साऱ्या मध्य आशियाला दहशतवाद्यांच्या हिंसाचाराने ग्रासले असतानाच आता त्या क्षेत्रावर अणुयुद्धाचे ढग गोळा होऊ लागले आहेत. सिरियाचा हुकूमशहा आसद याच्या जुलमी व अत्याचारी राजवटीविरुद्ध त्या देशातील जनतेने उठाव केला आहे. या उठावाला अमेरिका व अन्य पाश्चात्त्य लोकशाही देशांची साथ आहे. यापूर्वी अफगाणिस्तान, इराक, लिबिया व इजिप्तमधील लोकांच्या अशा उठावांनाही त्या देशांनी साथ दिली. परिणामी त्यात पूर्णपणे लोकशाहीवादी नसल्या तरी लोकशाहीसदृश राजवटी अधिकारारूढ झाल्या. या प्रदेशाचे दुर्दैव हे की थेट ट्युनिशिया, टर्की आणि नायजेरियापासून त्याला दहशतवादाने पुरते ग्रासलेच नाही, तर पार पोखरून टाकले आहे. जनतेच्या तेथील उठावांना पाश्चात्त्य देश शस्त्रांसह सारी साहाय्यता करतात. त्यामुळे त्या क्षेत्रात पाश्चात्त्यांचे राजकीय वजन वाढून तो प्रदेश अमेरिकेच्या प्रभावाखाली जातो याचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना राग आहे आणि चीनच्या झी शिपींग यांच्याही तो चिंतेचा विषय आहे. पाश्चात्त्यांच्या प्रभावक्षेत्राची ही वाढ रोखण्यासाठी पुतीन यांनी सिरियाच्या आसद राजवटीला प्रत्यक्ष साहाय्य करण्याचा निर्णय घेऊन त्या देशाच्या बाजूने आपल्या विमानांचे ताफे धाडले आहेत व त्या ताफ्यांनी सरकारविरोधी उठावकर्त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्याचा उद्योग सुरू केला आहे. पाश्चात्त्यांचे साहाय्य लोकशाहीवादी संघटनांना, तर रशियाचे आसद यांच्या हुकूमशाहीला असे त्या क्षेत्रातील आताच्या तणावाचे स्वरूप आहे. रशिया वा पाश्चात्त्य देश यांच्या हल्ल्यात त्यांच्यातलीच काही विमाने पाडली गेली आहेत. त्यामुळे मध्य आशियातील लोकशाही प्रस्थापनेचा प्रश्न मागे पडून रशिया व अमेरिका या महाशक्तीतच नवा संघर्ष उभा होण्याची भीती आहे. तसाही रशियाचा आक्रमकपणा गेल्या तीन वर्षात वाढला आहे. १९९१ पर्यंत रशियाच्या नियंत्रणातील सोव्हिएत युनियनचा एक भाग असलेला युक्रेन हा देश त्या वर्षीच्या डिसेंबरात त्यातून बाहेर पडला व रशियाच्या वर्चस्वापासूनही मुक्त झाला. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनचा क्रिमिया हा प्रांत त्यात लुटुपुटूच्या निवडणुका करवून आपल्या ताब्यात घेतला. आता सारा युक्रेनच रशियात सामील करून घेण्याच्या हालचाली त्याने सुरू केल्या आहेत. सगळी पाश्चात्त्य राष्ट्रे याची चर्चा व चिंता करीत असतानाच रशियाने त्यांना सिरियाच्या गृहयुद्धातही समोरासमोरचे आव्हान दिले आहे. परिणामी हा साऱ्या जगाच्या चिंतेचा विषय झाला आहे. इराक, इजिप्त, लिबिया इ. देशांत झालेल्या घडामोडींची ही युद्धकारी परिणती आहे. परिणामी टोळ्यांच्या दहशतवादांची चर्चा मागे पडून सिरियावरून अमेरिका आणि रशिया यांच्यातच युद्ध जुंपते की काय या भीतीने जगाला ग्रासले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने या घडामोडींची दखल घेऊन तीत या प्रश्नावरचे वाग्युद्ध सुरू झाले आहे. युरोपीय युनियनमधून इंग्लंड बाहेर पडल्याने पाश्चात्त्य लोकशाही देशांचे आजवरचे ऐक्य काहीसे खिळखिळे झाले, तर १९८९ मध्ये बर्लिनची भिंत जमीनदोस्त झाल्यापासून रशियाच्या जागतिक वर्चस्वालाही ओहोटी लागली आहे. आताचे त्या दोन्ही बाजूंचे प्रयत्न आपली जगातली घसरलेली वा घसरणारी पत सावरण्याचा प्रयत्नांत असणेही शक्य आहे. मात्र अशा प्रयत्नांतूनच महायुद्धाच्या ठिणग्या पडत असतात हा विसाव्या शतकाने दोन वेळा घेतलेला अनुभव आहे. येथे एक गोष्ट आणखीही नमूद करण्यासारखी, अशा राजकारणाला कधीकधी एरवी दुर्लक्षिल्या जाणाऱ्या कौटुंबिक बाजूंचीही मजेशीर जोड असते. सिरियाचा हुकूमशहा आसद हा त्या देशातील लोकशाहीवाद्यांशी चर्चा करायला एकदा राजीही झाला होता. पण त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचे व विशेषत: त्याच्या महत्त्वाकांक्षी आईचे वर्चस्व मोठे आहे आणि ‘काहीही झाले तरी आपल्या कुटुंबाच्या हातची सत्ता जाऊ द्यायची नाही’ हा तिचा निर्धार आहे. तिच्यासमोर आसद दुबळा होतो अशी माहिती सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना त्यांना कळविली होती. हिलरी यांच्या नव्या पुस्तकात या पत्राचा विशेष उल्लेख आहे. मात्र कौटुंबिक असो वा प्रादेशिक, मध्य आशियातील युद्धजन्य स्थितीला महायुद्धाचे स्वरूप येऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्रसंघासह जगातील सर्व देशांनी व लोकशाहीवादी शक्तींनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्य आशिया हा दहशती हिंसाचाराने पुरता दिशाहीन व दरिद्री होत चाललेला प्रदेश आहे. एकट्या सिरियामधून इतर देशांत वास्तव्यासाठी गेलेल्या निर्वासितांची संख्या ६० लाखांहून अधिक आहे. हाच प्रकार तुर्कस्तान, नायजेरिया, लिबिया आणि इराकबाबतही खरा आहे. तेथील गृहयुद्धाचे आणखी एक विशेष हे की हे एकाच धर्मातल्या लोकांनी परस्परांविरुद्ध चालविलेले युद्ध आहे. त्याची तीव्रता मोठी आहे आणि त्यातल्या युद्धखोरांचे धर्मांधपणही मोठे आहे. आपल्या या अवस्थेचा लाभ लोकशाहीवादी म्हणविणारे पाश्चात्त्य देश आणि अजूनही हुकूमशाहीचे अवशेष टिकवणारे रशियासारखे महत्त्वाकांक्षी देश घेत आहेत याची साधी जाणीवही या धर्मांध युद्धखोरांना नाही. मध्य आशिया हा गेली दोन दशके अशा हिंस्र आत्मसंघर्षात अडकलेला प्रदेश आहे आणि त्यातील युद्धसमाप्तीवर जगाची शांतता अवलंबून आहे.
हे तर जागतिक युद्धाचेच ढग !
By admin | Published: August 23, 2016 7:15 AM