- बाळकृष्ण शिंदे, पुणे
‘रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ (आरआरटीपी) या योजनेंतर्गत नव्या जलदगती रेल्वे गाड्यांचे नामकरण ‘नमो भारत’ असे करण्यात आले आहे. यावरून भाजपवर चौफेर टीका होऊ लागली आहे. वास्तविक आधीच्या विशेषत: काॅंग्रेस पक्षाच्या सरकारांनी आपल्या सर्व योजना तसेच सरकारी इमारती, संस्था, मैदाने आदींची नावे ‘गांधी’ घराण्यातील सदस्यांवरून ठेवली हा भाजपचा मुख्य आक्षेपाचा आणि प्रचाराचा मुद्दा असे. तथापि, सध्या देशात अनेक गोष्टींची नावे बदलण्याचा सपाटा सुरू आहे. देशात नेहरू - गांधी घराण्याने सर्वाधिक काळ राज्य केले आणि त्यासाठी सरकारी विविध योजनांना, इमारतींना, संस्थांना गांधी- नेहरू यांची नावे दिली, हे खरे असले तरी ही सर्व नामकरणे झाली ती मृत्यूपश्चात; पण याबाबत इतर पक्ष आपल्या पासंगालाही पुरणार नाहीत इतके आपण स्वप्रतिमेत आणि प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट करण्याच्या कामात गुंतलेले आहेत हे सरकार सातत्याने दाखवून देत आहे. नव्या जलदगती रेल्वेचे ‘नमो भारत’ नामकरण हे त्याचेच उदाहरण आहे. काॅंग्रेस पक्षाचा ब्रिटिशांविरोधात निर्णायक सहभाग असूनदेखील या पक्षाच्या नेतृत्वाने कधी ब्रिटिशकालीन इमारती, रस्ते, संस्था यांची नावे बदलण्यासारखी ‘खुजी’ उठाठेव केली नाही; पण भाजप सरकार काॅंग्रेस काळातील योजनांची नावे बदलत नव्या रूपात आणत आहे. ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव या सरकारने ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले आहे, हेदेखील याच प्रकारचे एक बोलके उदाहरण ठरावे.