- श्रीमंत माने( कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)
देशभर, जगभर पर्यावरणरक्षणाच्या, ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्याच्या कोरड्या गप्पा अन् वृक्षलागवडीचे झगमगीत उत्सव सुरू असताना राजस्थानातील बाप गावात नवे कृतिशील पाऊल उचलले जात आहे. नवा संघर्ष उभा राहतो आहे. बाप नावाचे हे गाव भारत-पाक सीमेवरील जोधपूर जिल्ह्यात बडी सीड पंचायत समितीत येते. जिल्हा मुख्यालयाच्या वायव्येला व बिकानेरच्या नैऋत्येला. अणुस्फोटामुळे नेहमी ओठावर येणाऱ्या थरच्या वाळवंटातील पोखरणपासून ७५ किलोमीटरवर अंतरावरील बाप येथे बुधवारी बिष्णोई समाज एकत्र आला. अखिल भारतीय जीवनरक्षा बिष्णोई सभेने मेळावा बोलावला होता. त्या वालुकामय परिसरात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प राजस्थानातल्या अशोक गहलोत सरकारने हाती घेतला आहे अन् कंपन्या बहुउपयोगी खेजडी झाडांची कत्तल करताहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. झाडे तोडली गेल्यामुळे त्यांच्या आश्रयाने बागडणारी हरणं दिसेनाशी झाली आहेत, हादेखील गावकऱ्यांचा वहीम आहे. कंपन्या व त्यांच्या तालावर नाचणारे प्रशासन ते मान्य करायला तयार नव्हते. तेव्हा, गावकऱ्यांनी खोदकाम केले व तोडून पुरलेल्या झाडांचे अवशेष, खेजडीचे मोठमोठे बुंधे बाहेर आले. लोक संतापले. बिष्णोई समाजाने खेजडी बचाव आंदोलनाची हाक दिली आहे. निदर्शने झाली. महंत भगवानदास यांच्या नेतृत्वात बिष्णोई समाज उभा आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आठ हजारांहून अधिक खेजडी वृक्षांची कत्तल केल्याचा आरोप आहे.
हे खेजडीचे झाड म्हणजे वाळवंटी राजस्थानचा कल्पवृक्ष. त्याला राजवृक्षाचा दर्जा आहे. आपल्याकडच्या तुळशीसारखी पूजा राजस्थानी लोक खेजडीची करतात. आपल्याकडील खैर, बाभूळ यांच्यासारखे अवर्षण प्रवण भागात, अत्यल्प पावसाच्या प्रदेशात तग धरून राहणारे हे झुडूप अगदी ज्येष्ठाच्या रणरणत्या उन्हातही हिरवेगार राहते. त्याचा चारा जनावरांची भूक भागवतो. त्याला लुंग म्हणतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भयंकर दुष्काळात लाखो लोक खेजडीच्या झाडाची साल खाऊन जगले. खेजडीचे उपकार समाज अजूनही विसरलेला नाही. खेजडीच्या फुलांना मींझर म्हणतात अन् त्याची महती इतकी की कन्हैयालाल सेतिया यांची मींझर नावाची कविता राजस्थानच्या लाेकसंस्कृतीचे वर्णन करणाऱ्या लेखनकृतीचे अविभाज्य अंग मानले जाते. १९८८ साली केंद्र सरकारने खेजडीवर टपाल तिकीटही काढले.
बिष्णोई समाजाच्या पशुपक्षी, वृक्षवेली व पर्यावरणावरील प्रेमाच्या शतकानुशतकांच्या संघर्षाचा खेजडी हा जणू प्रारंभबिंदू आहे. समाजाचे आद्यपुरुष जांभोजी महाराजांची ‘सिर कटे रुख बचे, तो भी सस्ता जान’ ही शिकवण समाज केवळ सुभाषितांसारखा फक्त बाेलत नाही, तर प्राणपणाने जगतो. अठराव्या शतकात, ११ सप्टेंबर १७३० ला अमृतादेवी बिष्णोई यांच्या नेतृत्वात बिष्णोई समाजाच्या बायाबापड्या खेजडीची कत्तल रोखण्यासाठी वृक्षांना मिठ्या मारून उभ्या राहिल्या. मारवाडच्या राजाचा राजमहाल बांधण्यासाठी खेजडी वृक्ष तोडून लाकूड नेले जात होते. त्याविरोधात मानवी झाडे निकराने उभी राहिली आणि जोधपूरजवळच्या खेजडली गावात राजाच्या सैनिकांनी अमृतादेवी बिष्णोई यांच्यासह ३६३ बिष्णोईंची अमानुष कत्तल केली.
पर्यावरणासाठी हे हौतात्म्य जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले. विसाव्या शतकातील हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनाला प्रेरणा या इतिहासाचीच. काळवीट शिकार प्रकरणात सगळी व्यवस्था सलमान खानला शरण गेली असताना, आपले सर्वस्व पणाला लावून मुक्या प्राण्यांच्या बाजूने बिष्णोई समाजच उभा राहिला. आता पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ज्याचे नाव समोर आले, त्या लॉरेन्स बिष्णोईने सलमानला पहिली धमकी काळवीट शिकार प्रकरणात दिल्याचे मानले जाते. योगायोगाने काळवीट शिकार प्रकरण घडले ते काकानी गावही जोधपूर जिल्ह्याच्या लुनी तालुक्यातलेच.
आता महत्त्वाचे- खेजडी म्हणजे आपल्याकडे दसऱ्याला सोने म्हणून ज्याची पाने लुटतात ते आपटा किंवा शमी. खेजडी व शमीशिवाय देशात विविध प्रदेशांमध्ये त्याला खिजरो, झंड, जाट, खार, कांडा, जम्मी अशी नावे आहेत. शमीचे झाड, प्रभू रामचंद्राने त्या झाडावरची शस्त्रे दसऱ्याच्या मुहूर्तावर उचलून रावणाविरुद्ध लढलेली व जिंकलेली लढाई हे रामायणातील वृक्षमहात्म्य नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याच शमीवृक्षाच्या कत्तलीविरुद्ध बिष्णोई समाजाने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.shrimant.mane@lokmat.com