- राजा मानेअभाअपा संघटनेच्या मागणीचा इंद्रदेवांना आदर करावाच लागला, परलोकी ही संघटना तशी पॉवरबाजच! अभाअपा (अर्थात, अखिल भारतीय अजरामर पात्र संघटना) संघटनेचे सदस्यत्व केवळ कला क्षेत्रातील अजरामर पात्रांनाच मिळाले. परलोकीच्या या संघटनेने परग्रहावरील आमीर खान-राजू हिराणीच्या पीकेलासुद्धा संघटनेचे सदस्यत्व नाकारले होते. अशा संघटनेच्या सदस्यांनी भारतभूमीतील निवडणूक दिवाळसणाची पाहणी करण्यास जाण्याची मागणी मान्य होऊ नये, यासाठी नरदांनी भरपूर गेमा केल्या, काड्या केल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट इंद्रदेवांनी अभाअपाची मागणी मान्य केली, पण सोबत गाइड म्हणून झेलेअण्णांना नेण्याचा जीआर काढला आणि अनंत माने यांच्या एक गाव बारा भानगडी, रामदार फुटाणे नानांच्या सामनामुळे झेलेअण्णांचा प्रोफाइल स्ट्राँग होताच, पण बाई वाड्यावर या... या डायलॉगमुळे झेलेअण्णाचा बायोडाटा उठून दिसला अन् इंद्रदेवांनी त्यांना नमो-रागा रण निरीक्षण मंडळाचे गाइड बनविले.मंडळाचे पहिले निरीक्षक ए.के. हंगल ‘शोले’चे इमाम साहेब व झेलेअण्णा मराठीभूमीत दाखल झाले. इमाम साहेब ठार आंधळेच असल्यामुळे त्यांच्या हातातील काठीचे टोक झेलेअण्णांच्या डाव्या हातात होते. अण्णा पुढे आणि इमाम साहेब काठी धरून मागे... मुंबापुरीसह खान्देशाची रपेट सुरू होती. डाव्या हातात काठीचे टोक आणि उजव्या हातात गळ्यात अडकविलेले मोबाइल घेऊन अण्णा इमाम साहेबांना खडान्खडा माहिती देत होते, ऐकवत होते. दिवसभर हा सिलसिला चालूच राहिला. इमाम साहेब मात्र गप्पच होते. त्यांच्या तोंडातून चकार शब्द निघत नव्हता... अखेर वैतागून अण्णाच बोलले, ‘काय राव इमाम साहेब कुछ तो बोलो!’ त्यावर इमाम साहेब बोलते झाले, ‘भाई झेलेअण्णा, इतना सन्नाटा क्यों है भाई...’ हे शब्द कानावर पडताच अण्णा चक्क खेकसलेच ! सन्नाटा? इतना गोंधळ सुनाया अन् तुम बोलताय सन्नाटा! जळगावला वो कमलवालों का मारामारी, सुनाया, गिरीशभाऊ का अॅक्शन रोल बताया.
इतना सन्नाटा क्यों है भाई?
By राजा माने | Updated: April 16, 2019 04:47 IST