आज विजयादशमी म्हणजे दसरा. रामाने रावणावर आणि पांडवांनी कौरवांवर विजय मिळविला तो हा दिवस असे सांगतात. खरे खोटे रामकृष्णच जाणे! देवीच्या नवरात्रीच्या उत्सवाची सांगता करण्याचाही हा दिवस. या नवरात्रोत्सवात महिलावर्गाने गरबा किंवा दांडिया किंवा कायसे खेळण्याची म्हणे एक गुर्जर परंपरा आहे. त्यात पुरुष समाजदेखील सहभागी होत असतो. एरवी आणि विशेषत: आपल्याकडील काही जाज्वल्य मराठीप्रेमी, महाराष्ट्राभिमानी, नवनिर्माणेच्छुक वगैरे वगेैरे लोकाना गुर्जरांविषयी तसा मनस्वी आकस. अलीकडच्या काळात तर तो ‘प्रतिपश्र्चंद्ररेखेववार्धिष्णु’ होत चालला आहे. त्यामुळे जे जे गुर्जर ते ते त्याज्य अशी करारी भूमिका घ्यावयास हवी. पण तसे काहीही न होता गरबाच खेळू, टिपऱ्याच बडवू, धांगडधिंग्याला उच्च न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा पुरेपूर लाभ उठवू पण म्हणताना मात्र त्याला गरबा किंवा रासक्रीडा न म्हणता भोंडला गिंडला म्हणू असा जो नवनिर्मित आविष्कार जन्मास आला आहे त्या आविष्काराचीही आज सांगता. आजच्या या दिवशी सीमोल्लंघन करावे आणि सीमेपल्याड जाऊन सोने लुटून आणावे अशीदेखील एक प्राचीन परंपरा असल्याचे सांगितले जाते. अलीकडे गावच्या गावं अशी काही खांद्याला खांदा भिडवून वसली गेली आहेत की सीमेचा पत्ताच लागत नाही. जर तोच लागत नाही तर मग सीमोल्लंघन करायचे तरी कसे? पण अडून बसेल तो मऱ्हाटी बाणा कुठला? त्यामुळे आपली गल्ली, आपला बोळ, आपली कॉलनी, आपला वॉर्ड ओलांडला की झाले सीमोल्लंघन! एकदा ते झाले की पल्याडच्या गल्लीत आपट्याची पाने (बऱ्याचदा यात पाने कमी आणि काटेरी काड्याच जास्त) किंवा त्याचा वाटा विकत घ्यायचा आणि दिग्विजयी चेहऱ्याने घराकडे वळायचे, भाकर-तुकडा ओवाळून घ्यायला! आता या कृतीला सोने लुटणे का म्हणायचे याचा काही थांग लागत नाही. खरे तर लूट किंवा लुटणे या शब्दाला, क्रियेला वा क्रियाविशेषणाला तसा सभ्य अर्थ नाही. लुटणे म्हणजे जो आपणहून जे देण्यास राजी नाही त्याच्याकडून ते बळजबरी हिसकावून घेणे. पूर्वी शमीची झाडे म्हणे गावाबाहेर असत कारण दसऱ्याचा दिवस सोडला तर एरवी त्याचे दर्शनदेखील अशुभ मानले जाते. पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात विराटनगरीत प्रवेश करण्यापूर्वी आपली शस्त्रे एका शमीच्याच झाडावर म्हणे दडवून ठेवली होती. त्यामागे हेच कारण असावे की वर्षभर तिथे कोणीही कडमडायला जाणार नाही. तेव्हां गावाबाहेरच्या शमीच्या झाडावरील पाने ओरबाडायची अशी काही पद्धत असावी व त्यालाच लुटणे म्हणत असावे. आता शमीच्या पानांनाच सोने का म्हणायचे या वादात आता न पडणेच बरे. मुद्दा इतकाच की आजचा दिवस सोने लुटण्याचा. मग हे सोने आपट्याच्या पानांच्या रुपात का असेना. पण यातच खरा सैद्धांतिक आणि कोटी मोलाचा प्रश्न निर्माण होतो. सोने असो, रुपे असो, धन असो की साधा आपटा असो, आजच्याच दिवशी का लुटायचे बरे? काळ बदलला आहे. काळाची परिमाणेही बदलली आहेत. त्यामुळे या बदलत्या काळाने आणि बदललेल्या काळातील माणसांनी ही परंपरेची जोखडे केव्हांच भिरकावून आणि झुगारुन दिली आहेत. आता वर्षाचे सारे दिवस विजयादशमीचे म्हणजे सोने लुटण्याचे असतात. कुणी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या महिलेच्या अंगावरील सोने लुटतो. कुणी पाठीमागून भरधाव वेगात येऊन दुचाकीवरुन सावकाशीने जाणाऱ्या युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरतो. कुणी बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या किंवा बँकेतून पैसे काढून नेणाऱ्याच्या धनाची लूट करतो. यातून हळूहळू मोठे होत गेलेले मग शाळकरी मुलांच्या चिक्कीची वा राजगिऱ्याच्या लाडूची लूट करतात. पूर्वी हेच लोक सुकडी किंवा खिचडीची लूट करीत असत. जे याहूनही मोठे होत जातात ते मग जनावराच्या चाऱ्याची लूट करतात. काल्पनिक रस्त्यांवर होऊ घातलेल्या अकाल्पनिक निधीची लूट करतात. सीमेंटची लूट करतात आणि पोलादाचीही लूट करतात. जे आणखीनच मोठे झालेले असतात ते तर इतके तरबेज की जी बाब अदृष्य आहे पण जिच्यात सव्वालाख कोटी वगैरे इतके धन दडलेले असते त्याचीच लूट करुन मोकळे होतात. काहीजण चवीत बदल म्हणून म्हणे विचारांचे (?) सोनेही लुटत असतात. राजीव गांधींनी जेव्हा केन्द्रातून निघालेल्या शंभर पैशांपैकी जेमतेम चौदा पैसे इच्छित स्थळी पोहोचतात असे म्हटले, तेव्हां त्यातील शह्यांशी पैसे लुटले जातात असेच त्यांना म्हणायचे होते आणि तेही दसरा नसताना. पण तितकेच कशाला, तुम्ही आम्ही आपण सारे दोन पाच वर्षात एकदा वा अनेकदा आपल्यापाशी असलेले मत नावाची एक वस्तू अशीच लुटत असतो. लुटीच्या मालाला तसे काही मोल नसते म्हणून आपणही मोल भाव न करता या किंमती वस्तुची अशी लूट करीत असतो. आपण केलेल्या या लुटीचा ज्याला लाभ मिळणार असतो त्याला मग आपल्या या लुटीतूनच वाट्टेल ते लुटण्याची जणू सनदच मिळत असते. त्याची ही अष्टौप्रहर लुटालूट पाहून मग आपण आक्रंदतो ‘मै लूट गया, बर्बाद हो गया’! त्यामुळेच मग आपल्यातलेही काही शहाणे होत चालले आहेत. इतराना लुटण्यात ते बाकबगार झाले आहेत. ते किंवा तो लुटतो मग आम्ही काय पाप केले, असे तत्त्वज्ञान त्यामागे असते.
सोने लुटायला दसराच कशाला हवा?
By admin | Published: October 22, 2015 3:27 AM