भरोणीया बार, हाती भरमार । नेम तो चुकार, कैसा होई उद्धार ।।
By सुधीर महाजन | Published: August 17, 2019 10:47 AM2019-08-17T10:47:31+5:302019-08-17T10:56:30+5:30
घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच.
- सुधीर महाजन
अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णी या दोन उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीत ‘घोडे बाजार बंद’ची घोषणा केल्याने अनेकांची पंचाईत झाल्याचे दिसले. ‘हेचि फळ काय मम् तपाला,’ असा करुणार्त गलका उच्चरवात कानावर आला. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसाठी हाच तर कपिलाषष्ठीचा योग असतो. कार्यकाळात घाऊक बाजार एवढाच भरतो. एरवी चिल्लर खुळखुळत फिरावे लागते; पण घोडेबाजार बंदची घोषणा खुद्द उमेदवारांनीच करणे म्हणजे दानशूर कर्णाने ऐनवेळी कवच-कुंडले नाकारण्यासारखेच. त्यामुळे पोटात गोळा येणे, जिवाची घबराट होणे, रक्तचाप वाढणे नैसर्गिकच समजले पाहिजे, अशा मानसिक अस्वस्थतेच्या वातावरणात शिवसेनेचे रांगडे उमेदवार अंबादासरावांनी थेट नाशिक मोहीम हाती घेऊन आपल्या नेक-नामदार ७१ मावळ्यांना तेथे हॉटेलात कुलूपबंद केल्याची माहिती हाती आली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. हॉटेलच्या दारावरच ‘हाऊस फुल्ल’ची पाटीही लटकवली.
शिवसेनेच्या तंबूत एवढी घबराट का उडाली? खरेतर शिवसेना आणि भाजप यांचे संख्याबळ पाहता दानवेंना निवडून येण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज नाही; पण युतीधर्माचे पालन झाले तरच. परिस्थिती तशी नाही. मावळेसुद्धा अखेरपर्यंत साथ देतील का, अशी शंकेची फट असल्याने अंबादास दानवेंनी दोर कापून टाकले आणि मावळ्यांना नाशिक प्रांती पाठविले. कारण भवानी तलवारीसारखे मजबूत, कणखर असणारे इमान आता पाण्यासारखे प्रवाही झाले आहे. सत्ता-संपत्तीच्या घसरगुंडीवर ते सहज घसरताना पावलोपावली दिसते, म्हणूनच ही शिबंदी नाशिकात बंदोबस्तात ठेवली अन् शिवबंधनाचा तोडगा बांधला. या गोंधळात भाजपचे मतदार आपल्याला कोणी सहल घडवते का, याचा अंदाज घेत आहेत.
भाजपने काँग्रेसच्या तंबूचे कळस कापल्यापासून तिकडे सामसूम आहे. अब्दुल सत्तार नावाचे सरदार आपल्या साथीदारांसह बाहेर पडले. आता त्यांची चाकरी कोणाच्या दरबारी रुजू होणार याची उत्सुकताही संपली. मनोमनी त्यांनी भाजपचे मंगळसूत्र बांधण्याचा निर्णय घेतला; पण तिकडून होकारही नाही अन् नकारही नाही, अशी स्थिती असल्याने त्यांची अवस्था अवघडल्यासारखी आहे. ‘महाजनादेश यात्रेत’ ते भाजपवासी होऊन श्रीरामाचा जयघोष करतील, असे वातावरण होते; पण प. महाराष्ट्रात आलेल्या महापुरात हे वातावरण वाहून गेले; पण आता ही यात्रा पुन्हा निघणार असल्याने त्यांना यात्रेत सामील करून घेतले जाईल का, यावर तर्कवितर्क चालू आहेत. घोडेबाजार बंदच्या परस्पर तहानंतर बाबूराव कुठे दिसले नाहीत आणि सत्तार आपल्या सैन्यासह दानवेंच्या मागे उभे राहिल्याचे चित्र उभे करण्यात आले. खरे-खोटे आई भवानीलाच माहीत.
( भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग )
एका चर्चेने मात्र जोर धरला. अंबादास दानवे निवडून आले, तर औरंगाबाद शिवसेनेत मराठ्यांचे वर्चस्व वाढणार. पराभवामुळे चंद्रकांत खैरे अगोदरच बॅकफूटवर गेले आहेत. दानवे हे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील मराठा नेत्यांना अडचणीचे ठरू शकतात आणि औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यातील त्याचा मराठा राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मराठा नेते सावध पावले उचलताना दिसतात. त्यांच्यादृष्टीने आजवर वळचणीला पडलेले कुलकर्णी हे निरुपद्रवी आहेत आणि निवडून आले तरीही निरुपयोगी आहेत. आपल्या जहागिरी शाबूत ठेवण्यासाठी कुळकर्ण्यांवर उपकार करणे हितकारी ठरू शकते. राजकारणाचे असे वेगवेगळे प्रवाह व समीकरणे सध्या मांडली जात आहेत. प्रत्येक जण आपल्या आकलनशक्तीद्वारे अर्थ लावण्यात मश्गूल असताना उरलेल्या नगरसेवकांना वेगवेगळे डोहाळे लागले आहेत.