- किरण अग्रवाल
जोरदार पावसामुळे बहुतेक ठिकाणच्या रस्त्यांवरील डांबर वाहून गेले असून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अस्थिरोगाच्या समस्यांना निमंत्रण देणाऱ्या या डांबरटपणाचे यंत्रणांकडून ऑडिट केले जाणार, की निसर्गाच्या अवकृपेकडे बोट करून विषय सोडून दिला जाणार हाच खरा औत्सुक्याचा प्रश्न आहे
पाऊस म्हटला की नदी-नाल्यांना पूर येतोच व पूर आला की त्यात एक-दोन ठिकाणचे पूल वाहून जातातच. दळणवळणाच्या दृष्टीने काही गावांचा संपर्क तुटतो, ग्रामस्थांना हालअपेष्ठांना सामोरे जावे लागते आणि पुन्हा नवीन पूल बांधणीचे सोपस्कार सुरू होतात. या सर्व धबडग्यात प्रश्न असा उपस्थित होतो, की पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या पुलांचे वा रस्त्यांचे ऑडिट सरकारी यंत्रणेकडून कधी केले जाते की नाही? कारण म्हणायला पूल, रस्ते वाहून जात असले, तरी एकप्रकारे सामान्यांचा पैसाच त्याद्वारे वाहून जात असतो. पण, या विषयाकडे तितक्याशा गांभीर्याने कुणी बघताना दिसत नाही. ना यंत्रणा, ना लोकप्रतिनिधी.
मुंबईसह वऱ्हाडाच्याही विविध भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चांगलीच दाणादाण उडविली आहे. हा पाऊस बळीराजाला सुखावणारा आहे खरा, परंतु अनेक ठिकाणी पेरणी झालेल्या शेतात पावसाचे तळे साचल्याने व काही ठिकाणी, तर शेतजमीनच खरडून गेल्याने संबंधितांच्या डोळ्यांतही पाणी आले आहे. अकोला जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णासह बुलडाणा व वाशिम जिल्ह्यामधील नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झालेला आहे, त्यामुळे काहींचे जनजीवन प्रभावित होणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे. अर्थात, निसर्गाचा हा विषय आहे, तो आपल्या हातचा नाही; परंतु यानिमित्ताने जी दैना उडून जाते किंवा अडचणी उद्भवतात त्यातून पुरेसा बोध घेतला जाताना दिसत नाही आणि परिणामी ''मागील पानावरून पुढे'' याप्रमाणे अडथळे सोसावे लागतात. यंदाच्याही पावसाळ्यात तेच होताना दिसत आहे, हे दुर्दैव.
पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका गतिमान असतो की तो भले भले अडथळे उद्ध्वस्त करीत त्यांनाही आपल्या सोबत वाहून नेतो. यात नदी-नाल्यांवर बांधले जाणारे छोटे फरशी पूल टिकाव धरूच शकत नाहीत. यंदाच्या या पहिल्याच पावसात अकोला जिल्ह्यातील पिंपळडोली येथील निर्गुणा नाल्याला आलेल्या पुरामुळे तेथील पूल वाहून गेला असून, पातुर तालुक्यातील ११ गावांचा संपर्क तुटला आहे. दोन महिन्यांपूर्वीच दुरुस्त केलेला सस्ती -चान्नी रस्त्यावरील वाघाली नाल्यावरचा पूलदेखील खचला आहे. इतरही भागात अशा पुलाला भगदाड पडल्याच्या लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. काय करणार, पाऊसच इतका मोठा होता की असे घडणारच! अशी मखलाशी करून यंत्रणा हात वर करतीलच; पण म्हणून मग या वाहून जाणाऱ्या पुलांचे ऑडिट तपासण्याची गरजच उरू नये का?
पुरात वाहून गेलेल्या पुलांचेच काय, पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे तर विचारू नका अशी परिस्थिती आहे. पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? याच्या उत्तरात मीठ व साखरेसोबत महापालिकेचे डांबर असाही पर्याय द्यावा; अशी थट्टा करणारे संदेश त्यामुळेच समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये रस्ता कोणता हे शोधून वाहन चालवावे लागते अशी एकूण स्थिती आहे. यावर होणारे अपघात आपल्या नजरेला पडतात, परंतु अपघात न होता ज्या वाहनधारकांची हाडे खिळखिळी होतात ते दुखणे त्या संबंधितालाच ठाऊक असते व त्याची कुठेही नुकसानभरपाई मिळत नसते. या रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार कुणास धरावे? पहिल्याच पावसात रस्त्यांची अशी वाट लागणार असेल तर ते रस्ते बनवताना संबंधित यंत्रणांनी त्यांच्या गुणवत्तेचे कोणते ऑडिट केले, असा प्रश्न उपस्थित होणे गैर कसे ठरावे?
दुर्दैव असे की, याबद्दल कोणीच काही बोलायला तयार नसते. निसर्गाचा फटका अशा गोंडस नावाखाली सारे काही खपवून नेले जाते. वेळोवेळी कामात घोटाळे करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकले जाते, पण पुढे त्याच यादीतील ठेकेदार पांढऱ्या चेहऱ्याने समाजात कधी वावरू लागतात हे कळतही नाही. सरकार जागेवर नाही, यंत्रणाही दारात उभे करत नाही; मग कुणाकडे तक्रार करणार? ज्यांच्याकडे तक्रार घेऊन जावे तेच झारीतले शुक्राचार्य असतील तर तक्रारीचा निपटारा तरी कसा होणार? ''सब गोलमाल है...'' यावर विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर उरू नये अशी ही स्थिती आहे.
सारांशात, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने सुखावले असले, तरी काहींच्या डोळ्यांत अश्रूही आणून ठेवले आहेत. सरकार काय मदत करेल न करेल ते नंतर दिसेलच, परंतु आज किमान अश्रू पुसण्यासाठी मदतीला धावून जाताना तर दिसा! तेच पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही. पावसाच्या व थंडी-तापाच्या व्हायरलच्या भीतीने सारेच जण घरात दडून बसले तर कसे व्हायचे?