डॉ. जितेंद्र आव्हाड
मुख्यमंत्र्यांच्या संगीतखुर्चीचा खेळ आणि वारंवार होणारा निसर्गाचा प्रकोप यासाठी बदनाम झालेल्या उत्तराखंडात साधारण १०० वर्षांपूर्वी एक विलक्षण समस्या निर्माण झाली होती. कुमाऊं जिल्ह्याच्या गर्द जंगलात नरभक्षक वाघांनी थैमान घालून हजारभर माणसं खाल्ली होती. बद्रिनाथ आणि केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांनासुद्धा मारलं होतं. उत्तराखंड त्यावेळी संयुक्त प्रांताचा भाग होता. तिथले गव्हर्नर माल्कम हेली यांनी या नरभक्षक वाघांच्या शिकारीसाठी ज्या स्थानिक माणसाची मदत घेतली त्याचं नाव जिम कॉर्बेट.
ब्रिटिश आईवडिलांच्या पोटी जन्माला आला असला तरी तिथेच वाढलेला जिम मनाने भारतीयच होता. त्या डोंगरदऱ्यांवर, जंगलावर, गावकऱ्यांवर त्याचं अपरंपार प्रेम होतं. तिथल्या खाचाखोचा, पायवाटा, ओहोळ, तलाव, जनावरं त्याला पक्की माहिती होती. मनसोक्त फिरणं हा त्याचा छंदच होता. जिमने जबाबदारी स्वीकारली. आपल्या कारकिर्दीत त्याने जवळपास १,२०० नरभक्षक वाघ आणि बिबटे मारले. त्यातील अनेकांचं शवविच्छेदन केल्यानंतर ते साळिंदराच्या काट्यांनी किंवा हौशी शिकाऱ्यांनी केलेल्या बेधुंद गोळीबारात जखमी झाले आहेत, त्यांना संसर्ग झाला आहे, आणि म्हणूनच सोपं भक्ष्य असलेल्या माणसांना खाण्याचा मार्ग त्यांनी नाईलाजाने निवडला आहे, हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष त्याने काढला. जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी गावाभोवती भिंत कशी बांधायची याचे नमुने त्याने तयार केले. “ मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं’ आणि ‘हाऊ टु रीड अ जंगल’ ही प्रख्यात पुस्तकं जिमने लिहिली. ती २७ भाषांमध्ये अनुवादित झाली. ‘ तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊ नका, ते तुमच्या वाटेला जाणार नाहीत ‘, हे सृष्टीचं आत्यंतिक महत्त्वाचं तत्त्वज्ञान त्याने सांगितलं. आजची अभयारण्याची संकल्पना याच तत्त्वावर साकार झाली आहे. ते नरभक्षक वाघ मारताना जिमला कधीच आनंद वाटला नाही हे यातून अधोरेखित होतं.
आपल्या पुस्तकांतून मिळालेला पैसा त्याने कुमाऊंच्या गावांसाठी, जखमी लष्करी जवानांसाठी दान केला. “ माझे गावकरी देश बांधव गरीब आहेत. पण, ते कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो “, हे त्याने आपल्या लिखाणात नमूद केलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याला आजच्या म्यानमारमध्ये पाठवलं गेलं. जंगलात पाणी आणि खाणं कसं शोधायचं, झोपायची जागा कशी ठरवायची, अशा अनेक गोष्टी जिमने सैनिकांना शिकवल्या. त्याच्या हयातीतच त्याच्यावर हॉलिवूडमध्ये एक चित्रपट निघाला. तो फारच सुमार दर्जाचा असल्याने जोरदार आपटला. उभं आयुष्य जंगलात घालवूनही आपली विनोद बुद्धी शाबूत ठेवलेला जिम त्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘वाघाने फारच सुंदर काम केलंय !’ राजकन्या एलिझाबेथ एक रात्र सरकारी डाक बंगल्यावर मुक्कामाला होती. जवळच्या झाडावर मचाण बांधून वाघापासून तिचं रक्षण करण्यासाठी जिमला बसवण्यात आलं होतं. उत्सुकतेपोटी एलिझाबेथ सुद्धा मचाणावर आली. त्याच वेळी इंग्लंडच्या राजाचं निधन झाल्याची दुःखद बातमी आली. तिला तिचा मुक्काम आटपून घाईघाईने राणीपद स्वीकारण्यासाठी इंग्लंडला परतावं लागलं. ही आठवण सांगताना जिम मिश्किलपणे लिहितो, ‘ही माझ्या मचाणाची किमया. ती वर आली तेव्हा राजकन्या होती, उतरली तेव्हा राणी झाली होती !’
१९५१-५२ ला अशा या जिम कॉर्बेटच्या नावाने ३५० चौरस किलोमीटर पसरलेलं हे अभयारण्य स्थापन करण्यात आलं. जिम कॉर्बेटचं नाव हटवून त्याला आता ‘रामगंगा अभयारण्य ’असं नाव देण्याची घोषणा केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री अश्विनी चौबे यांनी परवा केली तेव्हा संताप अनावर झाला. ही भावना माझ्याप्रमाणे अनेकांची असेल. नावामध्ये अस्मिता असते हा दावा ग्राह्य धरला तरी, जिमच्या नावात भारतीय अस्मिताच आहे. भारताशी एकजीव झालेल्या माणसाचा इतिहास आहे. जिम आयुष्यभर अविवाहित राहिला. घनदाट अरण्य हाच त्याचा संसार होता. पण, नावं बदलून इतिहास पुसायचा संसर्ग झालेले हे लोक. जिम आज हयात असता तरी नरभक्षक वाघांना घातल्या तशा गोळ्या यांना घालू शकला नसता. पुस्तकांचं उत्पन्न केलं, तसं आपलं नावही त्याने दान केलं असतं.
(लेखक राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आहेत)