भारत-पाकिस्तान दरम्यान ‘शटलींग’ करणारे आणि तो देश कसा सुधारतो आहे, तेथील लोक भारतीयांच्या गळ्यात पडायला कसे उत्सुक आहेत पण भारतातले लोकच कसे नतद्रष्टासारखे वागत आहेत अशी बौद्धिके देणाऱ्यांची आता या दुष्ट घटनेवरील प्रतिक्रिया काय आहे? कव्वाली गायनाच्या क्षेत्रात साब्री ब्रदर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्योपैकी अमजद साब्री यांची पाकिस्तानची मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीत बुधवारी हत्त्या करण्यात आली. ते ज्या मोटारीतून जात होते त्या मोटारीच्या मागून मोटार सायकलवर आलेल्या दोन अझात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्त्या केली. पूर्वीच्या अखंड भारतात इस्लामच्या जोडीनेच जो सुफी संप्रदाय भारतात आला तो संप्रदाय जितका मुस्लीमाना प्रिय तितकाच हिन्दूनाही प्रिय. अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे त्याचे ढळढळीत उदाहरण. पण इस्लाममध्ये जो मूलतत्त्ववाद अलीकडच्या काळात जोर धरुन राहिला आहे त्याला या साऱ्याचे वावडे. याच साब्री बंधूंनी मध्यंतरी सकाळच्या वेळी दूरचित्रवाणीवर कव्वाली सादर केली असता त्यांच्यावर खटला भरुन कव्वालीवर बंदी लागू करण्यात आली होती. त्यांच्यावर ठपका ठेवला गेला धर्म मोडण्याचा. सुफीयाना कव्वाली हा संगीत प्रकार विदेशातही अत्यंत लोकप्रिय असून साब्री बंधू वर्षाचा बहुतेक काळ युरोप आणि अमेरिकेत असतात. भारतात अलीकडच्या काळात त्यांचे नाव बातम्यात आले ते बजरंगी भाईजान या चित्रपटासाठी अदनान सामीने गायलेल्या कव्वालीने. ‘भर दे झोली मेरी या मुहम्मद’ ही कव्वाली मूळ साब्री बंधूंची असल्याने त्यांनी चित्रपटातील तिच्या समावेशाला हरकत घेतली होती. पण याच कव्वालीचे दुसरे चरण ‘लौटकर मै ना जाऊंगा खाली’ अमजद साब्री यांच्या हत्त्येमुळे पराभूत झाले आहे. परंतु यातील आणखी एक गंभीर बाब वेगळीच आहे. सध्या मुस्लीम धर्मीयांचा रमजान हा अत्यंत पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात सीमेवरील भारताच्या बाजूने कोणताही गोळीबार न करण्याचा संकेत वर्षानुवर्षे पाळला जातो आहे. पण याच मुबारक महिन्यात आणि तेही खुद्द ‘पाक’मध्ये एका उपासकाची हत्त्या करण्यात आली आहे.
‘लौटकर ना जाऊंगा’
By admin | Published: June 24, 2016 1:02 AM