श्रीमंत माने
जवळपास पस्तीस हजार लोकांचे जीव घेणाऱ्या तुर्की व सिरियातल्या विनाशकारी भूकंपानंतर एक नेहमीची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक किंवा सरपटणाऱ्या जीवांना भूकंपाची आगाऊ कल्पना मिळते का? भूकंपाआधी ते अस्वस्थ का होतात, हालचाली का वाढतात, विचित्र का वागतात? झाडांच्या फांद्यांवर मुंग्यांची लगबग रात्री अधिक का होते? ४ फेब्रुवारी १९७५ ला चीनच्या हाईचेंगमध्ये घडले व अमेरिकेतील एमआयटीने १९७६ साली ज्याचा सविस्तर अहवाल दिला होता तसे हजारो साप बिळाबाहेर का पडतात? वन्यप्राणी गुहा का सोडतात? आता सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये दिसले तसे सूर्योदयापूर्वी पक्ष्यांचा कर्णकर्कश कलकलाट का होतो? घरटी साेडून ते आकाशात का भिरभिरतात? भूकंप होणाऱ्या शहराच्या निर्मनुष्य चौकात कुत्री विचित्र आवाजात का रडतात? गोठ्यात बांधलेल्या गाई खुंट्याला हिसके का देतात ? बेडूक तळ्याबाहेर उड्या का मारतात? - या प्रश्नांच्या उत्तरात कुणी भाबडेपणाने म्हणेलही की प्राणी-पक्ष्यांमध्ये काहीतरी अतिंद्रीय शक्ती असते, निसर्गाचा कोप त्यांना आधी कळतो... पण तसे ठोसपणे मानावे अशी स्थिती नाही.
पृथ्वीच्या भूगर्भात सतत हालचाली सुरू असतात. भूकंप येतात, कधी कधी ते त्सुनामी बनतात. ज्वालामुखीचे उद्रेक होतात. अशा आपत्तीत जीवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रयत्न होतात. चीन किंवा जपानसारखे भूकंपप्रवण देश विज्ञानाची मदत घेऊन धरणीकंपाची आगाऊ सूचना देणारी व्यवस्था विकसित करतात. तिचा फायदाही होतो. यासोबतच प्राणी, पक्ष्यांना कथितरित्या मिळणाऱ्या आगाऊ सूचनांचा अभ्यास करून अधिक बिनचूक अंदाज वर्तविण्याचे, माणसांचे जीव वाचविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत असा सर्वांत जुना अभ्यास इसवी सनापूर्वी ३७३ साली ग्रीसमध्ये झाला होता. ॲरिस्टॉटल व अलेक्झांडर वॉन हंबोल्ट यांच्यातील या विषयावरील वैज्ञानिक चर्चा प्रसिद्ध आहे. अलीकडे, १९७५ च्या चीनमधील हाईचेंग भूकंपानंतर, २०१३ साली जर्मनीत, २०१८ मध्ये अमेरिकेत झालेल्या भूकंपानंतर काही निरीक्षणे नोंदविली गेली. तथापि, या अभ्यासातून खात्रीलायक अनुमान निघालेले नाहीत. जर्मनीतील मॅक्स प्लान्क इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल बिहेव्हीअर आणि कोनस्टान्झ विद्यापीठाने २०१६ व २०१७ दरम्यान उत्तर इटलीमधील तीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात सहा गाई, पाच मेंढ्या व दोन कुत्र्यांना ॲक्सेलेरोमीटरयुक्त कॉलर लावून थोडा व्यापक व नेमका अभ्यास केला. जर्मन एअरोस्पेस सेंटर, रशियन स्पेस एजन्सी रॉस्कॉसमॉस, युरोपियन स्पेस एजन्सीचीही त्यासाठी मदत घेतली गेली. जुलै २०२० मध्ये या अभ्यासाचे प्रमुख मार्टिन विकेलस्की यांनी निष्कर्ष जाहीर केले. त्या अभ्यासात असे आढळले, की चार महिन्यांत त्या भागात अठरा हजार धक्के नोंदले गेले. त्यापैकी बारा भूकंप ४ किंवा त्यापेक्षा अधिक रिश्टर स्केलचे होते. जेव्हा जेव्हा भूकंपाचे धक्के बसले तेव्हा या प्राण्यांची वर्तणूक बदलली. भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या जितके जास्त जवळ; तितकी त्या प्राण्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. मुख्य संगणकावर दर तीन मिनिटाला त्यांच्या हालचाली नोंदल्या गेल्या. विचित्र वाटाव्यात अशा हालचाली सलग ४५ मिनिटे नोंदविल्या गेल्या तर तो भूकंपाचा इशारा मानला गेला. भूगर्भातील प्रस्तर एकमेकांवर आदळल्यानंतर निघणाऱ्या वायूंच्या आयोनायझेशनची संवेदना प्राण्यांना होत असावी. एकंदरीत हे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी अंतिम निष्कर्ष निघाला नाही. अभ्यासकांनी म्हटले, आणखी मोठ्या संख्येने प्राण्यांचा, जगाच्या अन्य भागातही अभ्यास आवश्यक आहे.
या पृष्ठभूमीवर, चीनने वेनचुआनच्या विनाशकारी भूकंपानंतर विकसित केलेली अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम अधिक वैज्ञानिक व तूर्त तरी विश्वासार्ह आहे. त्यासाठी कमी क्षमतेचे भूकंप व प्राण्यांच्या हालचालीचा अभ्यास करण्यात आला. किंक्यू जिशीन सोकुनो म्हणून ओळखली जाणारी अशीच व्यवस्था जपानने ऑक्टोबर २००७ मध्ये आणली. तिची अडचण एवढीच आहे की जीव वाचविण्यासाठी खुल्या मैदानात जाण्यासाठी लोकांना अवघे काही सेकंदच मिळतात. ... चिंतेची बाब म्हणजे या सगळ्या व्यवस्था मोठ्या भूकंपाचा इशारा देण्यासाठी मात्र अद्यापही कुचकामी आहेत. मोठे भूकंप अचानकच येतात व ते हजारो बळी घेतात.
(लेखक लोकमत नागपूर आवृत्तीमध्ये कार्यकारी संपादक, आहेत)