विजय दर्डा
पश्चिम बंगालमधील निवडणुकांवरून मोठमोठे दावे केले जात असताना भाजपमधल्या मित्रांना मी वारंवार म्हणत होतो, काहीही होवो, ममता बनर्जी हॅट्ट्रिक करणारच. कितीही प्रयत्न केले तरी भाजप दोन अंकी संख्येच्या पुढे नक्की जाणार नाही! एक राजकीय नेता म्हणून नव्हे, तर वास्तवाची जाण असलेला पत्रकार म्हणून माझ्याजवळ असलेल्या विश्लेषणाच्या आधारावर मला ही खात्री वाटत होती. ममतादीदींच्या राजकारणाचे मी नेहमीच सखोल विश्लेषण करत आलो आहे. त्या जमिनीशी, वास्तवाशी पक्क्या जोडल्या गेलेल्या नेत्या आहेत. पश्चिम बंगालमधून डाव्यांना उखडून फेकण्याचा कठोर अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी लाठ्या खाल्ल्या आहेत आणि चक्रव्यूह कसे भेदायचे असतात, हेही त्या नेमके जाणून आहेत. यावेळी भाजपने दीदींना उखडून फेकण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी वर्ष, दोन वर्षांपासून चक्रव्यूह आखले गेले होते. सर्व मोठे नेते, भाजपशी जोडलेल्या सर्व संघटना आणि रा.स्व. संघाने सगळी ताकद पश्चिम बंगालमध्ये पणाला लावली. हिंदू मतांचे ध्रुवीकरण केले गेले. त्यासाठी स्टार प्रचारक दिवस- रात्र राबले. संघाने राज्यात घरोघर संपर्क केला. साम, दाम, दंड, भेद या चाणक्य नीतीचा पुरेपूर वापर केला गेला. निवडणुका येता येता हवेचे रंग बदलू लागले. दीदींमुळे मोठे झालेले अनेक नेते भाजपच्या गोटात दाखल झाले. असे काही वातावरण तयार केले गेले की, दीदी तर यावेळी हरणारच! पण इतकी सहज हार मानतील, तर त्या दीदी कसल्या? आपली अग्निशिखावाली प्रतिमा वापरून त्यांनी त्यांच्यावर केल्या गेलेल्या प्रत्येक प्रहाराला चोख उत्तर दिले. आपला मतदारसंघ सोडून त्या नंदीग्राममधून उभ्या राहिल्या. शुभेंदू अधिकारी हे त्यांची साथ सोडून भाजपात गेलेले नेते नंदीग्राममधून उभे होते. भाजपाची रणनीती तेथे मात्र सफल झाली. ममता नंदीग्राममध्ये निवडणूक हरल्या.
निवडणुकीच्या काळात ममतांना अपघात झाला. त्यांच्या हालचाली मंदावल्या तरीही त्याच पश्चिम बंगालच्या सर्वमान्य नेत्या आहेत, हेच त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले! त्यांच्यावर आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीवर भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीचे भरपूर आरोप झाले तरी जनतेने मत मात्र ममतादीदींच्याच पारड्यात टाकले. किंबहुना दीदी पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने पुढे आल्या आहेत. दीदींना जर काँग्रेसची पूर्ण साथ मिळाली असती, तर त्यांच्या विजयाचे हे चित्र आणखीन प्रभावी झाले असते. काँग्रेसने पाचव्या फेरीत प्रचार बंद केला; पण तोवर ममतांचे जे नुकसान करावयाचे ते झाले होते. प्रारंभीच्या या चुकांमुळे मुस्लीम मतांचे विभाजन होण्याची शंका अधिक वाढली. त्याचा स्पष्ट फायदा अर्थातच भाजपला मिळाला. काँग्रेस आणि डाव्यांना पश्चिम बंगालमध्ये लाजिरवाणी हार पत्करावी लागली. अधीर रंजन चौधरी हे जाणत होते. मात्र, लोकांनी धर्मनिरपेक्ष शक्ती जिवंत ठेवण्यासाठी ममतांना मतदान केले, हे स्पष्टच आहे.
पश्चिम बंगालची ही निवडणूक राष्ट्रीय राजकारणात मोठे बदल घडवून आणू शकते; पण या विषयावर चर्चा करण्याआधी दुसऱ्या राज्यात काय झाले, हेही जरा पाहिले पाहिजे. ‘तुम्ही निदान आता तरी जनतेच्या भावना समजून घेऊन वागा,’ असे मतदारांनी काँग्रेसला स्पष्टपणे सांगितल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. जमिनीशी जोडलेल्या नेत्यांचा काँग्रेसने सन्मान करावा आणि पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे द्यावीत. केरळ एक असे राज्य आहे जिथे कुठलाही पक्ष लागोपाठ दुसऱ्यांदा सत्तेत आला नव्हता. पहिल्यांदाच डावे पुन्हा सत्तेवर आले. याचे कारण वास्तवाशी नाळ असलेल्या नेत्यांना काँग्रेसने बाजूला सारले आणि श्रेष्ठींच्या जवळ असलेल्या के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे नेतृत्व दिले. राहुल गांधी केरळमधूनच लोकसभेत निवडून आले आहेत. काँग्रेसने पुडुच्चेरीत नारायण सामी यांना लादल्यामुळे पुडुच्चेरी हातून गेले, असे विश्लेषक सांगत आहेत. सामी यांच्याबद्दलच्या नाराजीने सरकार गेले होते तरी काँग्रेसच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. तेथील सरकार आधीच बरखास्त करण्याची भाजपाची रणनीती सफल झाली.
