- प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य,विदर्भ वैधानिक विकास मंडळनुकतेच पुण्यात ४ हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग पोलिसांनी जप्त केले. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर व सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा सापडणे हे निश्चितच चिंताजनक आणि धक्कादायक आहे. ज्या पदार्थांचे सेवन केल्याने माणसाला विशिष्ट प्रकारची धुंदी, सुस्ती किंवा नशा येते, त्यांना अमली पदार्थ म्हणजेच ‘ड्रग्ज’ म्हणतात. अफू आणि त्यापासून तयार केलेले हेरॉईन, मॉर्फिन हे पदार्थ तसेच कोकेन, गांजा, चरस, भांग या पदार्थांचा अमली पदार्थांत समावेश होतो. औषध म्हणून ड्रग्जची विक्री तस्कर करू लागले आहेत. त्यांच्या भंपक गोष्टींना नागरिकही बळी पडताना दिसतात. कुणाला पिळदार शरीरासाठी, कुणाला बारीक होण्यासाठी, कुणाला सेक्स पॉवर वाढविण्यासाठी तर कुणाला एकाग्रता वाढविण्यासाठी किंवा मानसिक तणावातून आराम मिळण्यासाठी अमली पदार्थांची विक्री औषध म्हणून होत असल्याचे दिसून येते.
मेफेड्रोन हे एक मनोवैज्ञानिक, मनोरंजक औषध आहे ज्याचा कोणताही औषधी उपयोग नाही. हे ऍम्फेटामाइन आणि कॅथिनोन आहे. हे एक उत्तेजक आहे. तरुण अनेक कारणांसाठी मेफेड्रोन घेतात. मजा, कुतूहल, विश्रांती, चिंता किंवा भावनिक वेदनांचा सामना करण्यासाठी, काहीतरी वेगळे करण्याची इच्छा, मित्रांसह सामाजिक, समवयस्कांचा दबाव, आव्हानात्मक परिस्थितीतून सुटण्यासाठी, कंटाळवाणेपणा घालवण्यासाठी, मानसिक किंवा शारीरिक वेदना कमी करण्यासाठी, भूतकाळातील आघात हाताळण्यासाठी मेफेड्रोन ड्रगचा आधार ते घेतात.
मेफेड्रोनची किंमत २०२१ मध्ये सुमारे ९०० रुपये प्रतिग्रॅमवरून सध्या २०,००० रुपये प्रतिग्रॅमपर्यंत वाढली आहे. कोणतेही आईवडील थोडीच देणार आहेत यासाठी पैसे? मग हे पैसे तरुणाई कोठून व कसे आणत असतील?मेफेड्रोन व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. शरीराच्या पेशींना या ड्रग्जची सवय लागते. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्ती ‘एकलकोंड्या’ होतात. ड्रग्जमध्ये असलेल्या काही द्रव्यांमुळे व्यक्तीला वेगवेगळे आणि तीव्र स्वरूपाचे भास होतात. त्यामुळे ती व्यक्ती सैरभैर होते. कधी कधी ते आपला जीवही गमावतात.
व्यसनाधीन व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थ हवाच असतो. तो प्राप्त करण्यासाठी चोरी किंवा एखाद्याचा खून करण्यापर्यंत त्या व्यक्तीची मजल जाऊ शकते. अमली पदार्थविरोधी कायद्यात कडक शिक्षा आहेत. नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यातील तरतुदीनुसार अमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडे सापडलेल्या अमली पदार्थांच्या प्रमाणानुसार किमान सहा महिन्यांपासून वीस वर्षांपर्यंत शिक्षा आणि दहा हजार रुपयांपासून दोन लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. एवढे कडक कायदे असून पण ड्रग्जच्या आहारी जाणारे आहेतच.
पालकांनी आपलं मूल नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून लहानपणापासूनच त्यांच्याशी जवळचे आणि विश्वासार्ह नाते निर्माण करावे. स्वतःच्या योग्य वागणुकीतून त्यांना उचित मार्ग दाखवावा. समतोल आहार, नियमित व्यायाम आणि खेळ यासह निरोगी दृष्टिकोनाला प्रोत्साहन द्यावे. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी आणि लहानपणापासूनच त्यांच्यात योग्य निर्णय घेण्याची कौशल्ये विकसित करावीत. अमली पदार्थांच्या वापराशी संबंधित जोखमींबद्दल मुलांबरोबर खुली आणि प्रामाणिक चर्चा करावी. त्यांना याबद्दल सत्य माहिती द्यावी. अतिशयोक्ती करू नये. मूल ड्रग्ज घेत असल्याची शंका असल्यास पालकांनी त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे. स्वतःला विचार करण्यासाठी वेळ द्यावा. निवांतपणी, योग्य क्षणी त्यांच्यासोबत शांतपणे चर्चा करावी. मुलांना आरोग्य आणि जीवनशैलीच्या जोखमींबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न करावा. हमरीतुमरीवर येऊ नये. त्यांच्या काही समस्या असतील तर त्या त्या सोडविण्यासाठी त्यांना मदत करावी.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे. ड्रग्जच्या सेवनाचे भयंकर दुष्परिणाम लक्षात घेऊन या व्यसनांपासून लांब राहणेच योग्य व हिताचे आहे.