अंधश्रद्धा अन् त्याद्वारे होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढणाºया नि:शस्त्र डॉ़ दाभोलकरांची बंदूकधाºयांना भीती का वाटली? माथेफिरूंनी पुन्हा एकदा हत्या करून विचार संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला़ डॉ़ दाभोलकरांच्या हत्येनंतर गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे न थांबलेले किंबहुना वेगाने पुढे आलेले काम हे खून करून विचार संपत नाही, याची ग्वाही देणारे आहे़ डॉ़ दाभोलकर नेमके कोणते काम करत होते व त्यांचे कुणाला भय वाटत होते ही बाब स्पष्ट आहे़ राज्यघटनेने प्रत्येकाला धर्म उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे़ त्याच चौकटीत राहून डॉ़ दाभोलकरांनी चळवळ वाढविली़ प्रारंभापासून अंधश्रद्धांद्वारे होणाºया शोषणाविरुद्ध त्यांनी प्रहार केले़ महाराष्ट्रातील थोर संत परंपरा आणि त्यांच्या विचारांना समर्पकपणे मांडून जनमानसात चिकित्सक वृत्ती जागृत केली़ बुवाबाबांना लोक प्रश्न विचारू लागले़ भोंंदूगिरीचा भंडाफोड झाला़ इथपर्यंत डॉ़ दाभोलकरांचे काम चांगले आहे आणि त्यांनी ते करावे हे सर्वमान्य होते़ परंतु, जेव्हा चळवळ धर्मचिकित्सेच्या दिशेने जाऊ लागली तेव्हा तथाकथित धर्मरक्षकांना डॉ़ दाभोलकर आणि त्यांची चळवळ धर्म बुडवायला निघाली आहे, असे वाटू लागले़ त्यामुळे अनेकदा धमक्या दिल्या़ तोंडाला काळे फासले़ जाहीर सभेत गोंधळ घातला़ धक्काबुक्की केली़ तद्नंतर डॉ़ दाभोलकर डगमगत नाहीत, हे पाहून टीका कठोर होऊ लागली़ ज्यावेळी जादूटोणाविरोधी विधेयक समोर आले, त्यावेळी तर हा कायदा विशिष्ट धर्माविरुद्ध केलेले षड्यंत्र असल्याचा कांगावा झाला़ परिणामी, डॉ़ दाभोलकर व चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना १८ वर्षे लढा द्यावा लागला़ एकीकडे हा कायदा धर्म, श्रद्धा व देवाविरुद्ध आहे, असा अपप्रचार झाला होता़ मात्र पहिला गुन्हा अल्पसंख्याक समाजातील बाबाविरुद्ध दाखल झाला़ फिर्याद देणारा त्याच समाज घटकातील अन् तपास करणारा अधिकारीही अल्पसंख्याक होता़ तात्पर्य कायदा लोककल्याणासाठी म्हणजेच शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी अस्तित्वात आला होता़ तो विशिष्ट धर्माविरुद्ध नव्हता़ भोंदूगिरीला विधेयकाने लगाम लावला असला तरी चमत्कार करणाºया भोंदूपर्यंतच अंधश्रद्धा सीमित नाही़ ज्यावेळी कूप्रथांवर प्रहार होतात़, त्यावेळी काहींना समाज प्रबोधन, विधायक हस्तक्षेप ही धर्मक्षेत्रातील घुसखोरी वाटते़ ज्यांना माणुसकी धर्म, सर्वधर्मसमभाव अमान्य असतो़, अशा प्रवृत्ती विचारांना विचारांनी उत्तर देऊ शकत नाहीत़ शिवाय, डॉ़ दाभोलकरांसारख्या सुधारकांच्या प्रबोधनामुळे लोकभावनाही जागृत होते़ हेच नेमके कथित धर्मरक्षकांना खुपते़ पाच वर्षानंतर का होईना डॉ़ दाभोलकरांच्या हत्येचे स्पष्ट धागेदोरे मिळाले़ याआधी सापडलेले संशयित आणि औरंगाबादेतून अटक केलेल्या आरोपीचा जबाब हत्येच्या सूत्रधारांपर्यंत जाईल, परंतु जोपर्यंत आरोपींवर सबळ पुराव्यानिशी खटला चालविला जाणार नाही आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर होणार नाही़
दाभोलकरांची भीती का वाटली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 6:31 AM