बुद्धिजीवी लोक मोदी सरकारच्या बाजूने का नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 09:27 AM2022-12-21T09:27:53+5:302022-12-21T09:28:31+5:30
शुद्ध तर्कबुद्धी असत्याची साथ देऊ शकत नाही आणि मानवी संवेदनेला द्वेषभावनेशी नाते जोडता येत नाही; हेच या प्रश्नाचे खरे उत्तर आहे!
योगेंद्र यादव,
अध्यक्ष, स्वराज इंडिया
सदस्य, जय किसान आंदोलन
या देशातील कोणताही उमदा बुद्धिजीवी या सरकारच्या बाजूने जायला का तयार होत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थिर आहे; पक्ष निवडणुका जिंकतो आहे; पंतप्रधान लोकप्रिय आहेत. अशा स्थिर, लोकप्रिय सरकारपुढे बुद्धिजीवी, कलाकार, विचारवंत, लेखक यांची तर रांग लागली पाहिजे. पण असे का झाले नाही?- रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन एक दिवस भारत जोडो यात्रेत सामील झाले तेव्हा हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. तसे पाहिले तर ही काही फार मोठी घटना नव्हे.
प्रोफेसर राजन काही तास यात्रेत सामील झाले. यापूर्वी निवृत्त नौदलप्रमुख ॲडमिरल रामदास, न्या. बी. जी. कोळसे पाटील, सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण, प्रसिद्ध संगीतज्ञ टी. एम. कृष्णा, प्रतिष्ठित कबीर गायक प्रल्हाद तिपानिया, प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांच्यासारखे अनेक मान्यवर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. परंतु रघुराम राजन यात्रेत सहभागी झाल्यावर मोठा वाद निर्माण झाला. भाजपाच्या प्रवक्त्यांनी त्यावर लगोलग टिप्पणी केली. टीव्ही वाहिन्यांनीही या वादात उडी घेतली. मलाही बोलावले तेव्हा मी म्हणालो, यात वाद होण्यासारखे काय आहे? रघुराम राजन हे कोणी वादग्रस्त व्यक्ती नव्हेत! जगातले एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आहेत. अमेरिकेमध्ये शिकवतात. परंतु त्यांनी आजही भारतीय नागरिकत्व कायम ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी एकही विवादास्पद कृती केली नाही. भारत जोडोमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी कुठले वादग्रस्त विधानही केलेले नाही. नोटबंदी हा तुघलकी निर्णय होता एवढेच ते म्हणाले.
एक भारतीय नागरिक या नात्याने रघुराम राजन यांना देशाच्या राजकारणाबद्दल काही मत असण्याचा पूर्ण अधिकार आहेच. एका राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या यात्रेत त्यांनी भाग घेतल्याने रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त गव्हर्नरच्या मर्यादांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही. राजन यांचे हे कृत्य मर्यादा उल्लंघन असल्याचे म्हणणाऱ्या भाजपने माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना निवृत्तीनंतर लगेचच राज्यसभा खासदार आणि मंत्री केले आहे. किती नोकरशहांना त्यांनी राजकारणात उतरवले याची तर गिनतीच नाही. तरीही भाजपने राजन यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यावर आक्षेप घ्यावा? कदाचित नोटबंदीपूर्वी राजन यांनी दिलेला इशारा पंतप्रधानांनी गांभीर्याने का घेतला नाही, अशी पश्चातबुद्धी भाजपला आता त्रास देत असावी!
या सरकारमध्ये अर्थशास्त्र समजून घेण्याच्या बाबतीत दुष्काळच आहे. अव्वल दर्जाचा कोणीही अर्थशास्त्रज्ञ या सरकारबरोबर राहणे पसंत करत नाही आणि जो जोडला जातो तोही टिकत नाही. अपवाद फक्त अरविंद सुब्रमण्यन यांचा! तेही ज्या घाईगर्दीने सरकारमधून बाहेर पडले ते काही लपून राहिलेले नाही. आज देशाच्या प्रमुख आर्थिक संस्था आणि पदांवर जे अर्थतज्ज्ञ बसलेले आहेत त्यांची नावे ऐकून अर्थशास्त्री विषादाने म्हणतात, आता ईश्वरच भारताच्या अर्थव्यवस्थेचे भले करो!
मोजके अपवाद वगळता कोणत्याही क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ किंवा प्रतिष्ठित व्यक्ती या सरकारबरोबर काम करायला तयार नाहीत. अपवाद म्हणून पंतप्रधानांचे आधीचे विज्ञान - तंत्रज्ञान सल्लागार डॉ. विजय राघवन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कस्तुरीरंगन यांची नावे घेता येतील. व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काही मोठी माणसे सरकारबरोबर काम करायला तयार आहेत. परंतु बाकी सर्व बाबतीत हे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम ठरले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषदेचा निवृत्त सदस्य या नात्याने मी ठामपणे म्हणू शकतो की आज अत्यंत सामान्य दर्जाचे लोक या संस्थांमध्ये घुसले आहेत. ज्यांना महाविद्यालयात अधिव्याख्यात्याची नोकरीही देऊ नये अशांना केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू केले गेले आहे. कला आणि साहित्य क्षेत्राचेही तेच! प्रसून जोशी आणि अनुपम खेर यांना वगळले तर गीत, संगीत आणि अभिनयाच्या क्षेत्रातील कोणतेही मोठे नाव या सरकार बरोबर नाही. आपले समर्थन करण्यासाठी सरकारला ज्या स्तरावरच्या कलावंतांचा आधार घ्यावा लागतो त्यांचे भांडे अलीकडेच गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काश्मीर फाइल्सच्या संदर्भात झालेल्या टिप्पणीमुळे फुटलेच आहे.
जवळपास अशीच स्थिती अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारची होती. हाच प्रश्न रशियात पुतिन आणि श्रीलंकेत राजपक्षे तसेच तुर्कस्थानमध्ये एर्दोगन यांच्या बाबतीत समोर आला. अती उजव्या वळणाच्या सरकारांबरोबर सर्जनशील लोक जात नाहीत? याचे कारण अगदी साधे सरळ आहे: शुद्ध तर्कबुद्धी असत्याची साथ देऊ शकत नाही आणि मानवी संवेदनेला द्वेषभावनेशी नाते जोडता येत नाही. तर्काशिवाय कोणी बुद्धिजीवी किंवा वैज्ञानिक होऊ शकत नाही; आणि संवेदनशीलतेशिवाय कला आणि साहित्य निर्माण होऊ शकत नाही.
सत्ता, संपत्ती आणि धनवान लोक शब्द विकत घेऊ शकत नाहीत हे शाश्वत सत्य आहे आणि तेच जगभरातील अधिनायकांच्या पराभवाचे कारणही!
yyopinion@gmail.com