- रामचन्द्र गुहा(ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)गेली कित्येक वर्षे मी माझा मोठा कालावधी आणि पैसे पुस्तकांवर खर्च केले आहेत. त्यातही मी पुस्तके घेताना संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या दुकानातून घेण्याऐवजी वैयक्तिक मालकीच्या दुकानातून घेतली आहेत. भारतातील अशी चार दुकाने माझ्या आवडीची आहेत, पहिले बंगळुरुचे प्रिमिअर, दिल्लीतले फॅक्ट अॅन्ड फिक्शन, लखनौमधले राम अडवाणी आणि चेन्नईतले गिगल्स. बंगळुरु शहराच्या मध्यवर्ती भागातील चर्च स्ट्रीटवरचे टी.एस.शानबाग यांचे प्रिमिअर हे दुकान माझ्या जास्त परिचयाचे आहे. शानबाग हे स्वत:च पुस्तकप्रेमी होते. त्यांना त्यांच्या ग्राहकांची आवड-निवड चांगलीच माहीत होती. एखादा ग्राहक दुकानात प्रवेश करताच त्याच्या आवडीच्या विषयाचे नवे पुस्तक त्याच्या हाती देण्याचे त्यांचे सौजन्य होते. तरी सुद्धा ते पुस्तक ग्राहकाने विकत घ्यावेच असे काही बंधन नव्हते. ग्राहकाने पुस्तक चाळून परत केले तरी त्यात त्यांना संकोच वाटत नव्हताप्रिमिअरमध्ये पुस्तकांची निवड आणि शोध सोपा व्हावा यासाठी एक छोटीशी पुस्तिका दिली जायची. इतिहास, आत्मचरित्र, इंग्रजी आणि भाषांतरीत काल्पनिक कथांची पुस्तके ही या दुकानाची वैशिष्ट्ये होती. हे दुकान सुद्धा अगदी मोक्याच्या जागी होते. ‘कोशीज परेड कॅफे’ पासून जवळ आणि चिन्नास्वामी स्टेडीयमपासून हाकेच्या अंतरावर ते होते. बंगळुरुतील ही दोन ठिकाणे मला नेहमीच भावली आहेत. प्रिमियर २००९ साली बंद पडले, कारण त्याच्या मालकाने सन्मानजनक निवृत्ती घेतली. प्रिमिअर बंद पडल्यामुळे माझ्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. पण प्रिमियरमुळे खिशाला पडलेली भोके तशीच राहिलीे. आता मी पुस्तकांवरचा खर्च दिल्लीतल्या वसंत विहार भागातील फॅक्ट अॅन्ड फिक्शन या दुकानात करु लागलो. दुकानात त्याचे मालक अजित सिंग नेहमी भेटत असत. दिल्लीला गेल्यावर या दुकानाला भेट ठरलेलीच होती कारण ते विमानतळ मार्गावरच होते. अजित सिंग तसे मितभाषी होते, पण माझ्याशी दिलखुलासपणे बोलत असत कारण आम्ही एकाच महाविद्यालयात होतो. त्या दिवसात मी क्रि केट खेळायचो तर ते वॉटर पोलो संघाचे कर्णधार होते. त्यांच्या दुकानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिथली पुस्तके जाणीवपूर्वक अभिजनांच्या अभिरुचीची असत. ते प्रामुख्याने विक्र म सेठ, चेतन भगत, अतुल गवांदे आणि दीपक चोप्रा अशा लेखकांची पुस्तके दुकानात ठेवत. त्यांचे ग्राहकदेखील उच्चभ्रूच असत. पण आता फॅक्ट अॅन्ड फिक्शनसुद्धा प्रिमियरप्रमाणे बंद पडले आहे. वाढलेले भाडे, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यासारख्या स्पर्धकांनी अजित सिंगांचा व्यवसाय डबघाईकडे नेला होता. अनेक वर्षे पुस्तक सेवा देणारी ही दोन महत्वाची दुकाने इतिहासजमा झाली आहेत. राम अडवाणी आता ९५ वर्षाचे आहेत, ते अजूनही रोज दुकानात जातात पण त्यांची मुले लखनौ मध्ये राहत नाहीत. त्यांची पुस्तक विक्रीची धुरा सांभाळायला आता दुसरे कुणीच नाही. पुस्तकांच्या व्यवसायात राम अडवाणी यांच्या एवढे अनुभवी देशभरात कदाचित अजून कुणी असेल, ते कमालीचे सभ्य आणि विनयशील आहेत, हे त्यांच्या दुकानाकडे बघूनच समजते. त्यांच्या