विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
आर्थिक आणि लष्करी क्षेत्रात अतिशय वेगाने पुढे आलेल्या चीनचे सर्वोच्च नेते शी जिनपिंग यांनी ज्या कम्युनिस्ट पक्षाला गिळंकृत केले त्याच पक्षाने १९६२ साली त्यांचे वडील शी झोंगक्सून यांना तुरुंगात डांबले होते. झॉगक्सून हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ सदस्या पण हा हा माणूस दगाबाज असावा अशा संशयावरून माओ यांनी त्यांना तुरुंगात डांबले. पुढे राजकीय नेत्यांच्या मुलांसाठी असलेल्या शाळेतून शी जिनपिंग यांना काढून टाकण्यात आले. तरुण वयात ज्या जिनपिंग यांना पक्षाचे साधे सदस्यत्व मिळण्याची मारामार होती; तेच जिनपिंग आज बेताज बादशाह, चलाख हुकूमशहा झाले आहेत. आता हे जिनपिंग माओच्या कम्युनिझमला संपवायला निघाले आहेत का, असा प्रश्न पडावा।
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा विरोधकांवर सतत दात असला, तरी पक्षात कोणी हुकूमशहा होणार नाही याची तजवीजही होतीच. कोणीही व्यक्ती दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष पदावर राहू शकणार नाही, असा नियम १९९० च्या दशकात केला गेला. पण जिनपिंग यांनी अत्यंत चलाखपणे पक्षामध्ये आपले बस्तान बसवले. पक्षांतर्गत विरोधकांना संपवून ते २०१२ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. एका बाजूने चिनी जनतेला स्वप्ने दाखवली आणि दुसरीकडे आपल्याविरोधात कुणी आवाज उठवू शकणार नाही, असा खाक्या अवलंबला. पक्ष त्यांच्यापुढे गौण वाटावा इतके ते शक्तिशाली झाले. आता सर्वशक्तिमान पॉलिट ब्युरो जिनपिंग यांच्या इशाऱ्यावर नाचत असतो.
१९८९ साली लोकशाहीची मागणी करणाऱ्या हजारो चिनी युवकांना तियानमेन चौकात तोफेच्या तोंडी देण्यात आले, तेव्हा हे जिनपिंग लांबवरच्या फुजिया प्रांतात पक्षातली स्थानिक बंडखोरी चिरडण्यात गुंतलेले होते. त्यांच्या या क्रौर्यानेच त्यांना वेगाने पुढे नेले.त्या घटनेनंतर लगेचच तत्कालीन भारतीय पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबरोबर मी तियानमेन चौकात गेलो होतो. 'येथे काहीही झालेले नाही' असेच लोक सांगत, त्यांच्या मते हे सारे अमेरिकेचे कारस्थाना आज हा नरसंहार चीनच्या इतिहासाच्या पानांवर कुठेही दिसत नाही. कारण? तो पुसून टाकण्यात आला आहे.
जिनपिंग यांच्या कार्यकाळात अशा घटना आणखी वाढल्या. विरोध करणारे रात्रीतून गायब केले जातात; आणि त्यांचा कधीच शोध लागत नाही. आज या हुकूमशहाने शिनजियांग प्रांतात पुन्हा शिक्षणाच्या नावाने लाखो उइगर मुस्लिमांना कैद करून ठेवले आहे. हाँगकाँगची स्वायत्तता चीनने गिळंकृत केली. २०१९ साली लोकशाहीसाठी झालेल्या आंदोलनालाही क्रौर्य आणि चलाखीने चिरडून टाकण्यात आले. २०२० साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा संमत करून लोकशाही समर्थक विरोध मोर्चे कायमस्वरूपी संपवण्यात आले.
चिनी संसद आता पूर्णपणे जिनपिंग यांची रबर स्टॅम्प झाली आहे. गेल्या शनिवारीच संसदेने जिनपिंग यांचे अत्यंत एकनिष्ठ ली कियांग यांना पंतप्रधानपदावर बसवले. लाखो लोकांचा भूकबळी घेणारी चीनची वादग्रस्त 'शून्य कोविड नीती' याच कियांग यांनी तयार केली होती. २०१७ मध्ये जिनपिंग यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचा समावेश घटनेत करण्यात आला यावरून राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवर बसलेल्या या हुकूमशहाची पकड किती मजबूत आहे, याचा अंदाज लावता येईल. या पूर्वी माओ आणि डेंग झियाओपिंग या दोनच नेत्यांचे विचार देशाच्या घटनेमध्ये सामील करून घेण्यात आले होते. आज जिनपिंग जे म्हणतील, त्याचा कायदा होतो, अशी परिस्थिती आहे. किती चिनी उद्योगपती आज कारावासात आहेत आणि किती देश सोडून गेले, हे कोणालाही सांगता येणार नाही. जॅक मा आजच्या घडीला कुठे आहेत हे कोणालाही माहीत नाही. चीनमध्ये सध्या सरकारवर टीका करण्याचे कोणतेही माध्यम उपलब्ध नाही. प्रमुख माध्यम संस्था संपवण्यात आल्या असून केवळ सरकारी माध्यमेच काम करतात.
ही व्यक्ती केवळ राष्ट्राध्यक्ष नाही; तर अत्यंत धोकादायक हुकूमशहा आहे. स्वतः वगळता दुसऱ्या कोणाच्याही जिवाची ते पर्वा करत नाहीत. चिनी लोकांवर दमनचक्र फिरवत असतानाच दुसरीकडे सगळे जग आपल्या मुठीत यावे, यासाठी जिनपिंग आतुर आहेत. १०० पेक्षा जास्त देश चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत. श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान असो वा मालदीव; शेजारीपाजारी सगळीकडे चीनने घुसखोरी केली आहे. अमेरिकेला धमकावण्यापर्यंत या देशाची मजल गेली आहे. गरज पडल्यास संघर्ष होईल अशी धमकी चीनने मागच्याच आठवड्यात अमेरिकेला दिली. हेरगिरीसाठी । चिनी फुगा | अमेरिकेच्या आकाशात उडत होता, ही बातमी आपण वाचलीच असेल.
भारतासाठी ही स्थिती जास्त धोकादायक आहे, कारण हा असा बेभरवशाचा शेजारी चीन केवळ तिबेटच नव्हे तर आपलीही बरीचशी जमीन गिळून बसला आहे. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व तो मिळू देत नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अस्तित्वापुढेच या देशा प्रश्नचिन्ह उभे केले; ही जगाच्या दृष्टीने धोक्याच आहे. 'जिसकी लाठी उसकी भैंस' ही म्हण खरी करून दाखवत चीनची दांडगाई सुरु आहे. कुठे पैशाच्या जोरावर तर कुठे बंदुकीचा धाक दाखवून, कुठे संयुक्त राष्ट्रांमधल्या सत्तेच्या जोरावर तर कुठे औद्योगिक उत्पादनाच्या जोरावर चीनची ही दादागिरी चालते.
जगासाठी चांडाळ झालेल्या जिनपिंग नावाच्या या हुकूमशहाने प्राचीन चिनी सभ्यता संपवून टाकली आहे. चीनमध्ये विद्वानांचे नामोनिशाण ठेवलेले नाही. देशाच्या नावाने केवळ एक बाजार उभा केला आहे. सगळ्या जगाला तो आपल्या रंगाने रंगवू पाहतो आहे. या हुकूमशहाच्या मुसक्या आवळू शकेल, असे कोणी आहे का?
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"