारखे त्यांचे निकटचे मित्र त्यांची साथ सोडून गेले. हे लोक राहुल गांधी यांच्या स्वभावामुळे दूर गेले की त्यांना आपले भविष्य असुरक्षित वाटू लागले होते म्हणून? राहुल यांच्या आजूबाजूला जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत त्यांची घुसमट होत होती का? बरेच लोक काँग्रेस सोडून गेले. सोनिया गांधींना प्रकृती त्रास देते आहे. तरीही चिकाटीने लढणाऱ्या राहुल आणि प्रियांका यांचा सामना भाजपशी आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘चमत्कारी’ नेतृत्वाने या पक्षाला शिखरावर नेऊन ठेवले आहे. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे राजकारणाचे धुरंधर खेळाडू मोदींबरोबर आहेत. काँग्रेसच्या भात्यातून एखादा बाण निघण्याचा अवकाश, भाजपचा बाण निशाण्यावर लागलेलाही असतो. या लढाईत यशस्वी होण्यासाठी राहुल गांधी यांच्याजवळ हिंमत आहे, परंतु सशक्त सेना नाही. पक्षाची नव्याने बांधणी होत नाही, तोवर अशी सेना उभी राहू शकत नाही. या पक्षाचे उमेदवार व्यक्तिगत गुणवत्तेवर निवडून येतात. काँग्रेस पक्षाला बलशाली बनवण्याचे आव्हान पेलणे तूर्तास अजिबात सोपे नाही.