-डॉ. श्रीकांत कामतकर (निवृत्त वैद्यकीय अधिकारी, सोलापूर)
औषधांचा अतिवापर व गैरवापर करण्याच्या यादीत भारत वरच्या स्थानावर आहे, हे नुकतेच एका पाहणीत सिद्ध झाले आहे. औषधांच्या गैरवापराचे वेगवेगळे प्रकार शोधले, तर पुष्कळ आहेत. लिहून दिलेली औषधे कमी किंवा जास्त कालावधीसाठी घेणे, कमी किंवा जास्त प्रमाणात घेणे, घेण्याची वारंवारिता विसरणे किंवा विसरण्याचे नाटक करणे, वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषध घेणे, दुसऱ्याच्या सल्ल्याने तिसऱ्याने औषध घेणे, आजार व्हायच्या आधीच भीती बाळगून औषध घेणे, औषधांविषयी स्ट्रॉंग - साधे - भारी- त्रासदायक-एकदम सेफ असे पूर्वग्रह बाळगणे. एकदा गुण आला की तीच लक्षणे वाटली म्हणून परस्पर पुन्हा औषधे वापरणे, मुदत संपलेली औषधे वापरणे... या यादीत डॉक्टर्स, केमिस्ट आणि रुग्णसुद्धा भर टाकू शकतील.
रुग्ण म्हणून डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी पूर्ण चिकित्सा करून औषध चिठ्ठीवर ‘पुढील तीन महिने जीवनशैलीत बदल’ असे लिहून दिले, तर ‘इतक्या (सामान्य) सल्ल्यासाठी एवढी फी का?’ असा प्रश्न रुग्णाच्या मनात येणार. त्याऐवजी बाजारातली नवीन महागडी, लगेच न मिळणारी औषधे (यात, मर्द बनवणारी टॉनिक्स, लगेच जादू करणारी वगैरे) लिहून दिली की डॉक्टर एकदम भारी वाटतो. औषधाच्या निर्मितीपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत असे अनेक घटक औषधाच्या गैरवापरासाठी, अतिवापरासाठी कारणीभूत असतात. जागतिक स्तरावर औषधनिर्मिती, वितरणाचे अवाढव्य औद्योगिक साम्राज्य आहे. त्यात संशोधन, स्वामित्व हक्क कायद्यातील पळवाटा, आर्थिक उलाढाली आणि त्यामागील स्थानिक ते आंतरराष्ट्रीय, राजकीय, औद्योगिक धोरणकर्त्यांचे हस्तक्षेप असे सारे घटक आहेत.
स्थानिक औषध दुकानदार, औषध लिहून देणारे डॉक्टर्स आणि वापरणारे रुग्ण किंवा आम जनता हे सारेच आपापल्या परीने औषधांच्या गैरवापर आणि अतिवापराला कारणीभूत असतात. औषधांच्या गैरवापरात जाहिरातबाजीचा मोठा वाटा आहे. औषधांच्या जादुई झटपट परिणामांची जाहिरात आपल्या मनाचा ठाव घेते. मग आपण ती औषधे (उगीचच) घेत राहतो. सौंदर्य संवर्धक, सेक्स टॉनिक्स, बारीक- जाड, उंच होण्याची आणि मूल होण्याची हमी देणारी औषधे या खेळात अग्रभागी असतात. रस्त्यावरच्या तंबूत जडीबुटी देणाऱ्या वैदूपासून आंतरराष्ट्रीय कंपनीपर्यंत सगळेच जण यात पारंगत आहेत.
जीवरक्षक, अत्यावश्यक आणि पूरक अशी ढोबळ वर्गवारी केली, तर अत्यावश्यक आणि पूरक औषधांचा सर्वांत जास्त गैरवापर, अतिवापर होताना आढळतो. अगदी जीवरक्षक ऑक्सिजनसारख्या औषधांचा गैरवापर कोविड लाटेत आपण पाहिला. गैरवापर अतिवापराचे मुख्य कारण आर्थिक असते. स्वतः मनाने औषधे कमी खर्चात घ्यायची किंवा खर्चाचा परतावा मिळतो म्हणून (गरज नसतानाही का सोडायची) असा विचार करत रुग्णही या गैरवापराचे कारण बनतात. ऐपत नसलेले रुग्णही अत्यावश्यक औषधे सोडून पूरक औषधांवर जास्त खर्च करतात, असे निरीक्षण आहे. यावर उपाय काय? पहिले म्हणजे उपचार शास्त्र हे संयमाने, सारासार विचार करून हाताळणे हा वैद्यकीय शिक्षणाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.
- इंजेक्शन द्या, सलाईन लावा, भारी औषधे चालू करा असे स्वयंघोषित तर्कशास्त्र रुग्णांनी लढवू नये. आपल्या औषध लेखन चिठ्ठीचे लेखापरीक्षण स्वतः करण्याची सवय डॉक्टरांना लागली पाहिजे. औषध चिठ्ठीवर किकबॅकच्या मिळकतीची सावली त्यावर पडू नये, अशी डॉक्टरांकडून अपेक्षा करताना रुग्णानेही परस्पर औषधे घेणे, मनाने औषधांचे डोस कमी-जास्त करणे, आठवडाभरासाठी लिहून दिलेली प्रतिजैविके, स्टेराॅइड्सारखी औषधे महिनोन्महिने घेऊ नयेत.
डॉक्टर, रुग्णांचा परस्पर विश्वास आणि आश्वासक संवाद दृढ होणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी वेळ दिला पाहिजे आणि रुग्णाने डॉक्टरांच्या वेळेची कदर आणि किंमत जाणली पाहिजे. “जा तुला कुठल्याही औषधाची गरज नाही”, असे निशंक मनाने सांगणाऱ्या डॉक्टरविषयी रुग्णांच्या मनातही कुठलीच शंका असता कामा नये. उपचार करणारा विश्वासपात्र व उपचार घेणारा विश्वास ठेवणारा असला, तर औषधांचा गैरवापर, अतिवापर नक्कीच कमी होईल.