विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
पर्युषण पर्वानिमित्त मी प्रतिक्रमण करत असता लक्षात आले यात तर सारे पर्यावरण सामावलेले आहे. जल, स्थळ आणि आकाशातील सर्व जीवांची मी क्षमा मागत होतो. माणसाची तर मागतच होतो. झाडे, पक्षी, कीटक आणि सर्व जनावरांची क्षमा मागत होतो. मनात प्रश्न आला, आपण पूजा तर पंचतत्त्वांची करतो, पण सामान्य जीवनात त्याप्रमाणे वागतो का? माणसाने जाणूनबुजून निसर्गाविरुद्ध शत्रुत्व का पत्करले आहे? निसर्गाचे नुकसान हे आपलेच नुकसान असताना आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेत आहोत? पर्यावरणाच्या बाबतीत माझ्या मनात हे विचार नेहमीच चालू असतात. माणसाच्या विद्यमान पिढीची लालसा पर्यावरणाचे मोठे नुकसान करत आहे आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याबरोबर आपल्या मुलाबाळांनाही भोगावे लागत आहेत. कधीकधी तर वाटते, येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण काय मागे ठेवून जाऊ? आपल्या लालसेतून काय बाकी उरेल?
अर्थात, पर्यावरणाचा असा विचार करणारे पुष्कळ लोक असले तरी; मोठा वर्ग असा आहे, जो अजिबात फिकीर करत नाही. हे जग विध्वंसाकडे चालले आहे. व्यक्तिगत पातळीवर आपण किती कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो, याचा विचारही करत नाही आपण. आसपास जे दिसते त्याने मी सतत हैराण होतो. माझ्या संस्थेत, कार्यालयात इतके सारे लोक येतात, कोणी मोटारीने येतो, कोणी मोटारसायकलने. यातून किती कार्बन उत्सर्जित होत असेल? जर प्रवासाची सार्वजनिक साधने उपलब्ध असतील तर हे उत्सर्जन कमी करता येईल. एका बसमध्ये किंवा रेल्वेत जास्त लोक बसतात. त्यामुळे प्रतिव्यक्ती उत्सर्जन कमी होते. एका कारमधून एक माणूस जात असेल तर ते अन्यायकारक नाही का? माझ्या वृत्तपत्राच्या छपाई विभागातील यंत्रांचे संचालन करण्यासाठी किती वीज खर्च होते ते मी पाहत होतो; तेंव्हा लक्षात आले, ही इतकी वीज कोळशापासून निर्माण झाली... म्हणजे त्यामुळे किती कार्बन उत्सर्जित झाला असेल?
- या प्रश्नातुन सुरु झाले विचारमंथन ! मग अवघा लोकमत समूह आम्ही सौर ऊर्जेकडे वळवला. सध्या लोकमतमध्ये वृत्तपत्र छपाई सौरऊर्जेवर केली जाते. अर्थात, त्यासाठी आम्हाला मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागली पण समाधान याचे आहे, की पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने आम्ही योग्य पाऊल टाकले आहे. खरे तर प्रत्येकाने याचा विचार करून व्यक्तिगत स्तरावर काही ना काही केले पाहिजे. केवळ सरकारवर भरवसा ठेवून कसे चालेल? आपले छोटे प्रयत्नही महत्त्वाचे ठरतील. अन्नाची नासाडी टाळणे हा त्यातलाच एक भाग. जवळपास ७० टक्के धान्य आणि फळांची नासाडी होते असे आकडेवारी सांगते. धान्य आणि फळे उत्पादन करताना पाणी द्यावे लागते, त्यात वीज खर्च होते. कीटकनाशके वापरावी लागल्याने पर्यावरणाचे नुकसान होते. आपण धान्य आणि फळे वाया जाण्यापासून वाचवू शकलो तर किती फायदा होईल? पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेवून संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने अनेक संमेलने झाली आहेत. जिनेव्हात संमेलन झाले तेंव्हा बहुतेक सदस्य पर्यावरण वाचवण्यासाठी सहमत झाले होते. रिओ दि जानेरो आणि पॅरीसमध्येही याच संकल्पाची अधिक ठाम अशी पुनरुक्ती केली गेली.
१९९४मध्ये सर्वानुमते हे ठरवण्यात आले, की २०००पर्यंत कार्बन उत्सर्जन १९९०च्या पातळीवर आणले जाईल. यासाठी विकसित देश विकसनशील देशांना आर्थिक आणि तांत्रिक बाबतीत सर्व ती मदत करतील. पण झाले काय? समझोता जागीच राहिला. इतकेच नव्हे तर २०१९मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती ट्रम्प यांनी ग्लोबल वॉर्मिंगसंबंधी पॅरीस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. भारत, रशिया आणि चीनवर ट्रम्प यांनी ठपका ठेवला की, हे देश काहीही करत नाहीत आणि अमेरिकेचे मात्र पैसे वाया चालले आहेत.
वास्तव असे आहे की, कार्बन उत्सर्जनाचे ऑडिट करण्यासाठी निरीक्षक नेमायलाही अमेरिकेने मोडता घातला आहे. पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान अमेरिकेने केले असेल, तर किंमत त्याच देशाने मोजली पाहिजे. विकसनशील देशांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. काही करायचे म्हटले, तर काही ना काही चुकणारच; पण सारखी फक्त नावे ठेवून कसे चालेल? ५,१०,१५ टक्के चुका होतील; पण निदान ८० टक्के तरी चांगले काम होईल...? आज परिस्थिती भयावह आहे. जंगले नष्ट केली जात आहेत. नद्या सुकत चालल्या आहेत. वायुमंडळ प्रदूषित होत आहे. ओझोनचा थर विरळ होत चालला आहे. डोंगर धसत आहेत. जीवजंतू नष्ट होत आहेत. आजार पसरत आहेत. पर्यावरणाचा नाश म्हणजे मनुष्य प्रजातीचा नाश होय.
- आम्ही पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही असे आज कोणते तरी सरकारी खाते सांगू शकते? हा नाश आपणच केला असल्याने सुधारण्याचा रस्ताही आपल्यालाच शोधावा लागेल. लॉकडाऊनचा काळ आठवा. आपण सगळे घरात बसलो होतो तेव्हा निसर्ग कसा छान फुलून आला होता! लॉकडाऊन भले नको; पण आपल्या दैनंदिन व्यवहारात शक्य ते बदल करायला तरी काय हरकत आहे? हे लिहीत असताना मी स्वीत्झर्लंडमध्ये आहे. इथे हवेत कोणतेही प्रदूषण नाही. नद्या झुळूझुळू वाहताना दिसतात. तळी साफ आहेत. मेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीची उत्तम व्यवस्था आहे. कुठेही कचरा दिसत नाही. स्थानिक लोकांशी माझे बोलणे झाले. ते म्हणतात, ही जबाबदारी आमची आहे.
- सगळ्या जगाने असा विचार केला तर किती बरे होईल! हे जग सुंदर व्हावे म्हणून सगळ्यांनी चिंता केली पाहिजे आणि चिंतनही!