व्यायाम करणं हा अनेक लोकांचा छंद असतो. कायम उठून जिमला जाणारे, सतत फिटनेसचा विचार करणारे असे अनेक लोक असतात. सगळ्यांच्याच आजूबाजूला ते असतात. आणि ही अशी खूप व्यायाम करणारी, सकाळी उठून पळायला जाणारी माणसं कोण असतील, कशी दिसत असतील, काय करत असतील याबद्दल प्रत्येकाच्या काही ठरलेल्या कल्पना असतात. या कल्पना प्रत्येकाच्या स्वतःच्या अनुभवातून तयार झालेल्या असतात, पण तरीही असा खूप व्यायाम करणारा माणूस हार्वर्डसारख्या जगप्रसिद्ध कायदा महाविद्यालयातील एक प्रोफेसर असेल असं पटकन कोणाच्या मनात येणार नाही.
पण खरोखरच हार्वर्ड लॉ कॉलेजमधल्या एका प्राध्यापकाने स्वतःचं ‘प्रोफेसर पुलअप्स’ हे नाव सार्थ ठरवत एका मिनिटात ७७ पुलअप्स मारत गिनीज बुकमध्ये एका नवीन विश्वविक्रमाची नोंद केलेली आहे. ॲडम सँडल या प्राध्यापकाने हा विश्वविक्रम केला आहे असं म्हणण्यापेक्षा तो परत मिळवला आहे, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. कारण मुळात २०१६ साली हा विश्वविक्रम ॲडमच्याच नावावर होता. त्यावेळी त्याने एका मिनिटात ५१ पुलअप्स मारल्या होत्या.
पुलअप्स म्हणजे काय? तर उंचावर असलेल्या आडव्या बारला दोन्ही हातांनी लटकायचं आणि फक्त हाताच्या ताकदीने शरीर वर उचलून हनुवटी त्या बारच्या वर न्यायची. आणि मग परत शरीर हळूच खाली सोडायचं. पाय जमिनीला टेकू न देता हेच पुन्हा करायचं. या व्यायाम प्रकारची गंमत अशी, की यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचा व्यायाम करावा लागतो; आणि तोही खूप! कारण पुलअप्स मारण्यासाठी हाताचे, खांद्याचे, पोटाचे, पाठीचे, मानेचे स्नायू वापरावे लागतात. स्वतःचं वजन उचलण्याइतपत स्नायू तयार करणं हे अत्यंत कठीण काम असतं. त्यात असे पुलअप्स भराभर मारायचे म्हणजे अजून जास्त ताकद आणि त्यातही चिवटपणा लागणार.
अनेक वर्षे व्यायाम करून शरीर कमावल्यावर ॲडमने २०१६ साली पहिल्यांदा हा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला, पण स्वतःलाच आव्हान देत राहणाऱ्या व्यायामपटूंप्रमाणे त्याने स्वतःचाच विक्रम मोडला, तोही एकदा नाही तर चार वेळा. २०१६ ते २०२० ही वर्षे ॲडम हा पुलअप्सच्या विश्वविक्रमांचा अनभिषिक्त राजा होता. त्याने शेवटचा विक्रम केला तो एका मिनिटात ६८ पुलअप्स मारण्याचा.
मात्र, त्यानंतर २०२० साली चीनच्या हाँग झोंगटाओ या व्यायामपटूने त्याचा विक्रम ६ पुलअप्सने मोडून एका मिनिटात ७४ पुलअप्स मारण्याचा नवीन विश्वविक्रम केला. त्यानंतर मात्र ॲडमने जणू विश्वविक्रम परत मिळवण्याचा ध्यासच घेतला. २०२० सालापासून २०२४ सालापर्यंत त्याने एका मिनिटात ७४ हून जास्त पुलअप्स मारण्यासाठी अथक मेहनत केली, पण हे काम फक्त जास्त मेहनत करून होण्यासारखं नव्हतं. कारण कितीही प्रयत्न केले तरी मानवी शरीराच्या मर्यादा कशा ओलांडणार? त्यात हा विश्वविक्रम करायचा तर प्रत्येक पुलअपचे निकष पूर्ण करणं भाग होतं. हे निकष कोणते? तर बार ओव्हरहँड ग्रीपनेच पकडला पाहिजे, हनुवटी दरवेळी बारच्या वर गेलीच पाहिजे, कोपर पूर्ण सरळ होईल इतकं शरीर खाली आणलं पाहिजे आणि कुठल्याही क्षणी कमरेत वाकलेलं चालणार नाही.
हे सर्व निकष पूर्ण करून एका मिनिटात जास्तीत जास्त पुलअप्स मारण्यासाठी ॲडमकडे एकच मार्ग उरला, तो म्हणजे दोन हातांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेणं. दोन हातातलं अंतर जर वाढवलं, तर पुलअप्स मारताना शरीर उचलण्याचं अंतर कमी होतं. म्हणजेच कमी वेळात जास्त पुलअप्स मारता येऊ शकतात, पण हा मार्ग चोखाळण्यात एक मोठी अडचणही होती.
कुठल्याही व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हे माहिती असतं, की हातात जास्त अंतर घेऊन पुलअप्स मारणं अत्यंत कठीण असतं. कारण त्यामुळे तुमची बारवरची पकड तितकीशी पक्की राहत नाही, पण ॲडमने तरीही तेच करायचं ठरवलं. त्याप्रमाणे व्यायाम केला, ताकद वाढवली आणि २०२४ साली एका मिनिटात ७७ पुलअप्स मारून विश्वविक्रम पुन्हा एकदा स्वतःच्या नावे करून घेतलाच.
माझा विश्वविक्रम मोडला जावा..
या प्रवासाबद्दल ॲडम म्हणतो, ‘हा विश्वविक्रम सगळ्यात कठीण विक्रमांपैकी एक आहे आणि गेल्या काही वर्षांत यात प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. हा विश्वविक्रम करताना शेवटचे १५ सेकंद माझ्यासाठी सगळ्यात कठीण होते. त्यावेळी मी माझ्या शरीराला अक्षरशः त्याच्या मर्यादेपर्यंत ताणलं. त्यातून माझ्या हाताच्या स्नायूंना तर थकवा आलाच, पण हा थकवा मला अक्षरशः पायाच्या स्नायूंपर्यंत जाणवत राहिला. माझा हा विश्वविक्रम टिकून राहील अशी मला आशा आहे, पण हा विश्वविक्रम कोणी मोडेल का हे बघण्याची उत्सुकताही आहे.’