लक्ष्मीकांत देशमुख हे नाव काल-परवापर्यंत महाराष्ट्राला फार परिचित नव्हते. पण, आज या नावाची चर्चा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बृहन्महाराष्ट्रातील मराठीजनांमध्येही होतेय. याला कारणही तसेच आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा अनुपम सोहळा अशी ज्याची ओळख आहे त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते नवनिर्वाचित अध्यक्ष ठरले आहेत. सनदी अधिकारी राहिलेले देशमुख संवेदनशील मनाचे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली बालमजुरीसंदर्भातील ‘हरवलेले बालपण' ही कादंबरी असेल किंवा स्त्रीभ्रूणहत्येवरील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह असेल त्यांच्या लेखणीचा हा पिंड त्यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडविणारा आहे. केवळ कथाच नाही तर कादंबरीसारखे प्रघल्भ आणि प्रदीर्घ लेखनही देशमुखांच्या हातून घडले आहे. 'इन्किलाब आणि जिहाद' ही कादंबरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी यात उलगडले आहेत. याशिवाय सहा कादंबºया, सात कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुखांच्या नावावर आहे. नाटक आणि चित्रपटाच्या क्षेत्रातही त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या क्रमात त्यांनी कोल्हापुरात चित्रपट आणि ग्रंथ महोत्सवाच्या केलेल्या आयोजनाचे उदाहरण देता येईल. गोरेगाव फिल्मसिटीचे संचालक असताना त्यांनी अनेक कल्पक योजनांना कृतिरूप दिले आहे. थोडक्यात काय तर आयुष्यभर शासकीय शिस्त जोपासूनही त्यांनी समाजापासून स्वत:ची नाळ तुटू दिली नाही. म्हणूनच जेव्हा निवडणूक लढविण्याचा निर्धार पक्का झाला तेव्हा जाहीरनाम्यात त्यांनी मला कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष व्हायचे आहे, असे आवर्जून नमूद केले आणि या निवडणुकीत विजयश्री मिळाल्यानंतरही अध्यक्षीय भाषणासाठी मी पत्र पाठवून मराठीजनांच्या सूचना, अपेक्षा मागविणार असल्याचे जाहीर केले. सर्वसामान्य साहित्यिकांचा संमेलनाध्यक्ष म्हणून देशमुखांचे वेगळेपण दर्र्शविण्यासाठी या दोन गोष्टी पुरेशा आहेत. त्यामुळे हे संमेलनाध्यक्षपद केवळ मिरवण्याची गोष्ट नाही, याची जाणीव देशमुखांना असेलच असा विश्वास आहे. त्यांच्या या विजयाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. मराठी भाषेच्या अभिजाततेचे झाडून सगळे पुरावे दिल्यानंतरही तो दर्जा अद्याप मराठीला मिळालेला नाही. शाळांमधील मराठीची स्थिती अतिशय बिकट आहे. ज्ञानभाषा तर सोडाच व्यवहाराची भाषा म्हणूनही मराठी मागे पडायला लागली आहे. नवोदित साहित्यिकांना मंच मिळत नाही, प्रकाशनाचा खर्च पेलत नाही. परिणामी समाजाला वैचारिक नेतृत्व देण्यात साहित्यिक कमी पडत आहेत. अर्थात देशमुख संमेलनाध्यक्ष झाल्याने हे काही एका रात्रीत बदलणार नाही. पण, देशमुखांच्या कार्यकाळात त्या दिशेने एक आश्वासक पाऊल टाकले जावे, अशी तमाम मराठीजनांची अपेक्षा आहे.
‘कार्यकर्ता’ संमेलनाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:09 AM