डॉ. विजय दर्डाचेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादरूपी लाडूत चरबी मिसळलेली असते, या आरोपामुळे धरणीकंप झाला आहे. तिरुपती मंदिराविषयी आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकालाच हा प्रश्न छळतो आहे की, प्रसादाच्या लाडूत चरबी वापरली असेल आणि कोणालाही ते कळणार नाही, हे शक्य आहे का? परंतु हा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला असल्याने सखोल चौकशी झाली पाहिजे. जेणेकरून सत्य काय ते समोर येईल. श्रद्धेच्या बाबतीत राजकारण योग्य नाही, अशी माझी धारणा आहे.
तिरुपती बालाजी मंदिरात दररोज सुमारे साडेतीन लाख लाडू तयार केले जातात आणि तेही दुसरीकडे कुठे नव्हे, तर मंदिराच्या स्वयंपाकघरातच तयार होतात. या स्वयंपाकघराला पोटू म्हणतात. प्रसादरूपाने लाडू वाटण्याची ही परंपरा जवळपास तीनशे वर्षांपासून चालत आली आहे. दरवर्षी हे लाडू पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मंदिराला देतात. लाडू तयार करताना चरबीचा वापर झाला, असा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'मागील सरकारच्या काळात तिरुमला येथे लाडू तयार करताना शुद्ध तुपाऐवजी प्राणीज चरवी मिसळलेले तूप वापरले जात होते. गेल्या पाच वर्षांत वायएसआर पक्षाने तिरुमलाचा पावित्र्यभंग केला असल्याचा आरोप चंद्राबाबूंनी केला. आपल्या सरकारच्या काळात पवित्र लाडू तयार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. वायएसआर यांचा संबंध ख्रिश्चन धर्माशी आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. स्वाभाविकपणे या विषयावरून वादळ निर्माण झाले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी त्वरेने मुख्यमंत्री नायडू यांच्याशी बोलणे करून 'आपण सर्व पक्षांकडून याबाबतीत माहिती घेऊ' असे त्यांना सांगितले.
खरे तर ज्या अहवालाला आधार मानून समाजमाध्यमांवर खळबळ माजवली गेली, तो अहवाल तिरुपती बालाजी मंदिरात तयार झालेल्या लाडूशी संबंधित आहे, असे त्यात कोठेही म्हटलेले नाही. अहवालाच्या पहिल्या पानावर तिरुमला तिरुपती देवस्थानच्या एका अधिकाऱ्यास उद्देशून काही म्हटले गेले आहे; परंतु ज्या पानावर कथित अहवाल आहे, त्यामध्ये देवस्थानचा काहीही उल्लेख नाही. अशा अहवालाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होणार, हे स्पष्टच आहे. नायडू यांनी आरोप केल्यानंतर लगेचच वायएसआर काँग्रेसचे नेते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी असा आरोप केला की, चंद्राबाबू नायडू यांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी देवाचा उपयोग करण्याची सवयच आहे. लाडू तयार करताना तुपात भेसळ झाल्याचा आरोप त्यांनी आपल्या शंभर दिवसांच्या सरकारची असफलता लपवण्यासाठी केला आहे. वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुमला देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुब्बा रेड्डी हेही मैदानात उतरले आणि त्यांनी सांगितले की 'नायडू यांनी तिरुमला मंदिराच्या पावित्र्याचा भंग केला आहे. कोट्यवधी हिंदूच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या.' इकडे आंध्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शर्मिला रेड्डी यांनी याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून, या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा आग्रह धरला आहे. अशा संवेदनशील विषयावर राजकारण होता कामा नये, असे त्या म्हणतात.
संसदीय समिती सदस्य या नात्याने मी तिरुमला देवस्थानच्या कामकाजाचा अनुभव घेतला आहे. तिथले स्वयंपाकघर बहुस्तरीय आणि पवित्र आहे. देवस्थानच्या परिसरातच एक प्रयोगशाळा असून, तिथे प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी होते. प्रसादाचे दररोज प्रमाणीकरण होते, त्यानंतरच तो भक्तांना वाटला जातो. अशी कडेकोट व्यवस्था असताना प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाची गुणवत्ता काय आहे, हे कुणाला कळणार नाही, हे कसे? हा मजकूर मी लिहीत असताना समाजमाध्यमांवर एक मुद्दा चर्चिला जातो आहे. म्हणे, एका विशिष्ट ब्रँडचे तूप या लाडूत वापरले जात होते; परंतु वास्तवात ते तसे कधीही वापरले गेलेले नाही. याचा उल्लेख मी अशासाठी करतो आहे की, अपूर्ण माहितीमुळे काही लोक अफवा पसरवण्यात यशस्वी होतात. काही लोक अफवांचे खंडन करण्यातही यश मिळवतात. वालाजीच्या एका भक्ताने आणखी एका विषयाकडे माझे लक्ष वेधले. नायडू सरकारने १४ जूनला श्यामला राव यांना कार्यकारी अधिकारी नेमले आणि त्यांनी २१ जूनला समाजमाध्यमांवर एक फोटो टाकून त्यांनी विचारले, 'शुद्ध तुपात तयार झालेले लाडू खाऊन पाहिलेत?' लोकांच्या श्रद्धेवर हल्ला करणे खूप सोपे असते; परंतु अशा हल्ल्यांच्या जखमा फार खोलवर होतात. त्या लवकर भरून येत नाहीत. ही जखम तशीच आहे. जे झाले ते अत्यंत दुर्दैवी आहे. अशा संवेदनशील विषयांवर प्रयोगशाळेत आधी परीक्षण करायला हवे होते, त्यानंतरच टिप्पणी करणे ठीक ठरले असते. सरकारला हे सहजच करता आले असते. कुठलीही तपासणी न करता अफवा पसरवणे योग्य नाही, धर्म, जात, भाषा आणि रंगाच्या आधारे राजकारण अयोग्य आहे. आता तर देवाचा प्रसादही राजकारणाच्या कचाट्यात सापडला. हे परमेश्वरा, अशा राजकारणाला माफ कर. शक्य झाले तर यांना थोडी सद्बुद्धी दे. कमीतकमी देवाला तरी राजकारणात ओढू नका.