- कपिल सिब्बल
आपण ज्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत, त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या लोकांनी केलेला संघर्ष, त्याग याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने करून दिली आहे. १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भय-स्मृती दिवस’ म्हणून पाळायला त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच तो योगायोगाने येतो. मोदी यांचा संदेश खणखणीत आणि स्पष्ट आहे. देशाच्या फाळणीच्या वेळी लाखो लोक बेघर, विस्थापित झाले, हजारोंना प्राण गमवावा लागला... त्यांची होरपळ आम्ही कशी विसरू? - असे त्यांना सुचवायचे आहे. द्वेष आणि हिंसाचाराच्या आगीत लोकांचे सर्वस्व गेले होते. सामाजिक गटतट, वैरभावाचे विष काढून टाकून ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवी सबलीकरण होऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले. एकोपा, सामाजिक सलोख्याचे महत्त्व त्यांनी सांगितले याबद्दल मला खरेच समाधान वाटले.
भारत हा विभिन्नतेचा गोफ असलेला देश आहे. अनेक जाती, धर्म, पंथ, परंपरा येथे नांदतात. सामाजिक सलोखा असल्यानेच इथली कॅलिडोस्कोपिक संस्कृती खुलते; पण अलीकडे मात्र सरकार आणि भाजप, असे दोघेही आपली भाषिक, सांस्कृतिक विविधता जपण्याऐवजी दादागिरीची मानसिकता वाढवत नेण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसते. २०१४ मध्ये मोदी यांची राजवट आल्यापासून हेच प्रत्ययाला येते आहे. कोणत्याही सुसंस्कृत संस्कृतीत स्वीकार होणार नाही, असा जातीय छळ होत असल्याच्या अनेक घटना डोळ्यासमोर तरळून जातात. दुर्बलांना भरचौकात ठेचून मारले जाते. कशावर तरी निष्ठा हे एवढेच त्यांचे पाप. सरसकट निर्दय अशी गुंडागर्दी खुलेआम होत राहते. त्याची चौकशी क्वचितच होते. एका राज्यात गेली चार वर्षे दर दहाव्या दिवशी गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्यांचे एन्काउंटर केले जाते, असे म्हणतात. या सर्व घटना लोकांच्या देखत खुलेपणाने घडतात. मनाप्रमाणे लग्न करू इच्छिणाऱ्या भिन्नधर्मीय प्रेमी युगुलांना तर ‘लव्ह जिहाद’च्या आक्रस्ताळ्या धाकामुळे धडकीच भरली आहे. मोदींच्या काळात भारतात एकोप्याऐवजी दुजाभाव, सामाजिक सलोख्याऐवजी असहिष्णुता फोफावू दिली जाते आहे.
फाळणीच्या वेळी झालेले लाखोंचे स्थलांतर आणि बेलगाम हिंसा ही कदाचित विसाव्या शतकातील सर्वांत मोठी शोकांतिका होती. घरेदारे सोडून आलेल्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले, त्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. दुर्दैवी स्थितीत गेलेले बळी, निवारा टाकून परागंदा व्हावे लागणे, यामुळे ज्यांनी ते थेट भोगले तेच नव्हे, तर हा संहार पाहणाऱ्या आबालवृद्धांच्या संवेदना गोठून गेल्या होत्या. दोन्ही देशांतील लोकांच्या वाट्याला हे दु:ख आले. त्या जखमा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आल्या. फाळणीच्या आठवणी बाळगणारे आज एकतर ती वेदना पचवून शांतपणे जगण्याला सामोरे जाताना दिसतात किंवा प्रियजनांच्या वियोगाने रागद्वेषाने फणफणत राहतात. डोके ठिकाणावर असलेला कोणीही माणूस या अमानवी हिंसेचे समर्थन करणार नाही.
