शिवसेनेचा प्राण जसा मुंबई महापालिकेच्या सत्तेत आहे, तसा उर्वरित महाराष्ट्रात सेनेचा श्वास औरंगाबाद महानगरपालिकेत. आता ही निवडणूक तोंडावर असल्याने कदाचित सेनेच्या दृष्टीने ती काहीअंशी मुंबईसाठी ‘लिटमस टेस्ट’ही होऊ शकते, तर या औरंगाबादच्या निवडणुकीसाठी हवा तापवायला सेनेने सुरुवात केली. पंचवीस वर्षे सत्तेवर राहून साध्या मूलभूत सुविधा देऊ न शकणाऱ्या सेनेला आता जनमतातील खळबळ अस्वस्थ करू लागली आणि या नाकर्तेपणाला हवा देण्याचे काम सेनेची एकेकाळची अर्धांगिनी ‘कमळाबाईच’ करीत असल्याने सेनेचे नेते अस्वस्थ आहेत. ‘संभाजीनगर’चा नेहमीचा ‘बाॅम्ब’ही यावेळी सर्दाळला तो आवाज करीत नाही. हा मुद्दा हायजॅक करण्यासाठी ‘मनसे’ पुढे सरकली. सेनेने विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला; पण वातावरणनिर्मिती होत नाही, हे लक्षात येताच चलबिचल सुरू झाली.
गेले पावशतक महापालिकेत शिवसेना-भाजपची आघाडी होती; पण महाराष्ट्रातील सत्तांतराचे सावट पडले आणि भाजपने कंबर कसली. त्याचबरोबर सेनेच्या नाकर्तेपणावर नेमके बोट ठेवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. सेनेची दुसरी अडचण म्हणजे नेहमीचे तेच ते चेहरे. नवी फळी नाही आणि नवी मंडळीही घराणेशाहीतील. प्रत्येक जण आपल्या मुलाला पुढे दामटवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. परवा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चेहरा बदलण्याचे संकेत दिले, याचा अर्थ या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा ‘भाकरी फिरवण्याचा’ इरादा दिसतो. सेनेने खरोखरच भाकरी फिरवली तर नव्या सेनेचा चेहरा काय असेल? माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडे तर हा अंगुलीनिर्देश नसावा? औरंगाबादेत शिवसेना वाढवण्यात त्यांचा वाटा मोठा आहेच; पण गेली पंचवीस वर्षे ते सत्तेत होते हेही लक्षात घेतले पाहिजे. सुभाष देसाईंनीच या निवडणुकीत लक्ष घातल्याने सेनेअंतर्गत गटातटांची अडचण झाली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेने दोन वेळा सर्वेक्षण केले आहे. शिवसेनेने सर्व्हे केला आणि आ. अंबादास दानवे यांनीही एक सर्वेक्षण केले. शिवसेनेने शहरात पाय रोवल्यापासून काही मंडळी महानगरच्या राजकारणात सक्रिय झाली. त्यांनी आजपर्यंत नव्या मंडळींना पुढे येऊ दिलेले नाही, हा या सर्वेक्षणांचा निष्कर्ष आहे. ज्यांच्यात पुढे येण्याची धमक आहे त्यांच्या विकासकामांत खोडा घालण्याची कृती या जुन्या ‘खोडांनी’ केली. त्यामुळे सेनेत तेच ते चेहरे कायम दिसत राहिले.
या पार्श्वभूमीवर यावेळी एका घरात एकच पद किंवा उमेदवारी हा ‘मुंबई फाॅर्म्युला’ राबविण्याच्या विचारात शिवसेना आहे. समजा हे घडले तरी सेनेतील घराणेशाहीचे काय होणार? काही नेत्यांनी या निवडणुकीत मुलांचे लाँचिंग करण्याची तयारी सुरू केली आहे. युवा सेनेची कोअर टीम सक्रिय असल्याने काहींनी ही वाट निवडली. अंतर्गत गटबाजी जोरात असली तरी नेत्यांनी ती वर येऊ दिलेली नाही. सेनेसमोर तीन आव्हाने आहेत. त्यापैकी पहिले भाजपची शिस्तबद्ध फळी, दुसरे अंतर्गत गटबाजी आणि तिसरे भाकरी फिरवलीच तर होणारा दगाफटका. हे सगळे अडथळे पार करीत पुन्हा जनतेचा विश्वास मिळवावा लागणार आहे; पण सवाल आहे भाकरी फिरवणार का?
- सुधीर महाजन