डॉ. भूषणकुमार उपाध्यायप्राचीन काळापासून भारतीय विचारवंतांनी शब्द आणि भाव या दोन्हीतले साम्य बऱ्याच अंशी सखोल असल्याचे सांगितलेले आहे. हे दोन्ही परस्परांना लक्षणीय गांभीर्याने प्रभावित करतात. सामान्यत: ‘शब्द’ असा ध्वनी आहे की जो लहरींच्या स्वरूपात आमच्या कर्णकमलाद्वारे मेंदूत प्रवेश करतो व त्यांच्या संबंधित भागांना प्रेरित करतो. जेव्हा शब्द लिखित स्वरूपात असतात, तेव्हा ते आमच्या दृष्टीद्वारे मेंदूपर्यंत पोहचतात. दृष्टिदोष असलेली व्यक्ती आपल्या स्पर्शाच्या माध्यमातून शब्द समजतो व त्याद्वारे त्याचा मेंदू काम करतो. परामानसशास्त्रात ‘टेलीपॅथी’ ही अशी एक पद्धत सांगितलेली आहे की, ज्यात दोन मेंदू कोणत्याही भौतिक साधनांशिवाय परस्परांशी संवाद साधतात. प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. तो गुणधर्म वेगवेगळ्या संवेदनासोबत मेंदूत प्रवेश करून त्याचा प्रभाव निर्माण करतो. मेंदूच्या मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आमचा मेंदू डावा गोलार्थ व उजवा गोलार्थ या दोन भागात विभागला गेलेला आहे. डावा गोलार्थ तर्क आणि गणिती कामांना संपादित करतो, तर उजवा गोलार्थ तत्त्वज्ञान, कल्पना व कवित्व या संबंधातील कामांशी संबंधित आहे. माणसाचे जीवन तर्क व काव्य यांनी बनलेले आहे. या दोघांचे संतुलन व ताळमेळ आम्हाला चांगले विचार प्रदान करतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार आपल्या मेंदूत कोट्यवधी पेशी असून, त्या आपला वेगवेगळा प्रभाव निर्माण करतात. ज्याप्रमाणे क्रोध या अवस्थेत एका विशिष्ट प्रकारच्या पेशी जागृत होतात. त्याच प्रमाणे इतर प्रकारच्या मानसिक अवस्थेतसुद्धा त्याच्याशी संबंधित दुसऱ्या प्रकारच्या पेशी काम करतात. प्रत्येक पेशींचे काम वेगवेगळे असते. ज्या प्रकारचे विचार आमच्या मेंदूत उत्पन्न होतात, त्या प्रकारच्या पेशी कार्यरत होतात. हे विचार बाह्य संवेदनेतून किंवा मेंदूत स्थित असलेल्या संस्कारातूनसुद्धा स्वयंप्रेरित होतात. मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचारांशी जेव्हा आम्ही जोडले जातो, तेव्हा आमच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची भावना निर्माण होते, ही भावना आम्हाला मानसिक व शारीरिक ह्या दोन्ही प्रकारांनी प्रभावित करते. चिकित्सा शास्त्रानुसार ऐंशी प्रतिशत आजार हे मानसिक असतात. म्हणजेच काही शारीरिक आजाराचे कारण मनोविकार हे असतात. प्राचीन भारतातील योगी आणि मानस शास्त्रज्ञांना हे तथ्य माहीत होते म्हणून त्यांनी मनात सकारात्मक भावना निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी असंख्य मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञान, भक्ती व कर्म यांच्या साधकांना अनेक अशा उपासनेतून जावे लागते की, ज्यातून स्वयंसकारात्मक भाव निर्माण होतात.
शब्द आणि भाव
By admin | Published: April 18, 2017 1:16 AM