- किरण अग्रवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेची तोफ डागत त्यांना आपला विरोध असल्याचे ठणकावून सांगतानाच आपला पक्ष लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, हेदेखील राज ठाकरे यांनी पुन्हा स्पष्ट केल्याने त्यांच्या भूमिकेबाबतचा संभ्रम तर दूर व्हावाच; परंतु या निवडणुकीत ते प्रचार मात्र करणार असल्याने त्यांच्या रूपाने विरोधकांना ‘स्टार प्रचारक’ लाभून जाणार असल्याचेही स्पष्ट व्हावे.राज ठाकरे यांनी मोदी व पर्यायाने भाजपाविरोधाची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहेच, दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या ‘मनसे’च्या पदाधिकारी मेळाव्यातही त्यांनी ती जोरकसपणे मांडली. यंदाच्या निवडणुकीतील लढाई ही राजकीय पक्षांमध्ये नव्हे तर मोदी-शहा या व्यक्तींविरोधात होणार असल्याचे सांगताना, आपला पक्ष लोकसभेच्या रणांगणात राहणार नसला तरी, आपण प्रचारात मात्र उतरणार असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील ‘आघाडी’ला गर्दी खेचणारा प्रचारक उपलब्ध होऊन जाणार आहे. सभेसाठी गर्दी जमविणे अलीकडे किती जिकिरीचे व खर्चीक ठरू लागले आहे ते पाहता, असा विशेष प्रयत्नांखेरीज गर्दी मिळवणारा नेता लाभणे कुणासाठीही लाभदायीच ठरणार असले तरी; राज ठाकरे कुठे कुठे आणि कुणासाठी सभा घेतील याची उत्सुकता आहे.‘मनसे’ला महाआघाडीत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवला होता, परंतु काँग्रेसकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे बोलले गेले; त्या अनुषंगाने किमान शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या काही सभा होणे अपेक्षित आहे. तसेही राज व पवार यांच्यातील सलोख्याचे संबंध सर्वश्रृत आहेतच. परवाच्या मुंबईतील मेळाव्याप्रसंगीही राज यांनी आपल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या दुटप्पीपणाची उदाहरणे देताना पवार यांच्या संबंधीच्याच चित्रफिती दाखविल्यानेही त्यासंबंधीच्या समजाला बळकटी मिळावी. पण, असे असले म्हणून राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांसाठी राज ठाकरे प्रचारात उतरतील; याची खात्री देता येऊ नये. मात्र ‘मनसे’चे प्रभाव क्षेत्र राहिलेल्या किंवा म्हणवणाऱ्या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घेतला जाणे स्वाभाविक असल्याचे पाहता नाशकात भुजबळ व राज यांचे जमेल का, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला आहे.नाशकातून दशकभरापूर्वीच्या निवडणुकीत ‘मनसे’चे तीन आमदार निवडून गेले होते, तद्नंतरच्या २००९च्या लोकसभा निवडणुकीत ‘मनसे’च्या उमेदवाराने समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ दुस-या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याविरुद्ध राज यांनी आक्रमकपणे प्रचार केला होता. आता यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी प्रचार करायचा तर राज यांना त्याच भुजबळांसाठी मैदानात उतरावे लागेल. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबईतील परवाच्या मेळाव्यात राज यांनी नरेंद्र मोदींची नक्कल केली तशी महापालिका निवडणूक प्रचारावेळी नाशकात भुजबळ व त्यांच्या मफलरची नक्कल करून त्यांनी हशा व टाळ्या घेतल्या होत्या. तेव्हा, या सर्व पार्श्वभूमीवर भुजबळांसाठी राज ठाकरे यांची सभा होणार का, हा प्रश्न उत्सुकतेचा ठरून गेला असला तरी दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.भुजबळ कारागृहात असताना त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध सर्वपक्षीयांचे समर्थन मिळवताना भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’चीही पायधूळ झाडली होती. इतकेच नव्हे तर छगन भुजबळ जामिनावर सुटल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी स्वत: राज यांची भेट घेऊन सहकार्य व सहानुभूतीबद्दल त्यांचे आभार मानले होते. तेव्हा, राजकारणातील राग-लोभ कायम अगर फार काळ टिकून राहात नसल्याचा इतिहास लक्षात घेता, अनपेक्षित ते अपेक्षित ठरू शकते. राज व भुजबळांचे जुळणार का, हा प्रश्न यातून आपसूकच खारीज होऊ शकणारा आहे.