एस.एन. भामरेआज जागतिक पर्यावरण दिवस. जो दरवर्षी 5 जून रोजी आयोजित होतो. जगभरातील सरकार, सामाजिक व खाजगी संस्था, विविध, जाती, धर्म, पंथ, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले लोक एकत्र येऊन स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर, जगामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त देशामध्ये ‘जागतिक पर्यावरण दिवस’ वेगवेगळ्या पद्धतीने सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करून हा उत्सव साजरा करतात.पर्यावरण : पर्यावरण म्हणजे आपला सभोवतालचा परिसर. यात सजीव व निर्जीव घटक आहेत. सूर्य, हवा, पाणी, पृथ्वी व आकाश [पंच महा ऊर्जा] हे पर्यावरणाचे मुख्य घटक व नैसिर्गक ऊर्जा स्त्रोतांच्या स्वरुपात आहेत. तसेच सजीव घटक म्हणजे,पशु-पक्षी, जीव-जीवाणू, वृक्ष-वल्ली आणि आपण मानव आहोत.
ऊर्जा : नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत व जीवाश्म इंधन (डिझेल, पेट्रोल, रॉकेल, लाकूड, कोळसा, इत्यादी) या प्राथमिक ऊर्जा स्त्रोतापासून विद्युत ऊर्जा तयार करतात, यास दुय्यम ऊर्जा असे म्हणतात. आज जगभरात ऊर्जा व पर्यावरणाचे संवर्धन करणे व प्रदूषण कमी करण्यासाठी सतत जागृकता वाढत आहे. म्हणून ही संकल्पना मोठ्या प्रमाणात स्विकारली जात आहे. कारण, प्रदुषणामुळे होणारे निसर्गाचे असंतुलन व बदल जसे की पृथ्वीचे प्रचंड तपमान, अतिथंडी, अवेळी पडणारा पाऊस व त्याचे कमी-जास्त प्रमाण, गारांचा पाऊस, ढग फूटी, महापूर, समुद्र पातळीत वाढ, त्सुनामी, सागरी वादळे, आकाशातील विजांचा गडगडाट व जमिनीवर पडण्यात सतत वाढ, भूकंप, दुष्काळ, रोगराई, अनेक नैसिर्गक अपघात, इ. तसेच प्रदूषणाच्या अधिक पातळीमुळे मानव व पशु-पक्षांच्या शारिरीक व मानिसक वर्तणुकीतील विकार व बदल, आणि जैवविविधता यांचे भरपूर नुकसान होत आहे.
दुसरे महायुध्द झाल्यानंतर नंतर ५१ देश एकत्र येऊन, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी, राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि सामाजिक प्रगती, चांगले जीवनमान आणि मानवाधिकारांचा विकास करण्यासाठी १९४५ मध्ये आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघ या संस्थेची स्थापना झाली. वरील संकल्पना व त्याचे मूळ कारण या मुद्यांचा विचार करून, सन १९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेमध्ये, मानव व पर्यावरण या विषयी आयोजित केलेल्या पहिल्या परिषदेत, युनोची संलग्न शाखा म्हणून संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्र माची स्थापना झाली. दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचे निश्चित केले. प्रत्येक वर्षी, हृश्वक्क हा उत्सव साजरा करण्यासाठी यजमान देश, नवीन बोध चिन्ह आणि घोषवाक्य निवडतो.
