भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा व शिवसेना यांच्यात एकत्र निवडणूक लढवण्याचा समझोता झाला असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेला आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन भाजपाकडून हवे आहे. त्यामुळे शहा म्हणतात, तसा भाजपा-शिवसेना समझोता झाला असेल, तर त्याचा अर्थ मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्यास भाजपा तयार झाली आहे. समजा, हे सत्य नसेल, तर मग त्याचा अर्थ असा आहे की, शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपाला मान्य नाही. किंबहुना, भाजपाला हवा म्हणून यावेळी समझोता करण्याची शिवसेनेची तयारी नसल्यानेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची अट घातली आहे. त्यामुळे मतदारांत शिवसेना युतीला तयार असल्याचा संभ्रम निर्माण करून शिवसेनेची गोची करण्याकरिता शहा यांनी हे विधान केले आहे. अर्थात, जे काही आहे, ते चित्र जानेवारीअखेरपर्यंत स्पष्ट होईल. उत्तर महाराष्ट्रातील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या मंत्र्यांना पदांचे राजीनामे देण्याचा आदेश देतील. त्यानंतर, एकतर शिवसेना युती करणार असेल, तर सरकारला बाहेरून पाठिंबा देत राहील. अन्यथा, सरकारचा पाठिंबा काढून घेईल व त्यामुळे अल्पमतातील सरकार विधानसभा निवडणुकीपर्यंत कारभार रेटेल. दरम्यानच्या काळात लोकसभा निकालानंतर भाजपाला शिवसेनेची गरज लागलीच, तर मुख्यमंत्रीपदाच्या अटीबाबत समझोता करून भाजपा शिवसेनेला केंद्रात सत्तेत सहभागी करून घेईल व राज्यात युती करून विधानसभा निवडणूक लढवेल. समजा, भाजपाला पुन्हा घसघशीत बहुमत लाभले, तर त्यांना शिवसेनेची गरज लागणार नाही. त्यामुळे मग शिवसेनेला स्वबळावर लढून मुख्यमंत्रीपद मिळवावे लागेल.
देशातील पाचपैकी तीन राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसने भाजपावर मात केल्याने हर्षवायू शिवसेनेला झाला आहे. शिवसेना अत्यंत आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिका उभारत असलेल्या कोस्टल रोडच्या भूमिपूजनाला शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना बोलावले नाही. लागलीच कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाकरिता भाजपाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले नाही. त्यामुळे युतीमध्ये कलह शिगेला पोहोचला असतानाच शहा यांनी आपल्यात व उद्धव ठाकरे यांच्यात युतीची तडजोड झाल्याचा दावा केला. २०१४ मध्ये युती तोडून भाजपाने दगा दिला, ही गोष्ट शिवसेनेच्या वर्मी लागली आहे. तसेच राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्ता आली, ही गोष्ट शिवसेनेला पचलेली नाही. त्यामुळे आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांकरिता युती करताना लोकसभेबरोबरच विधानसभेचे जागावाटप करण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तीन राज्यांत पराभव झाल्यामुळे भाजपाकरिता लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. युती केली नाही, तर त्याचा फटका भाजपा व शिवसेना दोघांनाही बसेल आणि मागील वेळी महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा जिंकणारे हे दोन्ही पक्ष मार खातील. त्यामुळे लोकसभेतील युती भाजपाची गरज आहे. नेमकी हीच संधी साधून शिवसेनेने भाजपापुढे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. शिवसेनेने तीन प्रस्ताव भाजपाला दिल्याचे बोलले जाते. त्यापैकी एक : शिवसेनेला १५१ जागा सोडाव्या व मुख्यमंत्री शिवसेनेचा ही अट मान्य करावी. दोन : विधानसभेच्या निम्म्यानिम्म्या जागा भाजपा-शिवसेनेने लढवाव्या व कुणाच्या कितीही जागा आल्या, तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच करावा. तीन : शिवसेना दीडशेपेक्षा कमी जागा लढवेल, पण तरीही मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, हे जाहीर करावे.
शिवसेनेच्या या अटींमुळे भाजपाचे नेते बुचकळ्यात पडले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयी होऊनही शरद पवार यांनी पक्षांतर्गत वाद टाळण्याकरिता मुख्यमंत्रीपदावर उदक सोडले होते. आता भाजपा युतीच्या अपरिहार्यतेकरिता ही अट स्वीकारणार का, हाच कळीचा मुद्दा आहे. भाजपाला शिवसेनेची ही अट मान्य असेल, तर शिवसेना निमंत्रण न दिल्याने कितीही हातपाय आपटत असली, तरी युती करील व शिवसेनाही भाजपाचा पाणउतारा करूनही युती करील. मात्र, भाजपाला मुख्यमंत्रीपद सोडायचे नसेल, तर शिवसेना युतीला तयार आहे, असा संभ्रम निर्माण करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपा करील. आपली मुख्यमंत्रीपदाची मागणी मान्य होत नसल्याने अखेरीस जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेचे मंत्रीपदांचे राजीनामे देतील. लोकसभा निवडणुकीत युती न झाल्याचा फटका समजा भाजपाला बसला, तर मग विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळव त्यानंतर होईल.
शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्यानेच सध्या पक्षात मुख्यमंत्रीपदाचे काही दावेदार तयार झाले आहेत. ज्येष्ठतेच्या निकषावर सुभाष देसाई यांचा विचार होऊ शकतो. खा. संजय राऊत हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. तरुण व संघटनात्मकदृष्ट्या भक्कम असल्याने एकनाथ शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. केंद्रातील मंत्रीपदावर पाणी सोडलेले अनिल देसाई यांच्यासारखे मितभाषी व उद्धव ठाकरे यांच्या अर्ध्या वचनातील नेते हे डार्क हॉर्स ठरू शकतात. त्यामुळे सध्या शिवसेनेत ‘बाजारात तुरी, भट भटणीला मारी’ या म्हणीनुसार मुख्यमंत्रीपदाकरिता अहमहमिका सुरू झाली आहे.