दुकानात मधुर शास्त्रीय संगीत नेहमीच ऐकायला मिळत असते. काही वर्षापूर्वी मी लखनौच्या एका वकिलाला विचारले होते की तुम्हाला लखनौमधले माझे आवडते पुस्तकांचे दुकान माहित आहे का? त्यांचे उत्तर होते, स्वाभाविकच माहित आहे. राम अडवाणी हे दुकान म्हणजे लखनौमधल्या इमामबाड्याएवढेच महत्वाचे ठिकाण आहे. इमामबाडा आहे तसाच राहील पण राम अडवाणी आणि त्यांचे पुस्तकाचे दुकानसुद्धा त्यांच्या मित्रांच्या आणि ग्राहकांच्या कायम आठवणीत राहील.मी लखनौला दर चार-पाच वर्षातून एकदा भेट देत असतो पण चेन्नईला नेहमीच जात असतो आणि तिथल्या नलिनी चेत्तूर यांच्या गिगल्स या पुस्तक दुकानाला भेट दिल्याशिवाय राहात नाही. बावीस किंवा त्याहून अधिक वर्षापूर्वी जेव्हा मी या दुकानातून पहिले पुस्तक घेतले, तेव्हा ते दोन खोल्यांचे आणि कॉनमरा हॉटेलच्या आवारातच होते. त्यावेळी ते मद्रास शहर होते आता ते चेन्नई झाले आहे, आता हॉटेलसुद्धा कॉनमराऐवजी ताज विवांता झाले आहे. आता नलिनी चेत्तूर यांचे गिगल्स दोन ऐवजी एकाच खोलीत आले आहे. इथला पुस्तक संग्रह अभिरुचीने तसाच श्रीमंत आणि नाविन्याने भरलेला आहे. दुकानाचे मालकसुद्धा तेवढेच सुस्वभावी आहेत. पण दुकान अजून किती दिवस व्यवसाय करेल हे अनिश्चित आहे. वाढते दर आणि वाढत्या जागा भाड्यामुळे गिगल्स सुद्धा लवकरच बंद पडेल आणि आठवणींचा भाग होऊन जाईल अशी स्थिती आहे. वरील सर्व लिखाण एका विलापिकेसारखे, श्रद्धांजली वाहण्यासारखे किंवा शांती पठणासारखे आहे. पण मी आता याचा शेवट एका कौतुकास्पद पुस्तक दुकानाने करणार आहे. हे पुस्तक दुकान अजूनसुद्धा जोमात चालू आहे आणि लेखकांसाठी आशादायक चित्र निर्माण करणारे आहे. या पुस्तक दुकानाचे नाव आहे गुलशन. ते श्रीनगर शहराच्या रेसिडेन्सी रोडवर आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मी या दुकानाला भेट दिली व त्याकडे बराच आकर्षित झालो. प्रशस्त असलेल्या या दुकानात प्रकाश सुद्धा चांगलाच आहे. अगदी कल्पकतेने सर्व विषयातली पुस्तके रचलेली आहेत. दुकानाच्या खिडक्या, कपाटे, मधला भाग या ठिकाणी पुस्तके अशी रचली आहेत की ग्राहक सर्व पुस्तकांकडे व्यवस्थित पाहू शकतो आणि त्यातून पाहिजे ते चटकन काढू शकतो. मी गुलशनमध्ये तब्बल दीड तास घालवला आणि खरेदी केली. बंगळुरूत घेतलेल्या सूटकेसमध्ये जागा अपुरी पडत होती म्हणून मी रस्त्याच्या कडेवरून नवी पिशवी विकत घेतली. या दुकानात काश्मिरचा इतिहास, राजकारण, धर्म यावरची इंग्रजी आणि उर्दू भाषेतली बरीच पुस्तके आहेत. इथे सर्वसाधारण विषयांवरची बरीच पुस्तके सुद्धा आहेत. मी तिथून दिल्लीच्या प्रकाशकांची काश्मिरवरची काही पुस्तके, सिमरनजीतसिंग मान या बंडखोर झालेल्या अधिकाऱ्याच्या कारागृहातल्या दिवसांवरचे पुस्तक आणि माझ्या पत्नीसाठी आधुनिक नक्षीच्या इतिहासाचे पुस्तक विकत घेतले. जुनी आणि आवडती पुस्तक दुकाने बंद पडतील पण नवीन दुकानांनी त्याची जागा घेतली पाहिजे. स्वतंत्रपणे पुस्तक दुकान सुरु करणाऱ्यांसाठी माझ्या मते गुलशन हे चांगले उदाहरण आहे. चांगल्या पुस्तकांचे प्रतिनिधित्व या दुकानाकडे आहे. ज्यात इंग्रजी आणि स्थानिक भाषातील स्थानिक विषयांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील दर्जेदार पुस्तकांचा सहभाग आहे.