यजमान देश व घोष वाक्य:दोन वर्षांनंतर, जागतिक पर्यावरण दिवस ५ जून १९७४, सर्व प्रथम युनायटेड स्टेट्स या देशाची यजमान पदासाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या यजमान पदाचा बहुमान त्यांना मिळाला. ‘केवळ एक पृथ्वी’ असे घोष वाक्य होते. जागतिक पर्यावरण दिवस ५ जून २०११, पहिल्यांदाच भारत देशाची यजमान पदासाठी निवड करण्यात आली होती. ‘वन: निसर्ग आपल्या सेवेशी’ असे घोषवाक्य होते. यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे व स्वच्छता इत्यादींचा समावेश होता. दुसऱ्यांदा, भारत देशाची जागतिक पर्यावरण दिवस ५ जून २०१८, यजमान पदासाठी निवड करण्यात आली होती. ‘प्लॅस्टिक प्रदूषणाशी संघर्ष’ - आपण ते पुन्हा वापरू शकत नसल्यास, त्याला नकार द्या. असे घोष वाक्य होते. या वर्षी, जागतिक पर्यावरण दिवस.. ५ जून २०१९, चीन या देशाची यजमान पदासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील बोधचिन्ह व ‘वायू प्रदूषणाशी संघर्ष’ असे घोषवाक्य आहे. यावर्षी, ४६ वा जागतिक पर्यावरण दिवस साजरा होत आहे.प्रदूषणचे प्रकार:सर्व सजीव जगण्यासाठी आणि निर्जीव वस्तू टिकवून राहण्यास सक्षम नसणे, या वातावरणातील विपरीत बदलास ‘‘पर्यावरण प्रदूषण’’ असे म्हणतात. ते वेगवेगळ्या माध्यमातून अनेक प्रकारचे असते. पुढील काही उदा: रासायनिक, हरित वायू, भारी धातू, प्रकाश, ध्वनी, कीटकनाशके, आणि किरणोत्सर्गी [ (रेडियोअॅक्टिव्ह), इ. याशिवाय माती, पाणी, वायु, रासायनिक शेती हे प्रदूषणाचे प्रमुख भाग आहेत. आणि त्याही पुढील रेडियोधर्मिता आहे.
या वर्षी, जागतिक पर्यावरण दिवस ५ जून २०१९ साठी, ‘वायू प्रदूषणाशी संघर्ष’ - असे घोष वाक्य आहे. म्हणून प्रदूषणाच्या वरील अनेक प्रकारांपैकी फक्त वायू प्रदूषण या विषयी जाणून घेऊ...वायू प्रदूषणचे काही स्त्रोतमानव निर्मित स्त्रोत खनिज खाणी व रिफायनरी, सिमेंट व लोखंड प्रकल्प, इमारतीची मोडतोड व बांधकाम. कचरा व सांडपाणी, शेतामधील कीटक नाशकांची फवारणी, वीज निर्मिती, वाहतूक आणि औद्योगिक वापरासाठी कोळसा, तेल, गॅस, इतर जीवाश्म इंधन जळणे आणि निसर्गनिर्मित अनेक नैसर्गिक अपघात, ज्वालामुखीय विस्फोट, जंगलातील वणवे, चक्रीवादळांपासून वाळू व धुळींचे कण.
वायू प्रदूषणाचे घटक:वेगवेगळ्या स्त्रोेतापासून वायु प्रदूषण जेव्हा होते तेव्हा कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोकार्बन्स आणि लीड यासह अनेक प्रकारचे पदार्थ वातावरणात येत असतात. त्यामुळे हवेचे तपमान वाढते. तसेच त्यात धूर, धुलीकण, बॅक्टेरियल, इतर पदार्थ मिश्रीत असतात. जे हवेची गुणवत्ता आणि शुद्धता कमी करतात व दुर्गंधीयुक्त वास येतो.
वायू प्रदूषणांचे परिणाम:वायू प्रदूषणातील सर्व घटक नैसर्गिक चक्रातून पूर्णपणे काढून टाकता येत नाही. हेच घटक मुख्यत्वे हवामान बदलास जबाबदार आहेत. तापमानवाढीमुळे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊन नष्ट होत आहे. विहिरी, तलाव, धरणे, नद्या आटत आहेत. म्हणून शेतीतील उत्पादन कमी होत आहे, वन्य व पाळीव पशु-पक्ष्यांना चारा पाणी मिळत नाही. वन्य प्राणी गावात/शहरात येत आहेत. मानव जातीसह पशु-पक्ष्यांचे स्थलांतर होत आहे. उष्ण प्रदेश तयार होऊन भीषण दुष्काळ निर्माण होत आहे. पृथ्वीवरील मानव जातीसह जैवविविधतेतील जीव सृष्टी: पशू-पक्षी, वनस्पती, व इतर घटक नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व मानव जात आणि पशू पक्षी यांना शारिरीक व मानसिक विकार, वागण्यातील बदल, तसेच जे आपल्याला माहीत नाही असे नवीन नवीन रोग उदयास येत आहेत. आरोग्यदायी जीवन शैली साध्य होत नाही, त्यामुळे आयुष्यमान कमी कमी होत आहे. चक्रीवादळांपासून वाळू व धुळींचे कण हे वादळ हजारो मैलांचा प्रवास करू शकतात, ज्यामुळे रोगजनक आणि हानिकारक पदार्थदेखील वाहू शकतात. ज्यामुळे तीव्र समस्या उद्भवू शकतात. जगातल्या ७७० कोटी लोक संख्येतून दरवर्षी सुमारे ७ दशलक्ष लोक वायू प्रदूषणापासून मरतात, त्यापैकी ४ दशलक्ष लोक आशिया-पॅसिफिक खंडातील मरण पावतात. आपल्या देशात तर या वर्षी जगात सर्वाधिक सुमारे २५ लाख माणसे वायूप्रदूषणाने बळी पडली.
वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे होणारा वातावरणातील बदल व तपमान या घटना पृथ्वीवर रोज घडत आहेत. ते मिडीयावर आपण रोज वाचतो.जुलै - ऑगस्ट २००३ - संपूर्ण युरोपात उष्णतेची लाट.२६ जुलै २००५ - मुंबई महापूरात बुडाली.२८ मे २०१३, अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला टोर्नेडोने चक्र ी वादळाने नष्ट केले.१५ जून २०१३, उत्तराखंडात ढग फुटी व महापूर.१२ ऑक्टोबर २०१३ - भारतात व फिलीपाइनमध्ये फायन चक्र ी वादळ.१७ नोव्हेंबर २०१३ - सौदी अरेबियात रियाध शहरात खूप मोठा पाऊस.फेब्रुवारी २०१४ - युरोप व रशियात मुसळधार पाऊस व महापूर.फेब्रुवारी २०१४ - महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात गारांचा वादळी पाऊस.२० एप्रिल २०१४ - अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत व जगात इतर ठिकाणी उष्णतेच्या लाटा काही ठिकाणी गारांचा / मुसळधार पाऊस, महापूर.ऑगस्ट २०१४, श्रीनगर व काश्मीरमध्ये महापूर.१०, ११ डिसेंबर २०१४ - कोपरगाव, नाशिक, पुणे येथे गारपीटीचा मुसळधार पाऊस.८ ऑगस्ट २०१८ - केरळ मध्ये सर्वात मोठा मुसळधार पाऊस व महापूर.
आफ्रिकेतील केपटाउन जगातील पहिले पाणी संपलेले शहर.ही परिस्थिती आपण हाताळू शकलो नाही तर, जगभरात घटते अन्नउत्पादन व भूजल, नैसर्गिक स्वरूपात दिसणाऱ्या परंतु मानवनिर्मित असणाऱ्या वाढत्या दुर्घटना यामुळे करोडोंची स्थलांतरे व त्यातून याचे हिंसक रूपांतर होईल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. भारताने २०१८ सालात २३० कोटी टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करून या वायूच्या वाढीच्या दरात अमेरिका व चीनला मागे टाकले. याचा संबंध भौतिक विकासाशी आहे. अधिक विकास तर अधिक उत्सर्जन व अधिक वेगाने विनाशाकडे वाटचाल.याचाच परिणाम म्हणून सर्वत्र जीवघेण्या तापमानाचा विक्रम होत आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतात सर्व प्रथम मुंबई आहे, नंतर दिल्ली, बंगळुरु, कोलकाता, पुणे आहेत, त्यात आत्ता नाशिकचा क्रमांक येत आहे.
आताच्या अधिक बाष्पीभवनामुळे मराठवाड्यातील काही धरणांत १० टक्केपेक्षा कमी पाणी उरले आहे. पाणी सोडता येत नाही. कारण आवश्यक पातळीपेक्षा ते कमी आहे. सर्वात जास्त धरणे महाराष्ट्रात असून भीषण दुष्काळ पडला आहे, अन्न पाण्याच्या शोधात नाशकात बिबटे व येवला शहरात माकडे येत आहेत, मातोरीत ४० मोर मृत्युमुखी पडलीत. द्राक्ष पंढरी व वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे.
