- मेघना भुस्कुटे(भाषांतरकार आणि ब्लॉगर)
नग्नतेची भीती आपल्याला सगळ्यांनाच वाटते. कोणत्या नग्नतेची भीती सर्वाधिक वाटते, याचा थोडा तपास केला, तर त्या भीतीच्या मुळाशी जाता येईल. वृद्ध धार्मिक पुरुष आणि वृद्ध धार्मिक स्त्री यांच्यातलं कोण नग्न असेल तर आपण कमी दचकू? तरुण धार्मिक पुरुष आणि तरुण निधर्मी स्त्री असेल तर? तरुण माता आणि उपभोगयोग्य तरुणी यांच्यापैकी कुणाची नग्नता आपल्याला जास्त घाबरवेल? या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःला प्रामाणिकपणे देऊ शकलो, तर असं ध्यानात येईल, की तरुण स्त्रीच्या उपभोगयोग्य नग्नतेला आपण सगळे जण सर्वाधिक घाबरतो.
आम्ही कडेकोट बंदोबस्तात आणि संपूर्ण एकांतात नसतानाही नग्नता नजरेला पडली, तर आम्ही स्वतः कसे वागू हे आमचं आम्हाला सांगता येणार नाही, असा आपला भयभीत नूर असतो. यात नवल करण्याजोगं काही नाही. तरुण उपभोगयोग्य स्त्री ही संस्कृतीच्या आदिकाळापासून अतिशय आकर्षक अशी मालमत्ता मानली गेलेली आहे. रामायण- महाभारतातल्या सीता माधवी कुंती द्रौपदी यांपासून ते ट्रॉयच्या हेलनपर्यंत सगळ्या नायिकांच्या स्त्रीदेहाभोवती फिरणारं सत्ताकारण दोन समाजांच्या संघर्षामध्ये स्त्रियांचा एखाद्या नाजूक मर्मस्थानासारखा केलेला वापर, त्यांनी आमच्या स्त्रियांची विटंबना केली, म्हणून आम्ही त्यांच्या स्त्रिया विटंबणार यांसारखे युक्तिवाद, स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याविषयीची
सार्वत्रिक भीती, स्त्रीचं चारित्र्य आणि पातिव्रत्य या कल्पनांचा बडिवार... हे सगळं बघता ते स्पष्ट दिसतं. स्त्रीच्या गर्भाशय नामक निर्मितीक्षम शरीरसंपदेवर नियंत्रण ठेवलं, तर निपजणारी प्रजा आपल्याच रक्ता- बीजाची असेल हा सिद्धान्त उरीपोटी बाळगणाऱ्या समाजाला तरुण उपभोगयोग्य स्त्रीची नग्नता अशा प्रकारे भीतीदायक- धक्कादायक नियंत्रणयोग्य वाटली, तर नवल वाटू नये. त्यामुळेच स्त्रीदेह झाकणारे कपडे हा संस्कृतीचा नुसता अविभाज्य भागच नव्हे, तर संस्कृतीचंच जणू प्रतीक ठरत गेलं असावं. स्त्रीनं हिजाब घालावा की नाही, टिकली लावावी की नाही यांसारख्या विषयांवर पुन्हा-पुन्हा उफाळणारे राजकीय वाद, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वृत्तपत्रांनी चालवलेल्या 'सकच्छ की विकच्छ', 'स्त्रीनं अंबाडा घालावा की वेणी घालावी', 'गोल पातळ नेसावं की, काष्टा घातलेलं पातळ नेसावं.... यांसारख्या चर्चा महानगरांकडून जसजसं गावांकडे जावं, तसतशी स्त्रीच्या कपड्यांवर येणारी कठोर बंधनं सत्तेच्या उतरंडीत वर चढू पाहणाऱ्या स्त्रियांनी या सगळ्या बंधनांच्या अंमलबजावणीमध्ये आपखुशीनं भाग घेणं... हेजगात जिथे जिथे आर्थिक सुबत्ता, शिक्षण, नागरीकरण आलं, तिथे तिथे स्त्रीच्या वेशभूषेभोवती असलेले टॅबूज् कमी अधिक प्रमाणात सैल होताना दिसतात; पण त्या भागांतही सामाजिक- सांस्कृतिक राजकीय आर्थिकसत्तासंघर्षाला तोंड फुटू पाहतं, तेव्हा तेव्हा इतिहासाचा काटा मागे फिरवण्याचे प्रयत्न या ना त्या रूपानं होताना दिसतातच! हे सगळं एकदा नीट दिसू लागलं, की चित्रा वाघउर्फी जावेद- सुषमा अंधारे यांच्यातला वाद त्यातल्या सगळ्या अर्थछटांसकट समजून घेणं सोपं होतं.
