मिलिंद कुलकर्णीराजकारणात सर्वमान्य नेता असण्याचा काळ कधीच संपला आहे. अटलबिहारी वाजपेयी हे या काळाचे अखेरचे शिलेदार होते.
त्यांच्या निधनानंतर जळगावशी आलेला त्यांच्या आलेल्या संबंधांना उजाळा मिळाला. आणीबाणीनंतर जनसंघ हा जनता पक्षात विलीन झाला. मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळल्यानंतर जनसंघाचा भारतीय जनता पार्टी हा नवीन अवतार उदयाला आला. त्याच्या प्रचारार्थ १९८२-८३ मध्ये अटलजी जळगावला आले होते. सकाळी ८ वाजता जी.एस.ग्राऊंड या मध्यवर्ती मैदानावर सभा ठेवली होती. एवढ्या सकाळी सभेला लोक येतील काय? भाजपा नवखा पक्ष, कार्यकर्ते मोजके, कशी होणार सभा या चिंतेत पदाधिकारी असताना केवळ अटलजींच्या नावाने सभेला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक आले होते. अटलजींच्या वक्तृत्वाची आणि सर्वमान्य नेतृत्वाची पावती जळगावकरांनी सकाळच्या सभेला गर्दी करुन दिली होती.
या सभेतील अटलजींनी सांगितलेला किस्सा पुन्हा एकदा आठवला गेला. गजानन जोशी या पदाधिकाऱ्याकडे अटलजी आदल्या रात्री जेवायला होते. अटलजी आणि पाच-दहा कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था जोशी यांच्याकडे केली होती. पण अटलजींचे वलय असे की, त्यांना भेटायला रात्रीही कार्यकर्त्यांची रिघ लागली. स्वाभाविकपणे जेवायचा आग्रह त्यांनाही झाला. अटलजींच्या तीक्ष्ण नजरेतून हा प्रसंग सुटला नाही. दुसºया दिवशी सभेत हा किस्सा ऐकवताना ते म्हणाले, गजाननजी के घर कार्यकर्ताओ की संख्या बढती गयी, उधर रसोई घरमे दाल मे पानी बढता गया. आखरी मे दाल मे दाल ढुंढनी पड रही थी...लेकीन हर एक कार्यकर्ताने पेटभर खाना खाया..खाली पेट कोईभी नही सोया...हे सांगायला ते विसरले नाही.
नव्याने स्थापन झालेला पक्ष, कार्यकर्त्यांची मोठी फळी नाही, तरीही जाहीर सभेला झालेली गर्दी हा अटलजींच्या प्रतिमेचा चमत्कार होता, यावर राजकीय तज्ज्ञांचे एकमत होते.
अटलजींशी जळगावचे ऋणानुबंध वेगवेगळ्या प्रसंगांमधून दृढ होत गेले. केशवस्मृती प्रतिष्ठानने अटलजींचे गीत ‘उनकी याद करे’ यावर एक सुंदर व्हीडिओ बनविला. २००२ मध्ये बनविलेल्या या व्हीडिओचे दिग्दर्शन प्रियदर्शन, गायक हरिहरन आणि संगीत दिग्दर्शन नौशाद यांचे होते. दिल्लीत अटलजींच्या उपस्थितीत त्याचे विमोचन करण्यात आले आणि विशेष म्हणजे ही कविता त्यांनी स्वहस्ताक्षरात लिहून दिली. १६ वर्षांपूर्वी जळगावातील सामाजिक कार्य करणाºया संस्थेला स्वत:ची कविता देणे आणि त्यावर व्हीडिओ बनविण्याची परवानगी देणाºया अटलजींचे मोठेपण आणि गुणी माणसांची असलेली पारख हे गुण अधोरेखित होतात.
असेच ऋणानुबंध जुळले ते भारतीय जैन संघटना, खान्देश भूकंप सहाय्यता निधी ट्रस्ट, शांतीलाल मुथा आणि सुरेशदादा जैन या संस्था आणि व्यक्तींनी गुजराथमधील भूज येथे भूकंपग्रस्त भागात शाळांचे पुनर्निमाण कार्य केले. २४ जून २००१ रोजी अटलजी त्या शाळांच्या लोकार्पणासाठी भूज येथे आले होते. या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. जळगावातील पत्रकारांचा चमू हे काम पाहायला गेला होता. अटलजी हे पंतप्रधान होते, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा कार्यक्रम झाला. केशूभाई पटेल हे मुख्यमंत्री होते. त्यांचा मतदारसंघ याच भागात होता. पण भूकंपग्रस्त भागात राज्य सरकारने चार महिन्यात फारशी कामे केली नसल्याने नागरिकांमध्ये केशूभाई आणि सरकारविषयी तीव्र नाराजी होती. चार महिन्यात केशूभाई फिरकलेदेखील नव्हते. अटलजींसोबत ते प्रथमच आले. लोकांनी अटलजी आल्याने राग विसरुन कार्यक्रमात सहभाग घेतला. अटलजींनी शाळांचे लोकार्पण करताना ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले, त्यांचा सत्कार केला. सत्कार करताना त्यांचा परिचय करुन घेतला, संवाद साधला. परदु:ख आपले मानण्याचा स्वभाव आणि मदतकार्य करणाºयांविषयी असलेली कृतज्ञ भावना या प्रसंगातून प्रतीत होते.
अटलजींच्यासारख्या कर्तृत्ववान, प्रतिभावान नेत्याला संघर्ष अटळ ठरला. लोकसभा निवडणुकीतला पराभव असो की, संसदेत त्यांचे सरकार बहुमताअभावी कोसळणे असो, हा संघर्ष अटलजींनी अनुभवला. परंतु या नितळ मनाच्या नेत्याचा पराभव साºया देशवासीयांचे डोळे भिजवून गेला. वनवासातला राम, कंसमामाच्या जाच सहन करणारा कृष्ण आम्हाला अटलजींमध्ये दिसला. जनसामान्यांच्या भावनांशी तादात्म्य पावणारा असा नेता पुन्हा होणे नाही.