नोटेवर कोणाचे चित्र असावे, अशी चर्चा सुरू होणे आश्चर्यकारक नाही. जिये नको ते मुद्दे प्राधान्याचे होतात आणि महत्त्वाचे विषय मागच्या बाकांवर जाऊन बसतात, अशा वातावरणात हे अपेक्षित आहेच; पण ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे छायाचित्र नोटेवर आहे, ते गांधी आपल्याला नीट समजले आहेत का? 'ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान' ही गांधींची प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचली आहे का? अमेरिकेचे अध्यक्ष असताना बराक ओबामा म्हणतात, 'तुमच्याकडे मिल्खासिंग असतो, शाहरूख खान असतो आणि, मेरी कोमही असते! ही भारताची सुंदर गोष्ट आहे. पण, आपल्यालाच ही गोष्ट समजली आहे का?
समजली असती, तर एका धर्माच्या मेळाव्यात दुसऱ्या धर्मावर बंदी घालण्याची हिंसक भाषा झाली नसती. राजकीय पक्षांनाच काय, केंद्र आणि राज्य सरकारांनाही संविधानाचा विसर पडला नसता, तर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ आली नसती. विखारी भाषण हा आपल्या राजकारणाचा स्वभाव झाला नसता. विखारी भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना तीन वर्षे तुरुंगवास ठोठावला जाणे, हा या पार्श्वभूमीवर फारच महत्त्वाचा निकाल. आझम खान हे उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे नेते. समाजवादी पक्षात त्यांचा मोठा दबदबा. अर्थात, जमीन बळकावणे, भ्रष्टाचार अशा अनेक आरोपांमुळे त्यांनी वेळोवेळी तुरुंगाची हवा खाल्ली आहे; पण आझम खान यांना झालेली ही ताजी शिक्षा वेगळ्या संदर्भातील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत २०१९ मध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. द्वेष आणि विखार पसरवणारी अशी भाषणे असह्य आहेत, असंवैधानिक आहेत, त्यावर तातडीने कारवाई करायला हवी, असे साक्षात सर्वोच्च न्यायलयाने नुकतेच सुनावले होते. केंद्र सरकारसह काही राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने एका अर्थाने खडसावले होते. राजकारणाची परिभाषाच हल्ली बदलली आहे. विखार ही मातृभाषा वाटावी, एवढा स्तर घसरला आहे. ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य असे म्हटले जात असे, तिथेही ज्या भाषेत नेते परस्परांविषयी बोलतात ते धक्कादायक आहे. राजकीय विरोध असतानाही मैत्री जपणे हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्वभाव होता.
यशवंतराव चव्हाण आणि रामभाऊ म्हाळगी या नेत्यांचे पक्ष वेगळे होते. मात्र, दोघांनीही एकमेकांचा सदैव सन्मान राखल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. शरद पवार आणि एन. डी. पाटील हे जवळचे नातेवाईक; पण परस्परांच्या विरोधात भूमिका मांडताना त्यांच्यातील नाते आडवे आले नाही. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे पक्ष वेगळे असूनही त्यांचे मैत्र अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले. त्याच महाराष्ट्रात आज नेते ज्या भाषेत एकमेकांवर घसरतात, ते क्लेषकारक आहे. महाराष्ट्राची ही स्थिती, तर अन्यत्र काय असेला असहिष्णुता आणि अनुदारता याच पायावर राजकारण उभे राहिल्यावर आणखी वेगळे काय होणार? कधी एखाद्या धर्माच्या विरोधात, तर कधी जातीच्या वा भाषेच्या संदर्भात, कधी महिलांच्या अनुषंगाने, तर कधी व्यक्तीबद्दल केली जाणारी विखारी विधाने हे आपल्या समकालीन राजकारणाचे व्यक्तिमत्त्व आहे.
आझम खान यांना झालेली शिक्षा म्हणून महत्त्वाची आहे. वैविध्यातील एकात्मता हे ज्या देशाचे अधिष्ठान आहे, धर्मनिरपेक्षता आणि समता बंधुता हाच ज्या संविधानाचा पाया आहे, तिथे या प्रकारचा द्वेष दिसणे काळजीचे आहे. देशातील अल्पसंख्याकांच्या विरोधातील द्वेषयुक्त भाषणांमुळे वातावरण खराब होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. भाजपचा कोणी नेता एखाद्या समुदायाबद्दल विखारी भाष्य करतो. कधी धर्मसंसदेमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरले जातात. एकविसाव्या शतकात काय चालले आहे? धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोहोचलो आहोत?' असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता.
धर्मनिरपेक्ष देशासाठी ही वेळ अत्यंत धक्कादायक असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. मुस्लिमांसंदर्भात द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, तेव्हा न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले होते. मुद्दा एका पक्षाचा नाही. कधी समाजवादी पक्षाचे कोणी आझम खान असतात, कधी भाजपचे कोणी प्रवेश वर्मा असतात; पण मूळ मुद्दा असतो द्वेषाचा आणि विखाराचा, धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांना अद्यापही भारताची गोष्ट' का समजू नये?