जगातली सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहे? जेफ बेझॉस, एलॉन मस्क, बिल गेट्स, बर्नार्ड अरनॉल्ट कुटुंबीय, मार्क झकरबर्ग, वॉरेन बफे, लॅरी एलिसन, लॅरी पेज, सर्जी बिन, मुकेश अंबानी की आणखी कोणी? जगातल्या सर्वाधिक दहा श्रीमंत लोकांची ही नावं. याच्यातली काही नावं तुम्हाला माहीतही असतील, कारण बऱ्याचदा आलटून पालटून यांच्यातीलच कोणीतरी जगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती असतो, पण जगात सर्वाधिक पगार कोण घेतो, हे तुम्हाला माहीत आहे का? जगात सर्वाधिक पगार घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कोण आहेत, यांची नावं घ्यायची म्हटलं तरी आपल्या डोळ्यांसमोर काही व्यक्ती उभ्या राहतात. कोण आहे सर्वाधिक पगार घेणारा सीईओ?तुम्हाला काय वाटतं, कोण असेल? अल्फाबेट (गुगल)चे सीईओ सुंदर पिचाई? टेस्लाचे सीईओ एलन मस्क? ॲपलचे सीईओ टीम कुक? मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला? यांच्यापैकीच कोणा एकाचं नाव तुम्ही घेत असाल, तर तुम्ही सपशेल चुकता आहात.
जगात सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती यांच्यापैकी कोणीच नाही. आपल्याला अपरिचित असणारी ही व्यक्ती आहे ब्रिटनमधील एक महिला. डेनिस कोट्स हे तिचं नाव. जगात सर्वाधिक पगार घेणाऱ्या सगळ्या अतिरथी, महारथींना तिनं खूपच मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग बिलिऑनर्स इंडेक्सनुसार ‘ऑनलाइन बेटिंग प्लेटफॉर्म बेट ३६५’ ची संस्थापक आणि सीईओ डेनिस कोट्स यांना २०२० मध्ये तब्बल ४७० मिलिअन पाऊंड्सचं पॅकेज( म्हणजे 648 मिलिअन अमेरिकन डॉलर्स, म्हणजे जवळपास 49 अब्ज रुपये) मिळालं. ही कमाई ब्रिटनच्या पंतप्रधानांपेक्षा तब्बल 3126 पटींनी जास्त आहे.
५३ वर्षीय डेनिस कोट्स या ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. आता त्या जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओदेखील ठरल्या आहेत. जगातील सर्वाधिक पाचशे श्रीमंत लोकांमध्ये आधीपासूनच त्यांचं नाव होतंच. गेल्या वर्षातली त्यांची कमाई पाहाता दर दिवशी त्यांनी तब्बल दीड मिलियन अमेरिकन डॉलर्स कमावले. शेफिल्ड युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर कोट्स यांनी आपल्या वडिलांच्या बिझिनेसमध्ये मदत करायला सुरूवात केली. त्यांच्या वडिलांची जुगाराच्या दुकानांची एक छोटी चेन होती. त्यात कोट्स यांनी सुरुवातीला अकाऊंटंट म्हणून काम करायला सुरुवात केली. २२ वर्षांच्या असतानाच त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर बनल्या. त्यांच्या दुकानांची संख्या जसजशी वाढत गेली, कारभार वाढत गेला, तसं त्यांनी आपला बिझिनेस ऑनलाइन नेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खूपच योग्य ठरला आणि पैशांची गंगा त्यांच्याकडे वाहायला लागली. ‘स्टोक सिटी फुटबॉल क्लबचे स्वामित्व हक्कही कोट्स यांच्याकडे आहेत.
ब्लूमबर्ग वेल्थ इंडेक्समध्ये ज्या पहिल्या १७ सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांच्यात कोट्स या एकमेव महिला आहेत. ‘वर्जिन ग्रुप’चे संस्थापक रिचर्ड ब्रॅनसन आणि टोटेनहम हॉटस्पर फुटबॉल क्लबचे मालक जो लुई यांचाही यात समावेश आहे. ब्लूमबर्ग पे इंडेक्सच्या माहितीनुसार डेनिस कोट्स यांना ‘बेट ३६५’ या कंपनीच्या सीईओ म्हणून २०२० मध्ये तब्बल 648 मिलियन अमेरिकन डॉलर्स पगार मिळाला. त्याचवेळी अल्फाबेट (गुगल)चे सीईओ सुंदर पिचाई यांना २०२० मध्ये कोट्स यांच्या तुलनेत निम्माच म्हणजे 320 मिलियन अमेरिकन डॉलर्स पगार मिळाला. या अभ्यासापूर्वी सुंदर पिचाई यांना सर्वाधिक पगार मिळत असावा असं मानलं जात होतं.
टेस्लाचे सीईओ ॲलन मस्, ॲपलचे सीईओ टिम कुक, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला या सगळ्यांचा पगार कोट्स बाईंच्या निम्माही नाही, म्हणजे पाहा! डेनिस कोट्स या ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओ असल्या तरी, समाजाप्रतीही त्यांची बांधिलकी मोठी आहे. जगात सध्या सगळीकडे कोरोनानं हाहाकार माजवला असताना कोट्स यांनी ब्रिटिश सरकारला भरघोस मदत केली आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलाफोर्ब्जनेही जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पाच मार्च २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक श्रीमंत ३२८ महिलांची नावं आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे ज्या महिलांनी स्वबळावर आपलं नाव कमावलं आहे, अशा महिलांची संख्याही यात बरीच मोठी आहे. जगातल्या पहिल्या पाच श्रीमंत महिलांमध्ये फ्रँकॉइज बेटेनकोर्ट मेयर्स आणि कुटुंबीय (७३.६ बिलियन डॉलर्स, फ्रान्स), ॲलीस वॉल्टन (६१.८ बिलियन डॉलर्स, अमेरिका), मॅकेन्झी स्कॉट (५३ बिलियन डॉलर्स, अमेरिका), जुलिया कोच आणि कुटुंबीय (४६.४ बिलियन डॉलर्स, अमेरिका) आणि मिरिअम ॲडेल्सन (३८.२ बिलियन डॉलर्स, अमेरिका) यांचा समावेश आहे.