उपाय : जागतिक पर्यावरण दिवस प्रत्येक वर्षी दि. ५ जून रोजी साजरा होतो. त्यानिमित्ताने आपण त्या एकाच दिवशी जागे होतो किंवा आपल्यावर संकट आल्यानंतरच. तोपर्यंत आपण पर्यावरण, प्रदूषण, आपत्ती, हे सर्व शब्द चर्चा करून गुलदस्त्यात ठेवून राजरोसपणे जीवन जगतो. मात्र आता खरी वेळ आली आहे, वास्तवतेचे भान ठेवून कृती करण्याची:- जगभरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि नेत्यांना प्रेरणादायक प्रबोधन करावे लागेल.- स्वत:च्या अनावश्यक इच्छांशी असलेला लढा आहे, हे ओळखून कृत्रिम जीवनपध्दतीचा त्याग करावा व पर्यावरण जीवन-स्नेही पद्धतीकडे वळावे.- प्रदूषण करायचे नाही याची सुरुवात स्वत: पासून, आपल्या घरातून व काम करण्याच्या जागेत झाली पाहिजे.- कायदा व नियमांचे काटेकोर पालन करणे.- प्रदूषणाला कायम स्वरूपी नष्ट कण्यासाठी, उत्पादनाचे डिझाईन, उत्पादन क्रिया आणि वापर करण्याच्या दृष्टिकोनावर संपूर्णपणे फेरविचार करण्याची आवश्यकता आहे.- जगभरातील सरकार, उद्योग, नवप्रवर्तनकर्ते यांना पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान, पध्दत व नवीन मॉडेल विकसित करण्यास प्रोत्साहन देणे.- पाणी, माती व झाडी यांचे संवर्धन व विषमुक्त / नैसर्गिक शेती करणे. प्रदूषण करणारे औद्योगिकरण थांबवणे व उद्योगपूर्व कृषियुगात परत जाणे, हेच व्यवहारिक ठरणार आहे.- जगभरातील सर्व शहरे प्रदूषित झाली आहेत, त्यांना स्मार्ट सिटी संकल्पनेत अंतर्गत, सध्या सुस्थितीत असलेल्या पायाभूत सुविधा तोडून नवीन तयार करताना नागरिकांची गैर सोय, वेळ व देशाचे आर्थिक नुकसान होत असताना फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे प्रदूषण होत हे. या ऐवजी खेड्यांचा पर्यावरण पूरक शाश्वत विकास केल्यास, गावातील लोक गावातच थांबतील, ते शहरात येणार नाहीत, त्यामुळे शहरी पर्यावरण प्रदूषणास आळा बसेल.
निष्कर्ष:- सध्याचा विकसनशील देशांची वाढती अर्थव्यवस्था व ऊर्जेचा वाढता वापर तसेच विकसित देशातील दरडोई असलेला मोठ्या प्रमाणावरील वापर यामुळे ऊर्जेचा वापर कमी होणे सध्यातरी शक्य दिसत नाही. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या ऊर्जास्रोताने जागतिक तपमान वाढ होणार नाही, यावर अजूनतरी समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. - कोट्यवधी वर्षे पृथ्वीवरील कार्बनचे सरासरी प्रमाण संतुलित होते. पहिली औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीस सन १७५० ला २८० पीपीएम होते. वातावरणातील कार्बनचे सरासरी ४०० पीपीएम असायला पाहिजे. (१ पीपीएम कार्बन म्हणजे ३०० कोटी टन) १२ मे २०१३ ला कार्बन ने 400 पीपीएम धोक्याची पातळी ओलांडली आहे. १.७ सें. ग्रे. ची वाढ झाली आहे. पृथ्वीचे सरासरी तपमान आता ०.२ सें. ग्रे. प्रती वर्षाने वाढत राहणार आहे. हा अहवाल युनोच्या जागतिक हवामान संघटनेचा आहे.
कार्बन डाय ऑक्साईड व इतर उष्णता शोषणारे वायू कमी करण्याची १९६ देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन १२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिस कराराला एकमताने मान्यता दिली. पॅरिस करारात मानवजात वाचवण्यासाठी नमूद केलेली २ सें. ग्रे. ची धोक्याची पातळी आपण २ ते ५ वर्षांत ओलांडत आहोत. जनतेला याचा अर्थ समजू दिला जात नाही. मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याची शेवटची संधी आहे. यात कोणतीही आत्मप्रौढी / अतिशयोक्ती नाही. या पुढे जगाचा विनाश फक्त दोन कारणाने होऊ शकतो, एकतर अणू युद्ध किंवा पर्यावरणाच्या बदलामुळे.
(लेखक हरित प्रकल्प सल्लागार आहेत)