- धनाजी कांबळे
सगळेच स्वप्नं पाहतात, पण ती सत्यात उतरवण्याचे धारिष्ट्य केवळ जिद्दी आणि मेहनती माणसंच दाखवतात. अशीच हिमा दास (Hima Das ) ही सुवर्णकन्या. तिच्या विक्रमाची दखल घेऊन आसाम सरकारने डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) म्हणून नुकतीच तिला नियुक्ती दिली आहे. घरात कोणतीच पार्श्वभूमी नसताना तिने जे स्वप्न साकार केलं आहे, ते तिच्याबरोबरच देशाचीही शान उंचावणारे आहे. महिला खेळाडूंना आपल्याकडे पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही. त्यातही खेळ कोणता आहे, यावरून प्रसिद्धीचे निकष ठरविले जातात.
एका संशोधनानुसार महिला खेळाडूंशी संबंधित बातम्यांपैकी केवळ एक टक्का बातम्यांनाच पहिल्या पानावर जागा दिली जाते, असे आढळले आहे. त्यातही ज्यांचे नाव आहे, ज्यांचा खेळ प्रकार प्रसिद्ध आहे, त्यांनाच प्रसिद्धी मिळते, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. तीन वर्षांतील दोन हजारांहून अधिक बातम्यांचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचा विचार करता आसाममधील कंधुलिमारी या लहानशा गावातील शेतकरी कुटुंबातील हिमा दास या मुलीची दखल घेण्यातही माध्यमे कमी पडली ही वस्तुस्थिती आहे.
जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमाने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. ५१.४६ सेकंदांमध्ये हे अंतर पार करून तिने रेकॉर्ड केला आहे. जकार्ता येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने रौप्य पदक मिळवले. भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. हिमा दासने महिनाभरात पाच सुवर्णपदके जिंकली. तरीही तिची म्हणावी तेवढी दखल घेतली गेली नाही. अॅथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच भारतीय क्रीडापटूला जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. तिच्या गावातील लोक तिला ‘धिंग एक्स्प्रेस’ म्हणून ओळखतात. तिनं इथपर्यंत केलेला प्रवास अतिशय खडतर आहे.
आई-वडिल शेतकरी. भातशेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह. मात्र, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने मिळवलेले हे यश सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या खेळाडूंच्या तलनेत हजारपटीने अचंबित करणारे आहे. विशेषत: आदिवासी समूहातून येऊनही तिने घेतलेली ही गगनभरारी आदर्शवत आहे. पी. टी. उषाची वारसदार होण्याची क्षमता असल्याचे हिमाने सिद्ध केले आहे. तसेच मिळालेल्या बक्षीसातील ५० टक्के रक्कम पूरग्रस्तांसाठी देऊन तिने दाखवलेली बांधिलकी आणि सामाजिक भान याचा आदर्श इतरही नावलौकीक मिळालेल्या खेळाडूंनी घ्यावा. लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा होती. मी हेच स्वप्न पाहिलं होतं. माझ्या आईचं देखील हेच स्वप्न होतं, असं तिनं आसाम पोलीस विभागात उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्तीपत्र स्वीकारताना म्हटलं आहे. तर पोलीस अधिकारी म्हणून काम करताना एक चांगला माणूस म्हणूनही तिनं आदर्श निर्माण करावा, असं तिच्या आईनं म्हटलं आहे.
ग्रामीण, दुर्गम भागातून आलेली एक खेळाडू. खेळाडूसाठी आवश्यक साधने मिळणेही दुरापास्त अशा परिस्थितीत सुवर्णपदक मिळविणे आणि देशाचं नेतृत्व करणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पदच बाब म्हणायला हवी. सुविधा नाहीत, किंवा तसे वातावरण नाही, अशी तक्रार तिने कधीही केल्याचे दिसत नाही. उपलब्ध साधनांच्या आधारे परिस्थितीशी दोन हात करीत हिमाने मारलेली मजल देशातील महिला खेळाडूंसाठी एक पायवाट ठरावी. त्याचप्रमाणे हिमाला मिळालेले यश पाहता तिला परदेशी प्रशिक्षण, सुविधा मिळाव्यात यासाठी अॅथलेटिक्स संघटना, राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. असे झाल्यास आणखी नवे विक्रम करण्यास तिच्यात बळ येईल...योग्य प्रशिक्षण मिळाले, प्रोत्साहन मिळाले, तर जगात अशक्य असे काही नाही, हेच हिमाने दाखवून दिले आहे.
स्पोर्ट शूज नव्हते, म्हणून साध्याच बुटावर एका कंपनीचं नाव लिहून धावणाऱ्या हिमाने केलेल्या विक्रमामुळे एका कंपनीने तिच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे, यातून तिची खेळाप्रती असलेली निष्ठा दिसते. दृढनिश्चय असेल, संधी मिळाली तर अडचणींचा कितीही मोठा हिमालय सहज सर करता येऊ शकतो, हे हिमाने दाखवून दिलं आहे. तिचा हा प्रवास तिच्यासारख्या हजारो प्रतिभावान मुलींसाठी प्रेरणादायी आहे.