कोविड-१९च्या संसर्गाविरोधात अवघी मानवजात झुंज देत असताना यंदाचा सूक्ष्मजीव जागृती सप्ताह (अँटि मायक्रोबायल अवेअरनेस वीक) आलेला आहे. जग या सूक्ष्मजीवांना गांभीर्याने घेऊ लागल्याचे संकेत यातून मिळतात. आपली सिद्धता नसेल तर महामारी किती भयंकर स्वरूप धारण करू शकते याचा अंदाज जगाला एव्हाना आलेला असेलच. त्या पार्श्वभूमीवर आपण भविष्यात कसे व किती सजग राहायला हवे, याची आठवण राहावी म्हणून हा सप्ताह आपल्याला साजरा करायचा आहे. सूक्ष्मजीवविरोधी प्रतिकार (एएमआर) गेली अनेक वर्षे अपमृत्यूंचे कारण ठरत आला आहे. भविष्यातही तो विघातकच राहील. अत्यंत शिताफीने तो माणसे मारत असतो. त्यामुळे समाज त्याच्या प्रादुर्भावाविषयी तसा गाफीलच असतो. एकंदर नुकसान आपल्या लक्षात येईपर्यंत तिची व्याप्ती भयावहरीत्या वाढलेली असते.
एका अंदाजानुसार औषधोपचारांना न जुमानणारा सूक्ष्मजीव संसर्ग वर्षाकाठी जगभरात सात लाख मृत्यूंचे कारण ठरतो आहे. त्यावर जर उपाययोजना केली नाही तर २०५० पर्यंत या मृत्यूंचे प्रमाण १ कोेटी होऊ शकते. याचाच अर्थ आताच आपण सावधगिरी बाळगली नाही तर २०५० साली दिवसाकाठी २७,४०० किंवा तासी ११४० माणसे संसर्गापायी दगावल्याचे आपल्याला पाहावे लागेल. आज कोविड-१९ जे नुकसान करतो आहे त्याहून ती हानी भयावह असेल. आपण भारतीयांनी अधिक सावधगिरी का बाळगायला हवी, हे यावरून कळावे. वर दिलेली आकडेवारी जरी अंदाजावर बेतलेली असली तरी हा संसर्ग किती विध्वंसक होऊ शकतो याचे भान देण्यास पुरेशी आहे. आपल्याकडे परिणामकारक प्रतिजैविके नसतील तर सूक्ष्मजीवांपासून होणारा संसर्ग काय हाहाकार माजवू शकेल याची कल्पना आपण करू शकतो. अर्थात, आपण पूर्णपणे गाफीलही नाही आहोत. आपण नेमके कुठे आहोत, सजगतेतून आपण कोणती कृती आचरली आहे याचा वेध घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिजैविकांविना अन्नाच्या उत्पादकतेविषयीही फार शंका आहेत. खाद्यान्नाच्या तुटवड्यावर वाढीव उत्पादन हाच तोडगा असल्याची धारणा अजूनही आहे. प्रतिजैविकांच्या मदतीशिवाय उत्पादन घेतले जाऊ शकते याची खात्री अद्यापही पटलेली नाही. त्यामुळे जे चालत आले, त्याचेच अंधानुकरण होते, अगदी त्या प्रक्रिया पर्यावरणस्नेही नसल्याचे ज्ञात असूनही! प्रतिजैविकांविना खाद्यान्ननिर्मिती वा पशुपैदासीची उपयुक्तता सिद्धच होत नाही. त्यासाठीचे पर्याय विचारात घेतले जात नाहीत. शेतकरी आजही उत्पादनवाढीसाठीची रसायने वापरतात, देशांची सरकारे प्रतिजैविकांचा पुरस्कार करतात व अशी प्रतिजैविके खुल्या बाजारात विनासायास उपलब्धही होतात. पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष हाही एक महत्त्वाचा अडथळा आहे. वैश्विक पातळीवर संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणीय कार्यक्रमाला सामावून घेतल्याचे भासवले जात असले तरी त्याची परिणामकारकता अद्यापही स्पष्ट नाही. सांडपदार्थ आणि पर्यावरणातून उद्भवणाऱ्या एएमआरवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शनही उपलब्ध नाही. कारखाने, शेती, आरोग्य सुविधा आणि निवासी प्रकल्प अशा विविध स्रोतांतून येणाऱ्या सांडपदार्थांची कशी विल्हेवाट लावायची, याची माहिती उपलब्ध नाही.
कोरोनाच्या निमित्ताने एकूणच जागरूकता वाढलेली असली तरीही पर्यावरण क्षेत्रातले कार्यकर्ते वगळता सार्वजनिक स्तरावर जीवाणूंच्या प्रतिकाराबाबत अजूनही पुरेशी जागृती झालेली नाही. मानवी आरोग्य, पशुपालन, पर्यावरण, कृषी, खाद्यान्न आणि अर्थातच औषधनिर्मिती अशा क्षेत्रांतील हितसंबंधींनी एकत्र येऊन कृती सुरू केल्याशिवाय गत्यंतर नाही.- अमित खुराना, राजेश्वरी सिन्हाविज्ञान आणि पर्यावरण केंद्रातील तज्ज्ञ संशोधक