चांगला सेनापती योग्य संधीची वाट पाहतो आणि ती मिळताच तुटून पडतो, असे मानसिकदृष्ट्या खंबीर माणसांची एक सवय सांगितली जाते. ‘झुकेगा नही साला’ म्हणत दोन्ही हातांच्या आवळलेल्या मुठी आकाशात उंचावत ईडी कोठडी व तुरूंगात गेलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत जामिनावर सुटल्यानंतर तशी योग्य संधीची वाट बघताहेत की एकशे तीन दिवस चार भिंतीच्या आत आत्मचिंतनानंतर त्यांना वेळेचे अधिक भान आले आहे?
पीएमएलए कोर्टाने जामीन दिल्यानंतर बुधवारी रात्री घरी परत येताना संजय राऊत पूर्वीच्याच आक्रमक शैलीत दिसले. जाताना ज्या आवेशात गेले त्याच आक्रमकपणे घरी आले. गुरुवारी सकाळी ते पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजल्यावर अनेकांना तीन वर्षांपूर्वीच्या त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदा आठवल्या. तीन महिने तुरूंगात साचलेला संताप ते आक्रमकपणे बाहेर काढतील, राऊत आता ‘सुटणार’, असा अंदाज होता; परंतु त्यांनी गुगली टाकली.
एकदम विरक्ती आल्यासारखे म्हणाले, आपल्याला राजकीय सूडबुद्धीने अटक झाली खरे; पण मनात कोणाबद्दल किल्मिष नाही. आपण पंतप्रधान मोदींना, गृहमंत्री अमित शहा यांना, इतकेच काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत, अशी स्तुतीही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख एक वर्षांपासून तर नवाब मलिक आठ महिन्यांपासून तुरूंगात आहेत. जामीन मिळावा म्हणून धडपडत आहेत. या पृष्ठभूमीवर, संजय व प्रवीण राऊत यांना जामीन देणारा विशेष पीएमएलए न्यायालयाचा १२२ पानांचा आदेश म्हणजे राऊतांच्या भात्यातले १२२ बाण म्हणायला हवेत.
मुंबईच्या गोरेगावातील पत्राचाळ प्रकरणाला अनेक पदर आहेत. राकेश कुमार व सारंग वाधवान या पिता- पुत्रांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी, एचडीआयएल ही तिची होल्डिंग कंपनी, म्हाडाचे गेल्या बारा- पंधरा वर्षांतील उलटसुलट आदेश, म्हाडाविरुद्ध जीएसीपीएल असे उच्च व सर्वोच्च न्यायालयातील कोर्टकज्जे, पीएमसी बँक घोटाळ्यात होल्डिंग कंपनीने बुडविलेले सहा हजार कोटींहून अधिक कर्ज, त्यातील प्रवीण राऊत यांना मिळालेली रक्कम, आधी प्रवीण राऊत व नंतर संजय राऊत यांना अटक केल्यानंतरचा चित्रविचित्र दाव्यांचा गुंता आणि हळूहळू त्यात स्वत:च अडकत गेलेली ईडी, राऊत तुरूंगात असताना सोळा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बैठकीचा कथित गौप्यस्फोट, त्या दाव्यातील सगळा फोलपणा, अशा चित्रपटाच्या पटकथेसारख्या नाट्यमय घटनाक्रमाचा न्यायालयाने पर्दाफाश केला आहे.
मुळात प्रवीण राऊत यांची अटकच ईडीची मनमानी आणि संजय राऊत यांची अटक तर विनाकारण, बेकायदेशीर असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. कुठल्याही अधिकाराच्या पदावर नसलेल्या एकाच व्यक्तीच्या निराधार बयाणावर विसंबून पवार व देशमुख यांची नावे घुसडण्याचा प्रकार म्हणजे, पुढचा नंबर तुमचा असल्याचा इशारा देणारा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, संजय राऊत जामिनानंतर अधिक आक्रमक होतील, असा कयास होता. राज ठाकरे यांच्या टीकेला दिलेले उत्तर वगळता संजय राऊत एकदम बदलल्याचे दिसले. खरेच ते बदलले आहेत की यामागेही त्यांचे काही डावपेच आहेत, हे कळायला मार्ग नाही. मुळात राऊत यांचा स्वभाव असा नाही. अंगावर आलेल्याला शिंगावर घेणारे म्हणूनच ते ओळखले जातात.
कदाचित ईडीने जामिनाला स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या सुनावणीआधी काही उलटसुलट आक्रमक बोलून नवे संकट कशाला ओढवून घ्यायचे, असे म्हणून देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न किंवा जामीन देताना न्यायालयाने इतका सगळा फायदा पदरात टाकला आहेच तर कशाला घाई करा, असा विचार त्यांनी केलेला असू शकतो. हेदेखील खरे आहे, की राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर नाही. गृहखाते फडणवीसांसारख्या खमक्या नेत्याच्या हातात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची बाळासाहेबांची शिवसेना हा शिवसेना (उबाठा) पक्षाचा शत्रू क्रमांक एक आहे. तेव्हा, एकावेळी शत्रूत्वाच्या अधिक आघाड्या कशाला उघडायच्या. शिंदेंवर तुटून पडताना भाजपला गोंजारायचे, अशीही खेळी असू शकते. नेमके काय हे कळेपर्यंत लोक अंदाज बांधत राहतील हे नक्की.