आसाममध्ये काँग्रेसने बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला बरोबर घेऊन निवडणूक लढवली; पण ही रणनीती असफल झाली. हेमंत बिस्वा शर्मा लोकांशी पक्की नाळ जोडलेले नेते होते; पण ते भाजपात गेल्यामुळे काँग्रेसच्या हातातून सत्ता गेली आणि अजमल यांना बरोबर घेऊनही काँग्रेस चांगली कामगिरी करू शकली नाही. तामिळनाडूच्या बाबतीत सांगायचे, तर स्टॅलीन आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी माझे बोलणे झाले होते. प्रचारादरम्यान मी तेथे गेलो होतो. तेव्हाच हे स्पष्ट दिसत होते की, स्टॅलीन सत्तेवर येत आहेत. कारण गेली कित्येक वर्षे ते प्रत्यक्षात काम करत आहेत. जयललिता यांच्या जाण्यानंतर पलानी स्वामींचे सरकार भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपात फसले होते. त्याचा पूर्ण फायदा स्टॅलीन यांनी उठवला. भाजपाची मदत होऊनही अद्रमुक तेथे काही करू शकले नाही. काँग्रेस पक्ष तर स्टॅलीन यांच्या कृपेवर अवलंबून होता. स्टॅलीन काँग्रेसवर नाराज होते तरी सोनिया गांधींचा आदर करत त्यांनी काँग्रेसला २५ जागा दिल्या; पण त्यातूनही हाती काही लागले नाही.
चला, आता पुन्हा पश्चिम बंगालमध्ये जाऊ. तेथे दीदींनी मोठीच कामगिरी बजावली आहे; पण मुद्दा केवळ पश्चिम बंगालचा नाही. विरोधी पक्षांच्या राजकारणात त्यांनी एक नवी उमेद जागवली आहे. देशातल्या धर्मनिरपेक्ष शक्ती कशा एकत्र येतात आणि सोनिया गांधी कोणती रणनीती आखतात, हे आता पाहावे लागेल. पायी चालत त्या मायावतींच्या घरी गेल्या होत्या, तसे काही त्या पुन्हा करतील का? की प्रत्येक राज्याच्या सेनापतींना बरोबर घेऊन पुढे जाण्याची जुनी नीती अवलंबतील? यातून यूपीए-२ तयार होईल का? ज्यात शरद पवार संयोजक होऊन सर्वांना एका झेंड्याखाली आणण्यात यशस्वी होतील? अर्थात, आताच काही सांगता येणार नाही; पण पुढची लढाई भाजपाविरुद्ध धर्मनिरपेक्ष शक्ती नव्हे, तर ‘नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व’ अशी असेल, हे उघडच आहे. ममतादीदी आता कोणता रस्ता धरतात, याबद्दलही कुतूहल राहील.
चला, निवडणुका झाल्या; पण आता हा कोरोना प्रसादाच्या रूपात किती जणांपर्यंत पोहोचलाय आणि तो लोकांचे काय हाल करील, हा एक चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात कोरोना सर्वाधिक पसरला आहे, अशी देशभर भावना आहे; पण भारत सरकारने जाहीर केलेले आकडे काही वेगळेच सांगतात. ज्या राज्यात विधानसभा, पंचायत निवडणुका झाल्या तेथे निवडणुका आणि प्रचार सभांमुळे कोरोनाचा फैलाव भयंकर वाढला आहे. एप्रिलमध्ये आसामात ५,४१२%, पश्चिम बंगालमध्ये १,२६६%, केरळमध्ये १,२२९%, उत्तर प्रदेशात १,२२७%, तामिळनाडू ५६३%, तर पुडुच्चेरीत ३५९% कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यालाच म्हणतात घनघोर बेपर्वाई!
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनी काही स्पष्ट संकेत दिले आहेत.विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या विजयाने राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांमध्ये एक नवी उमेद निर्माण केली आहे. आता यूपीए-२ तयार होऊ शकेल का?त्याबाबतीत सोनिया गांधी कोणती भूमिका घेतील?’जनभावना जाणा आणि लोकांशी जोडलेल्या नेत्यांचा सन्मान करा’ असा संदेश या निवडणुकीत काँग्रेसलाही मिळालेला आहेच.
(लेखक लोकमत वृत्त समुहाचे एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)
vijaydarda@lokmat.com