- संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी रस्ते म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. महाराष्ट्रातील मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे हा तर विकासाचा महामार्ग मानला जातो. मात्र, माजी आ. विनायक मेटेंच्याअपघाताला जबाबदार ठरणारा हा एक्स्प्रेस-वे मृत्यूचा सापळा बनला आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. ड्रायव्हरला डुलकी का लागते, इथपासून ते इतर अनेक कारणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर हा प्रकाशझाेत...
ड्रायव्हर म्हटलं की, गाडीची मालक मंडळी जल्दी चलो यापलीकडे फार काही बोलतच नाहीत. तो किती वेळ झोपला आहे, त्याची झोप पूर्ण झाली का? याकडे बहुतांशवेळा दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा ड्रायव्हरची ‘पुरेशी झोप झालेली नसणे’ हेच अपघाताचे कारण ठरत आले आहे. सर्वसाधारणपणे वाहनाचा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरची चूक होती का? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. अनेकवेळा अपघाताची वेळ रात्रीची किंवा पहाटेची असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अपुरी झोप, ताणतणाव, अधिक वेळ गाडी चालविणे, मद्यप्राशन, गुंगीच्या औषधाचे सेवन या कारणांमुळे ड्रायव्हरला डुलकी लागून अपघात घडतात. राज्यातील वाहन अपघातांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, २०२१मध्ये ‘मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे’वर एकूण २०० अपघात झाले. त्यात ८८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १४६ नागरिकांना गंभीर दुखापत झाली. विनायक मेटे यांच्या ‘एक्स्प्रेस-वे’वरील अपघाती निधनानंतर राज्यातील अपघात, त्यानंतर जखमींना मिळणारे उपचार आणि ड्रायव्हरचे गाडी चालविण्याचे कौशल्य याबाबत विविध अंगाने पुन्हा चर्चा सुरू झाली.
ज्या वाहनचालकांना ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया’ हा आजार असतो. ते झोपेत घोरत असतात. त्यांना कधीही आणि कुठेही झोप लागते. त्यांना वाहन चालवताना झोप येऊ शकते. मधुमेही व्यक्तींची शरीरातील साखरेची पातळी कमी झाली तरी झोप येते. तसेच आपल्याकडे वाहनांचे हेडलाईट जमिनीवर असण्याऐवजी थेट ते ड्रायव्हरच्या डोळ्यावर पडतात, त्यामुळे अचानक अंधारी येते, त्यामुळे काही सेकंद काहीच दिसत नाही. - डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लिलावती रुग्णालय
अनेकवेळा वाहन चालविण्यापूर्वी पुरेशी झोप घेतली आहे का? हे वाहनचालकांना कुणी विचारत नाही. तसेच त्यांच्या झोपण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी नसते. तो मिळेल त्या ठिकाणी, नाहीतर गाडीतच अंग टाकून झोपून घेतो. त्याची झोप व्यवस्थित होत नाही. काही भांगेची गोळी टाळूला चिटकवून गाडी चालवितात, काही अफूच्या पानांचे पाणी, तर काही मद्य प्राशन करून गाडी चालवतात. - डॉ. रवी वानखेडे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
आपल्याकडे ड्रायव्हरला वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देत असताना मन आणि शारीरिक विश्रांती याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. तसेच काही आजार असतील तर सर्दी, खोकल्याची औषधे घेतल्यानंतरसुद्धा गुंगी येऊन झोप लागू शकते. त्याचप्रमाणे मोठ्या रस्त्यांवर गाडी चालवताना रस्त्यावरचा तोच तोचपणा सातत्याने बघून मोनोटोनी येते. यामुळे झोप येऊ शकते. भरपूर जेऊन वाहन चालविणे टाळावे. - डॉ. शुभांगी पारकर, माजी विभागप्रमुख (मानसोपचार), केईएम रुग्णालय