काही राज्यांतील वातावरण विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामुळे तापत चालले आहे. मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. पश्चिम बंगाल व आसाममध्ये तसेच काही प्रमाणात केरळात देशप्रेम आणि धार्मिक प्रश्नांवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. भाजपच्या प्रचाराला उत्तर वा आव्हान देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपणही हिंदू आहोत आणि रोज घराबाहेर पडताना चंडीपाठ करतो, असे जाहीर सभेत सांगितले. त्या तेवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी थेट व्यासपीठावरूनच सर्वांना चंडीपाठ ऐकविला. त्यावर अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ नव्हे, तर कलमा पठन केले पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे. म्हणजेच त्यांच्या हिंदुत्वाविषयी भाजपने शंका उपस्थित केली. वास्तविक धर्म, देव हे विषय सार्वजनिक नव्हे, तर व्यक्तिगत भावनेचे विषय आहेत.
राजकारणासाठी आणि मते मिळवण्यासाठी त्याचा वापर होताच कामा नये. त्यामुळे धार्मिक विद्वेषाचे वातावरण आणि समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. अशाच कारणास्तव यापूर्वी काही जणांची निवडणूकही रद्दबातल ठरली आहे. तरीही भाजपने गेल्या काही वर्षांत कोण खरा हिंदू, कोणाचे हिंदुत्व खरे असे मुद्दे राजकीय व्यासपीठावर आणले. त्यामुळे इतर पक्षांनीही आपले हिंदुत्वही अस्सल आहे आणि आपणही देवपूजा करतो, असे सांगायला सुरुवात केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केलेली विधाने व चंडीपाठ हा त्याचाच भाग आहे. असे करून आपण धर्माचे जाहीर प्रदर्शन करण्याच्या भाजपच्या अजेंड्याच्या जाळ्यात अडकत आहोत, धार्मिक प्रचार करू लागलो आहोत, हे ममता बॅनर्जी यांच्या लक्षात आले नसेल, असे कसे म्हणणार? पण इतर पक्षांचे नेतेही तेच करू लागले आहेत. आपण जानवेधारी ब्राह्मण आहोत, असे राहुल गांधी यांना सांगावेसे वाटणे, त्यांनी व प्रियांका गांधी यांनी अचानक वेगवेगळ्या मंदिरात दर्शनासाठी जाणे हाही भाजपच्या अजेंड्यात अडकत चालल्याचा परिणाम दिसतो. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव किंवा अगदी मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग, इंदरकुमार गुजराल, देवेगौडा यांनी कधीही हिंदुत्व, देव वा देशप्रेमाचे जाहीर प्रदर्शन केले नाही. तरीही त्यांच्याविषयी कोणी शंका उपस्थित केली नाही. एकेकाळी पक्षाची राजकीय भूमिका व्यासपीठावरून मांडली जायची. कोेणाचा धर्म कोणता हे सवाल विचारले जात नसत.
आता मात्र धर्माच्या नावाने प्रचार करून उन्माद निर्माण केला जात आहे. धार्मिक ध्रुवीकरण केल्यास मते मिळवणे सोपे होते, हे लक्षात आल्याने राजकीय भूमिका, विचारसरणी यांना पक्ष व नेत्यांनी जणू तिलांजलीच दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हिंदुत्वाबद्दल शंका घेणारा भाजप तामिळनाडू व पुदुच्चेरीमध्ये मात्र हिंदुत्ववादी राजकारणाला विरोध करणाऱ्या द्रविडी पक्षाशी युती करतो. काश्मीरमध्येही मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारमध्ये सहभागी होतो आणि त्यातून बाहेर पडताच मेहबूबा मुफ्ती यांची देशभक्ती वा देशप्रेमाविषयी शंका घेतो. भाजपने जे राजकारण करायचे आहे, ते करावे. पण इतर पक्षांनी त्यांच्या जाळ्यात अडकण्याचे आणि भाजपच्या पद्धतीने राजकारण करण्याची गरज काय? बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसलाच बहुमत मिळेल, असा निष्कर्ष आतापर्यंतच्या सर्व जनमत चाचण्यांतून दिसून आला आहे. तरीही ममतांनी मी हिंदू आहे, चंडीपाठ करते, हे सांगणे अनाकलनीय आहे.
देव, धर्म व देशप्रेम यांचे जाहीर प्रदर्शन वा अवडंबर असताच कामा नये आणि असे प्रदर्शन न करणाऱ्यांविषयी शंका घेणेही चुकीचे आहे. दिल्लीत प्रत्येक एका किलोमीटरवर भारतीय तिरंगा फडकावण्याचा आणि त्यासाठी अर्थसंकल्पात ४५ कोटींची तरतूद करण्याचा केजरीवाल सरकारचा निर्णयही चुकीचाच आहे. तिरंगा दिल्लीत शेकडो ठिकाणी फडकावला तरच केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची देशभक्ती सिद्ध होते की काय? तसे असेल तर उद्या तिरंगा न फडकावणाऱ्यांच्या देशभक्तीवरही काही जण शंका घेतील.
केजरीवाल यांनी दिल्लीत खूप चांगली कामे केली आहेत. त्यांच्या लोकप्रियतेत वाढही झाली आहे. तरीही तेदेखील भाजपच्या प्रखर राष्ट्रवादाच्या अजेंड्याच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. पुढील वर्षी दिल्लीत महापालिकेच्या निवडणुका आहेत. दिल्लीत सरकार आहे; पण महापालिका मात्र आपल्या ताब्यात नाही, याची केजरीवालांना सल आहे. त्यामुळे आमचे देशप्रेमही भाजपइतकेच वा त्यांच्याहून अधिक अस्सल आहे, असे दाखवण्याची त्यांना गरज वाटत असावी. गरिबी, रोजगार, महिलांवरील अत्याचार, कोरोनाचा संसर्ग असे असंख्य महत्त्वाचे प्रश्न देशासमोर असताना नको त्या विषयाचे अवडंबर कशासाठी माजवायचे?