- आ. डॉ. नीलम गो-हेजीवनाच्या अनेक क्षेत्रात स्त्रिया कर्तृत्वाने व गुणवत्तेने काम करत आहेत, परंतु ही वाट व्यवसायिक स्पर्धा, परिश्रम, याबरोबरच काही आव्हानांनी अंधारलेलीदेखील आहे. स्त्रियांचा शारीरिक उपभोग घेण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे व त्यासाठी सर्व प्रकारची आमिषे, प्रलोभने यासकट छळाचीदेखील तयारी ठेवायची, हा प्रकार नवा नाही. गेली पस्तीस वर्षे स्त्री आधार केंद्राचे काम करत असताना, या प्रकारच्या शेकडो घटनांनी व्यथित स्त्री कर्मचारी आम्हाला भेटल्या.सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कामाच्या ठिकाणी होणारा छळ रोखण्यास मार्गदर्शन तत्त्वे निश्चित करणारा निकाल १९९७ मध्ये दिला. राजस्थान येथील विशाखा ही स्वयंसेवी संस्था विरु द्ध राजस्थान सरकार या याचिकेवरचा हा निकाल होता. त्यानंतर, महिला संघटनांच्या वतीने पाठपुरावा होऊन त्यातील कमतरतांबद्दल वारंवार लक्ष वेधले. २0१३ मध्ये याबाबत लोकसभा व राज्यसभेत कायदा मंजूर झाला. जगाच्या प्रत्येक देशात महिलांच्या सुरक्षिततेवर विविध कायदे व एसओपीचे म्हणजे स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर्सवर काम चालू आहे. या एसओपीचे म्हणजेच प्रमाणित कार्यपद्धतींमध्ये चौकटीबद्ध होऊ शकत नाही, अशाही घटनांचे वास्तव समोर येत होतेच, परंतु प्रत्यक्ष केस न नोंदविलेलेल्या प्रवाहाबाहेरच्या स्त्रियांच्या दमनाची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षांत समोर यायला सुरु वात झाली. त्यातूनच १२ वर्षांपूर्वी # मीटू ची मोहीम सुरु वात झाली. टिष्ट्वटरवरून या मोहिमेला व्यक्त व्हायला व्यापक व्यासपीठ मिळाले. # मीटू चे वैशिष्ट्य म्हणजे, या व्यक्तिगत कैफियती प्रतिनिधिक बनत गेल्या.एकतर्फी आकर्षणातून स्त्रियांना गृहीत धरले जाते, तर काही वेळा कार्यसंस्कृतीत स्त्रियांना विनोदाचे, लैंगिक दुजाभावाचे लक्ष्य बनविले जाते. म्हणूनच याबाबत एखादी स्त्री तक्रार करायला धजावत नाही. सहज म्हणून केलेल्या थट्टेचाही स्त्रिया गैरसमज करून घेतात, असे काही वेळा म्हटले जाते, परंतु सहजतेचे रंग काही वेळा बदलतात व त्यातून अनेक वेळा स्त्रियांना बळी पाडून नंतर तो मी नव्हेच, ही भूमिका घेणारे महाभागही जीवनाच्या सर्व क्षेत्रांत दिसून येतात.स्त्रियांना बोलायची इच्छा नसतानाही तिला वश करायचा प्रयत्न केला जातो, तर कधी ती स्त्री त्या मैत्री वा नात्याला स्वीकारताना दिसते. खरे तर समोरचा माणूस आपल्याशी खराच सद्हेतूने वागतोय की, त्याचा हेतू वेगळा आहे, याचा अंदाज स्त्रियांना येतो. जेव्हा हे कळूनही अशी वागणारी व्यक्ती वरील पदावरची असेल, तर त्या माणसाला दुखविण्याची हिंमत स्त्रियांना होत नाही.मला असेही दिसून आले की, लैंगिक छळ किंवा बलात्कार झालेली मुलगी घटना घडल्याबरोबर त्या घटनेबाबत स्वत:चे मन मिटून होते, बोलावेसे वाटते, पण बोलता येत नाही. तो प्रसंग डोळ्यासमोर परत परत येतो व तिचे मन घृणा-किळस याने जखमी राहते. तो विषय कोणी काढला, तरी राग येतो. दुसऱ्या टप्प्यात माझेच काही चुकले का? माझ्या वाट्याला हे का यावे? या प्रश्नाने ती व्यथित असते. माझा काय अपराध होता? तो माझ्याशीच असा का वागला? किंवा मी काय केले असते, तर या प्रसंगातून माझी सुटका झाली असती? या प्रश्नाचे उत्तर ती स्वत:कडेच शोधत असते. काही वेळा आत्महत्येचे विचार तिच्या मनात येत असतात. जवळचे आप्तस्वकीय कितपत संवेदनशील पद्धतीने वागतात, यावर तिच्या मनाची उभारी अवलंबून असते. यासाठीच पोलीस, एकूण न्यायव्यवस्थेत संवेदनशील कार्यपद्धतीचा आम्ही आग्रह धरतो. तिसºया टप्प्यात स्त्रियांना हळूहळू भावनांकडून विचाराकडे प्रवास करावासा वाटतो. ज्या व्यक्तीने असे वर्तन केले, त्याला शिक्षा व्हावी, मी या विरोधात लढणार आहे, ही भावना तीव्र होते. काही वेळा जो भेटेल त्या माणसाला स्वत:चे दु:ख, अवहेलना, राग स्त्रिया व्यक्त करत राहतात. याच मानसिक अवस्थेत तिला बारीक बारीक घटनाही आठवतात व परिस्थितीजन्य पुराव्यांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. चौथ्या टप्प्यात स्त्रिया हळूहळू सभोवतालच्या परिस्थितीशी जमवून घेतात. पोलीस, वकील, कोर्ट यातूनच आपल्याला न्याय मिळवावा लागणार आहे, ही बाब ती स्वीकारते.काही घटनांत दोन स्त्री-पुरुषांत सर्वार्थाने जवळीक होते व नंतर दुरावा, विश्वासघात किंवा न जमल्याने दुरावा येतो. आपल्याला वापरले व फेकून दिले, ही भावना स्त्रीच्या मनात तयार होते. पुरु ष अशा वेळी थेट हिंसेवर उतरतो, तर स्त्री सूड घेण्याचा, धडा शिकवायचा प्रयत्न करते. यामध्ये बलात्कार नसला, तरी फसवणुकीची भावना वाटू शकते. मीटू चा ज्वालामुखी तपासून पाहिला तर दिसते की, त्यातील सत्यता तपासून पाहायला वेळ लागून शकतो, परंतु स्त्रिया जेव्हा स्वत:च्या नावानिशी अनेक वर्षांनी तक्र ार करतात. हे घडू नये वाटत असेल, तर लगेच ज्या स्त्रिया तक्रार करतात, त्या तक्रारीबाबत योग्य न्याय मिळण्याची हमी द्यावी लागेल, तशी व्यवस्था निर्माण व्हावी लागेल. मीटू च्या निमित्ताने राज्य महिला आयोग, गृहविभाग, शिक्षण, कला व सर्वच क्षेत्रांना महिलांच्या लैंगिक छळाचा विरोधात प्रमाणित कार्यपद्धती बनविणे गरजेचे वाटते.(अध्यक्षा, स्त्री आधार केंद्र)
महिलांच्या तक्रारींवर न्यायाची हमी हवी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 3:36 AM