उर्फी ही एक मुस्लीम तरुणी. आई- वडिलांपासून स्वतंत्र राहून अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारी. चार जणींहून कमी आणि चार जणींहून जरा विचित्र कपडे घालून प्रकाशझोतात राहणं ही तिनं केलेली निवड, त्यात बेकायदेशीर काही नाही. चित्रा वाघ या अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजकारणी, भाजपचं राजकारण हे बहुसंख्याक हिंदूचा आणि त्यातही हिंदू पुरुषांचा आधी कैवार घेणारं. उर्फीच्या सार्वजनिक वावरादरम्यानच्या वेशभूषेला 'नंगटपणा' असा शब्द वापरून चित्रा वाघांनी त्याला आक्षेप घेतला, भेट झाली तर तिला थोबडवण्याची भाषा केली. महिला आयोगानं यात हस्तक्षेप करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मग उर्फीच्या विरुद्ध पोलिसात तक्रारही नोंदवली.
सध्या शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या आधुनिक सुशिक्षित राजकारणी सुषमा अंधारेही यात पडल्या. कुणी कसा पोशाख करावा, ते व्यक्तीनं आपापलं ठरवावं, असं तर त्या म्हणाल्याच; पण 'उर्फीच्या वेशभूषेला तुमचा आक्षेप असेल, तर कंगना राणावत, केतकी चितळे वा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेलाही आक्षेप घ्याल का?" असा प्रश्नही त्यांनी केला. आता हे निव्वळ समाजमाध्यमांवर एकमेकींवर गुरकावण्यापुरतं राहातं, की त्यात व्यवस्था आणि प्रत्यक्ष लोकही उतरतात, हे यथावकाश कळेलच. या सगळ्या स्त्रिया आहेत. मात्र, आपापल्या अस्तित्त्वाची लढाई लढताना त्या कळत- नकळत जे राजकारण खेळताहेत, ते सर्वस्वी पुरुषकेंद्री आहे. अंगप्रदर्शन, संस्कृतीच्या कारणावरून अंगप्रदर्शनाला आक्षेप, त्याकरिता मारहाणीची भाषा आणि अखेरीस 'तुमच्या स्त्रियांच्या वेशभूषेला तुम्ही आक्षेप का घेत नाही?" हा सवालही. या पुरुषकेंद्रीपणाचं भान त्यांना आहे का?
चित्रा वाघ तर बोलून चालून भाजपच्या त्यामुळे आधुनिकता, व्यक्तिस्वातंत्र्य वा स्त्री- पुरुष समानता या बाबतीत त्यांची भूमिका सनातनी असणार, हे गृहीतक असल्यासारखं आहे; पण उर्फी जावेद आणि सुषमा अंधारे या दोन व्यक्तिना आपल्या भूमिकांच्या या विशिष्ट पैलूचं आणि त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या सापळ्याचं भान आहे का? उद्या भाजपनं अधिकृत भूमिका म्हणून स्वतःच्या पक्षाच्या निकट असलेल्या आणि नसलेल्या अशा सगळ्याच स्त्रियांच्या बाबतीत अशीच भूमिका घेतली, तर आपण आपला विरोध म्यान करणार आहोत का? स्त्रीदेहाच्या वस्तूकरणाला- शोषणाला वा स्त्रीदेहावरच्या नियंत्रणाला नकळत मान्यता देणं आत्मघातकी आहे, हे सनातन्यांना आणि आपल्याला जेव्हा उमगू लागेल, तेव्हा आपण या सगळ्या चक्रव्यूहातून निसटण्यासाठीचं पहिलं पाऊल टाकू. तोवर कठीण आहे.