महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने सत्तेवर येताच राज्यात गोवंश हत्याबंदी करण्याची घोषणा केली व आपल्या कडव्या गोभक्तांना आणि नागपुरातल्या संघाच्या गादीला प्रसन्न केले. त्याच्यापाठोपाठ आपली बुद्धी जराही न वापरता हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारनेही तशीच घोषणा करून महाराष्ट्राच्या आरतीला टाळी दिली. नंतरच्या काळात आणखीही काही भाजपशासित राज्यांनी तसे आदेश जारी केले. राजस्थानचे एक न्यायमूर्ती महेशचंद्र शर्मा यांनी गाईच्या देहात ३३ कोटी देवांचा वास असल्याने तिला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचे व तिच्या मांसाहारावर राष्ट्रीय बंदी घालण्याचे आदेश आपल्या निकालपत्रातच देऊन टाकले. एकेकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी, आपण सूक्ष्मदेहाने साऱ्या देशातच नव्हे तर अंतरिक्षासह सबंध विश्वात नेहमीच फिरत असतो, असे एका भाषणात सांगितले. पुढे जाऊन आपल्या एका पुस्तकातही त्यांनी तसे लिहिले. तात्पर्य, अशी श्रद्धेच्या आंधळ्या पातळीवर जाणारी विचारशून्य माणसे जेव्हा अधिकारपदावर येतात तेव्हा त्यांचे म्हणणे देशाने व समाजाने शिरोधार्ह मानायचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. श्रद्धा माणसाला श्रावणीच्या नावाखाली शेणही खायला लावते. म्हणून शेणाच्या पार्ट्या करायच्या नसतात आणि आम्ही श्रावणी करतो म्हणजे शेण खातो याचा अभिमानही मिरवायचा नसतो. परंतु अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्यांची देशात कमतरता नाही. त्यांनी गार्इंची हत्या करणाऱ्यांना, केवळ तशा संशयावरूनही मरेपर्यंत मारहाण केल्याच्या पराक्रमी कथा नंतर प्रकाशित झाल्या. गाय हा साधा पशू आहे हा सावरकरांचा विज्ञाननिष्ठ अभिप्राय या श्रद्धावानांना विचारात घ्यावासा वाटला नाही आणि गाईविषयीचे विवेकानंदांचे मतही त्यांनी कधी समजून घेतले नाही. इतर वेळी विनोबांची चेष्टा करणारी ही माणसे गाईसाठी मात्र त्यांना पुढे करताना आढळली. या साऱ्या उत्साहात देशाला लागू असणारे एक समग्र सत्य मात्र साऱ्यांनीच दुर्लक्षित केले. निम्मा भारत हे मांस खाणाऱ्यांचा आहे. तेलंगण, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक व केरळ या दक्षिणी राज्यातील अनेक जाती व जमाती तर ते खातातच शिवाय त्यातल्या अनेक राज्यांत ब्रह्मवृंदानेही ते वर्ज्य मानलेले नाही. केरळातील हॉटेलात जाणारी, जानवी घालणारी व कपाळाला ब्राह्मणी गंध लावणारी माणसेही नि:संकोचपणे बीफची मागणी करतात. मेघालय, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम व बंगालमध्येही गोमांस व गोवंशातील प्राण्यांचे मांस हा अनेकांच्या नित्याच्या जेवणातला भाग असतो. एक गोष्ट देशभरातील कष्टकरी व गरिबांच्या वतीनेही सांगितली पाहिजे. गोवंशातील पशूंच्या मांसाची किंमत कमी असते. १०० रुपयातही ते किलोभर खरेदी करता येते. तेवढे घरात आणून त्यातली सारी माणसे त्यावर आपली भुकेची व प्रोटिन्सची गरज भागवू शकतात. इतर प्राण्यांचे मांस ३५० ते ४०० रु. किलो या दराने बाजारात मिळते. ते त्यांनी कसे खायचे? शिवाय ज्या डाळींमधून प्रोटिन्सचा पुरवठा होतो त्यांचे भाव आकाशाला भिडले असतात. रोजचे हातावर कमावून खाणारी कुटुंबे ती कशी खरेदी करणार? पण गोवंशाबाबतचा हा निर्णय घेणाऱ्यांना दक्षिण वा पूर्व भारतासह देशातील या गरिबांचाही विचार करावासा वाटला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोडीत निघेल हेही त्यांनी मनावर घेतले नाही. वीस वर्षे जगणारी ही जनावरे दहा वर्षे काम देतात व नंतर ती नुसतीच जगवावी लागतात. ज्यांना गाई पोसाव्या लागत नाहीत आणि ज्यांच्या फ्लॅट संस्कृतीत गार्इंना जागा नाही त्यांना गार्इंच्या रक्षणाचा उपदेश इतरांना करणे सोपे आहे. कर्जाच्या भाराखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर गोवंशाच्या पालनाचा भार घालणे हे त्यांच्या न्यायात बसत असले तरी ग्रामीण जनतेच्या ते जिवावर उठणारे प्रकरण आहे. निकामी गाय व बैल विकून ती माणसे आपल्या संसाराला हातभार लावतात वा त्यात नवी जनावरे विकत घेतात. आता त्यावर हिंस्र बंदी आली असल्याने अशी जनावरे जंगलात सोडून देण्याखेरीज त्यांना काही करताही येत नाही. मेघालयच्या विधिमंडळात हा कायदा मागे घ्या, अशी मागणी केंद्राकडे करणारा ठराव याचमुळे परवा केला. त्याआधी केरळनेही तशी मागणी केली आहे. पण तेवढ्यावर हे प्रकरण थांबणारे नाही. ‘असे कायदे कराल तर सारा दक्षिण भारत द्रविडनाडू म्हणून देशातून बाहेर पडेल’ अशी भाषा दक्षिणी राज्यात बोलली जाऊ लागली आहे. आपल्या परिवाराला, एखाद्या जातिवृंदाला वा एखाद्याच प्रदेशाला जे भावेल ते साऱ्या देशावर लादण्याचा प्रकार येथे न चालणारा आहे. अठरापगड जाती-जमातींचा हा संस्कृतीबहुल देश खाण्यापिण्याच्या आपल्या जुन्या सवयी सांभाळून आहे. त्याला एका रेषेत आणून, सांगू ते खा व देऊ तेच ल्या असे माओ त्से तुंगासारखे सांगता येणे येथे अवघड आहे. राजनाथसिंहांनी आता आम्ही खाण्यापिण्याच्या सवयी कुणावर लादणार नाही असे म्हटले असले तरी ते संघ परिवाराला आवडेल की नाही हे सांगता येत नाही. अखेर महेशचंद्र शर्मा महत्त्वाचा की सावरकर, हा निर्णय सोपा नाही. गाय हा देश जोडू शकणारा प्राणी आहे असेच आजवर समजले गेले. तो देश विस्कळीत करणारा प्राणीही होऊ शकतो हे मात्र कधी फारसे लक्षात घेतले गेले नाही.
गोहत्येवरून देश वेठीला धरणार काय?
By admin | Published: June 16, 2017 4:19 AM