फाळणीत मीही माझे आजोबा- आजी गमावले आहेत. ते माझ्या आईचे आई-वडील. त्यांना मी पाहिलेही नाही. कारण मी ४८ साली जन्माला आलो. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अज्ञातांविरुद्ध मी मनात द्वेष धरून ठेवू शकतो किंवा कुटुंबाच्या वाट्याला आलेली दु:खद घटना म्हणून सोडून देऊ शकतो. आज त्या नुकसानाचा बदला घ्यायचा झाला, तर लक्ष्य कोणाला करायचे? तसे म्हटले तर व्यक्तींना नव्हे, हिंसेला हिंसेने उत्तर देऊ पाहणाऱ्या मानसिकतेला लक्ष्य करावे लागेल. आज जे भारतात राहत आहेत, त्यांच्याकडे मी का बोट दाखवीन? त्यांनी काही केलेले नाही. घडल्या घटनेला जे जबाबदार नाहीत त्यांच्यावर काय सूड उगवायचा?
- पंचाहत्तर वर्षांपूर्वीच्या माझ्या वैयक्तिक कौटुंबिक शोकांतिकेचा मी आज बदला घ्यायला मी गेलो तर निरपराधांनाच लक्ष्य केले जाणार. मग पंतप्रधान ज्यांची आठवण काढायला, ठेवायला सांगत आहेत त्या भयावह घटना मी का आठवायच्या? ते आठवून ज्यांचा त्या भयावहतेशी संबंध नाही अशांना मी का यातना द्यायच्या? सीमेपलीकडच्यांनाही हाच न्याय लागू आहे. त्यांनीही अशाच रीतीने आप्तस्वकीय गमावले. द्वेष पसरवून मी माझ्या दु:खाचा गुणाकार करू इच्छित नाही. त्यातून पुन्हा दु:खच जन्माला येईल, हे मला माहिती आहे.या दुर्दैवी घटनांपासून काही शिकायचे असेल तर पंतप्रधान सांगतात ते न ऐकणे हाच त्यावरचा खरा मार्ग आहे. आपल्याला एकत्र राहायचे आहे, एकोपा वाढवायचा आहे. १४ ऑगस्ट हा ‘फाळणी भय-स्मृती दिवस’ म्हणून लक्षात ठेवून तो वाढणार नाही.
हिंसेच्या नंगानाचात महात्म्याची हत्या झाली हे आपण विसरलो तर ते कसे चालेल? गांधींना मारणाऱ्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला जातो याचा अर्थ ती मानसिकता आजही मौजूद आहे. उलट फुटीरतावादी कार्यक्रमांना खतपाणी घालणाऱ्या कृत्यांपासून आपण दूर राहिले पाहिजे. काही लोक अशा दुर्दैवी घटनांचा, भयाचा वापर एकोपा वाढवण्यासाठी नव्हेतर, द्वेष पसरवण्यासाठी करतात. त्यातून निवडणुकीत फायदा होत असेल कदाचित; पण, एकोप्याला तडा जातो. ज्यांना या देशात राहण्याचा हक्क आहे त्यांच्याशी आपण एकतेने, सहिष्णूतेने वागले पाहिजे. शोकान्तिकांचे राजकीय भांडवल करण्याची गरज नाही. दु:ख पचवून लोकांचे भले करण्याची गरज आहे. भूतकाळापासून धडा घेऊन शांततेबद्दल बोलले पाहिजे.
मनाचे तालिबानीकरण हा एकोपा आणि सामाजिक सलोख्याचा खरा शत्रू आहे. काबूलमध्ये ते घडताना आपण डोळ्यांनी पाहत आहोत. आधीच्या राजवटीतील लोकांना लक्ष्य करून हिंसा भडकवल्याने अफगाणी लोकांच्या मनात भय पसरले आहे. हुकूमशाही राजवटीचे ‘भय’ हे महत्त्वाचे हत्त्यार असते. राजवटीचा हुकूम पाळला गेला पाहिजे म्हणून लोकांच्या मनात सतत भय पेरले जाते. पंतप्रधानांनी १४ ऑगस्ट हा ‘फाळणी भय-स्मृती दिवस’ पाळायला सांगितल्याचे या पार्श्वभूमीवर मला वाईट वाटते. त्या काळात ज्यांनी आपले आप्त गमावले त्यांना माझे एकच सांगणे आहे : जे गेले त्यांच्या आठवणी आपण भविष्यकाळाचा विचार करून जागवू या. भूतकाळाला जखडून राहून नव्हे!