- कौमुदी गोडबोलेकोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो. त्याला नमन करून, त्याचं पूजन करून विनंती केली की तो प्रसन्न होतो. संपूर्ण कार्यामध्ये भक्कमपणानं पाठीशी उभा राहतो, अशा गणरायाला पूजनामध्ये अग्रस्थान असणं स्वाभाविक आहे.श्रीगणेशाचं रूप मोठं मनोहारी आहे, त्याच्या वर्णाच्या छटादेखील विविध आहेत. कुठे तो सावळ्या रंगात रंगतो तर कुठे गौर वर्णानं उजळून उठतो. गणपतीची लवचिक सोंड, सूक्ष्माचा वेध घेणारे छोटे नेत्र, सकल भक्तांची पापं पोटामध्ये साठविणारं महाकाय लंबोदर ! रंग, रूप, आकार यामध्ये असणारा वेगळेपणा मनात भरणारा ! कलियुगामध्ये कली प्रबल झाल्यामुळे सद्बुद्धी प्रदान करणाºया गणेशाची उपासना आवश्यक आहे. कार्याला, कामाला, उपक्रमाला आरंभ करून नंतर ते पूर्णत्वाला न नेणाºया आरंभशूरांची संख्या भरपूर आहे. कली बुद्धीमध्ये शिरला की तो संशय, आळस अशा अडचणी उभ्या करतो. माणसाची मती संभ्रमित झाली की कार्याला खीळ बसते. गजाननाला अनन्यभावानं भजलं की तो प्रारंभापासून कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत सांभाळतो.लौकिकामध्ये यश प्राप्त करून देणारा श्रीगणेश मोठा मायाळू आहे. रक्तवर्णी जास्वंदाचं फूल अर्पण केलं की तो सकल युद्ध थांबवतो. हिरवीगार एकवीस दुर्वांची जुडी वाहिली की भक्तांना षड्रिंपूच्या दाहापासून दूर नेतो. एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला की भक्तांच्या जीवनामधील कटू, कडवट अशा वैरभावना शमवतो. मनामध्ये गोडवा, प्रेम निर्माण करतो. गुळाचा गोडवा आणि खोबºयामधील स्निग्धता हृदयातून थेट आचरणामधे उतरवतो. मग कुमती सुमती होऊन जाते. अज्ञानाचा अंध:कार दूर सारतो. ज्ञानाच्या अलौकिक प्रकाशानं जीवन उजळून टाकतो. व्यावहारिक जगतामध्ये यश तर देतोच. त्याचसमवेत अध्यात्माच्या आशयाचं आकलन करून देतो. मग जल्लोश गणेशाच्या नावाचा.. त्याच्या तेजस्वी आरतीचा.. टाळांचा आणि टाळ्यांच्या गजराचा होणं आवश्यक आहे. केक, मेणबत्त्या आणि अयोग्य पदार्थांच भक्षण करून कधी आनंदोत्सव पूर्णत्वाला जाणं शक्य नाही. मोदक, निरांजनाचं तेजाळणं.. सात्विकतेचा उत्सव.. अक्षय आनंद प्रदान करून जीवन परिपूर्ण आणि आशयघन करेल यात शंका नाही.
‘‘कार्यारंभी नमन तुजला’’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:35 AM