धर्मराज हल्लाळे
आईने डोक्याला जास्त तेल लावले म्हणून मुलीची आत्महत्या... पालकांनी मोबाईल गेम खेळू दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या... या ताज्या घटना मन सुन्न करणाºया आहेत. देशभरात दरवर्षी लाखावर आत्महत्या होतात. त्यातील ५० टक्के आत्महत्या या १५ ते ३५ वयोगटातील आहेत. ज्यांनी आपले परिपूर्ण आयुष्यही पाहिले नाही, ती चिमुकली मुले, तरुण शेवटचा मार्ग अनुसरतात, हे चिंताजनक आहे.
मुले-तरुणांच्या आत्महत्यांमागील कारणे अनेक आहेत. मात्र प्रश्न आहे तो, या सामाजिक समस्येतून सुटका कशी मिळवायची? महाराष्ट्रात ‘विवेक वाहिनी’ युवक चळवळीने युवा मानस मैत्री अभियान हाती घेऊन आयुष्याची पणती जपून ठेवण्याचा जागर सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या पुढाकारातून मानसमित्र घडत आहेत. ज्यावेळी सर्वसाधारण कारणांमुळे मुले आपला जीव देतात, त्यावेळी समाजमन हादरते. इतकेच नव्हे, मुलांच्या आत्महत्येमागची कारणे प्रत्येक जण आपल्या घरात शोधू लागतो. एवढ्याशा गोष्टीसाठी त्या मुलाने अथवा मुलीने टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न प्रत्येक पालकाला सतावतो. परंतु यातून मार्ग कसा काढायचा, हे सूचत नाही. रागावले तर टोकाची भूमिका, समजावून सांगितले तर ऐकत नाही, या कोंडीमध्ये पालक वर्ग सापडला आहे. अशावेळी युवा मानस मैत्री अभियान दिलासा देणारे ठरणार आहे. त्याची सुरुवात म्हणून राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ५० महाविद्यालयात युवक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले. निश्चितच विवेक वाहिनी, डॉ. हमीद दाभोळकर यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत. परंतु प्रश्न आहे तो, व्यापक पातळीवर हा विषय मांडण्यासाठी शासन आणि समाजाचा सहभाग कितपत आहे व राहील? विद्यार्थी, तरुणाच्या आत्महत्या झाल्या की काही काळ चर्चा होते. प्रश्न मांडले जातात. परंतु या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही; किंबहुना या प्रश्नावर नियंत्रण प्रस्थापित करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. मुलांना येणारे ताणतणाव नेमके कोणत्या स्वरुपाचे आहेत? स्पर्धा, वाढत्या वयानुसार आकर्षण, प्रेम, नैराश्य या विषयावर बहुतेक कुटुंबात बोलण्याची सोय नाही. काही उदाहरणांमध्ये पालक आणि मुलांत विसंवाद आहे. नेमकी ही अडचण युवा मानस मैत्री अभियानाने जाणली आहे. प्रशिक्षित युवक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना समजावून सांगतील की, मन म्हणजे काय? शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडते. त्यासाठी पहिली पायरी संवाद आहे. गरजेनुसार समुपदेशन आणि त्याही पुढे जाऊन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आजही मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे वेगळ्या भावनेने बघितले जाते. एकंदर ही सामाजिक दृष्टी बदलविण्याची गरज आहे.
वर्षभरात एक हजार मानस मित्र-मैत्रीण तयार करण्याचा निर्धार युवा मानस मैत्री अभियानाने केला आहे. सोशल मीडियाकडे तरुणांचा असलेला ओढा लक्षात घेऊन त्याद्वारेही हे अभियान चालविले जाणार आहे. याच धर्तीवर काम करणाºया व्यक्ती, संस्था आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सरकारी यंत्रणेने बळ दिले पाहिजे. विशेषत: शालेय व उच्च शिक्षण खात्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये या उपक्रमांचा अधिकृत समावेश केला पाहिजे. विवेक वाहिनीसारख्या संस्थांना सोबत घेऊन आत्महत्येसारख्या गंभीर प्रश्नावर, शासनाने गांभीर्याने यंत्रणा राबविली तर येणाºया काळातील चित्र अधिक आशादायी बनेल. शाळा-महाविद्यालयात नानाविध उपक्रम राबविण्यासाठी सरकार रोज नवनवीन परिपत्रके जारी करते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना जीवनाधार देणारा एखादा आणखी एक निर्णय का घेऊ नये?