सध्या जगातील सुमारे ३१ देशात महिला प्रमुख पदावर आहेत. जानेवारी २०२३ मध्ये बॉस्निया हर्जेगोविनाच्या पंतप्रधानपदी श्रीमती बोरजेना क्रिस्तो यांची निवड झाली. २३ मार्चला त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षपदावर क्रिस्टीन कांगारू येतील. ‘फॉर्च्यून ५००’ यादीतील ‘अंडर आर्मर’ या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अलीकडेच स्टेफनी लिनार्ड यांची नियुक्ती झाली आहे. हॉर्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदावर प्रथमच अप्सरा अय्यर या महिला विराजमान झाल्या आहेत. महिलांचे आयपीएल सामने नुकतेच सुरू झाले आहेत. यावर्षी प्रजासत्ताकदिनी महिलांचा सहभाग हा मुख्य विषय ठेवण्यात आला होता. संपूर्णपणे महिलांच्या केंद्रीय राखीव पोलिस दलासह महिलांच्या नेतृत्वाखालील रेजिमेंट, राज्याच्या देखाव्यांचे मध्यवर्ती विषय या सगळ्यात ‘नारीशक्ती’ ही कल्पना उठून दिसली. सत्तेच्या आसमंतात स्त्रिया हळूहळू, पण दमदारपणे पावले टाकताना सर्वत्र दिसत आहेत.
महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेण्यासाठी दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. यावर्षी स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘डिजिटऑल : अभिनवता आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना घेण्यात आलेली आहे. हा योग्य वेळी आणि नेमका दिलेला भर आहे. महिला आगेकूच करत आहेत ही गोष्ट साजरी केलीच पाहिजे. त्याचबरोबर तंत्रज्ञान त्यांना सामावून घेते आहे की नाही हे पडताळण्याची ही योग्य वेळ आहे. सध्या व्यक्ती आणि देशाला भेडसावणारी आव्हाने वेगळी आहेत. हवामान बदल, त्यातच जैवविविधतेचे नुकसान हे सर्वात महत्त्वाचे आणि सगळ्यांवर परिणाम करणारे आहेत, यात शंकाच नाही. त्याचप्रमाणे आपण वापरत असलेला डाटा, त्यावरचे आक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, कामाची ठिकाणे बदलणे या काही नव्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत.
नव्या युगात समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वापरले जाणारे मार्ग मात्र पारंपरिक आहेत. हल्ल्याचे जुने-पुराणे तंत्र सपशेल नाकारणे, किचकट भाषेत वाटाघाटी चालूच ठेवणे किंवा रामबाण उपाय असल्यासारखे कायदे संमत करून घेणे अजूनही चालते. या सगळ्यात जे योग्य दिशेने विचार करतात त्यांना कृतीची जोड मिळत नाही. प्रगतीच्या संकल्पना बदलत असताना हे पारंपरिक आव्हान खरेतर नेतृत्व करणाऱ्या महिलांसाठी एक संधी आहे. त्या नवीन दृष्टिकोन आणू शकतात. अनुभवातून महिलांनी कमावलेले प्रगमनशील उपाय त्या सुचवू शकतात. त्यात आक्रमकतेला नव्हे तर सहानुभावाला महत्त्व असेल. महिलांनी पुरुषांपेक्षा चांगले असले पाहिजे, असे नाही तर त्यांनी वेगळे असले पाहिजे. सत्तापदे भूषवताना वेगळे पर्याय दिले पाहिजेत; जे काळाच्या कसोटीवर उतरतील व वेगळी उदाहरणे समोर ठेवतील.
कृषी आणि औद्योगिक युगात, त्याचप्रमाणे माहिती युगातही पुष्कळशा प्रमाणात पुरुष आघाडीवर होते; त्यात आता बदल होत आहे. आज शेतीपासून अवकाशापर्यंत नवनवी क्षितिजे महिला काबीज करत आहेत. हळूहळू अधिकारपदांवरही येत आहेत. ‘फॉर्चुन ५००’ कंपन्यांपैकी जवळपास २४ कंपन्यांत महिला मुख्य कार्यकारी पदावर आहेत; म्हणजे १० टक्के कंपन्या स्त्रिया चालवतात. भारतात महिलांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे प्रमाण ४.७ टक्के आहे. कोविडनंतर कामाच्या ठिकाणी खूप बदल झाले. दूर राहून केलेल्या कामातील आव्हाने आणि संधी यावर काम करण्याची गरज आहे. तसेच लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाची भरपाई आणि रजा तसेच कार्यालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह आणि त्यांना होणारा त्रास हा नित्याचाच विषय होत आहे.
लवकरच चॅट जीपीटी आणि त्याची भावंडे आपल्या कार्यालयांचा भाग होणार आहेत. काम करण्याच्या ठिकाणी यापुढे केवळ माणसांचे चालणार नाही. त्या जोडीला रोबो आणि अल्गो प्रणालीही येईल. स्त्री-पुरुष, वेगवेगळ्या प्रकारची माणसे, यंत्रे, अल्गोरिदम आणि एकूणच कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात वेगवेगळी आव्हाने समोर येतील. महिला व्यवस्थापकांना त्यांचा सामना करावा लागेल.
पितृसत्ताक पद्धतीचे साखळदंड तोडून महिला पुढे जात आहेत. हे नव्या प्रकारचे जग पुरुषविरोधी किंवा बाजूचे असे नाही. आपल्या भवतालच्या जगाचा कायापालट होत आहे. आपल्याला सर्वांच्याप्रती सहानुभाव, स्वीकार, सामावून घेण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल. तोही आपण केवळ महिला आहोत म्हणून नव्हे, तर भविष्यकाळ कुठल्याही एका निवडक बाजूचा असणार नाही यासाठी. (लेखातील मते वैयक्तिक )sadhana99@hotmail.com
साधना शंकर,लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी आहेत.