गटवारी पद्धतीऐवजी यंदाची स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्याचा निर्णय आयसीसीने घेतल्याने यंदाच्या विश्वचषक क्रिकेटचे आव्हान मोठे असेल. प्रत्येक संघ ईर्षेने उतरल्याने यंदाचा क्रिकेटचा महाकुंभ उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही. क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ज्या विश्वचषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला असते, ती आजपासून सुरू होते आहे. यंदा दहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेकडे जगभराचे लक्ष लागले असले, तरी सातत्याने अपेक्षा उंचावत नेणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी नेमकी कशी असेल, याची उत्कंठा आपल्या क्रिकेट रसिकांत काकणभर अधिक आहे. येत्या सहा आठवड्यांत खेळल्या जाणा-या ४८ सामन्यांतील थरारअनुभवण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहतेही सरसावले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल असलेला इंग्लंडचा संघ, त्या खालोखालचा भारत आणि आॅस्ट्रेलिया या संघातील कोणी अतुल्य ठरतो की, वेगळाच संघ बाजी मारून जातो, याबद्दल अनेक अंदाज वर्तविण्यात येत आहेत. या स्पर्धेत आणखी एक उत्सुकता आहे, ती भारत-पाकिस्तान या संघांतील ‘हायव्होल्टेज’ सामन्याची. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन संघांतील सामना जेव्हा सुरू होईल, तेव्हा अवघ्या क्रिकेटविश्वाची नजर या सामन्यावर खिळून राहील. ‘ही विश्वचषक स्पर्धा आहे. आम्ही केवळ एका संघाविरुद्ध नाही. सर्वांविरुद्ध बाजी मारून जगज्जेतेपद पटकावण्याचा आमचा प्रयत्न राहील,’ हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इंग्लंडला रवाना होण्यापूर्वीचे मत त्या दृष्टीने पुरेसे बोलके आहे. नेहमीच्या गटवारी पद्धतीला मागे टाकून यंदाची स्पर्धा लीग पद्धतीने घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला.
या आधी १९९२ साली याच पद्धतीने विश्वचषक स्पर्धा खेळविण्यात आली होती. गटवारी पद्धतीच्या स्पर्धेतील सहभागी संघांना विविध गटांत विभागले जात होते आणि त्यातून पुढची फेरी गटविजेत्यांमध्ये खेळविली जायची. मात्र, यंदाच्या स्पर्धेत सहभागी सर्व १० देश परस्परांविरुद्ध खेळतील आणि त्यामुळेच यंदाचा विश्वचषक अत्यंत आव्हानात्मक असल्याचे मानले जाते. कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धेची किंवा आॅलिम्पिकची चर्चा ही प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्याआधी काही दिवस रंगू लागते. भारतीय क्रिकेट याला अपवाद आहे. प्रत्येक विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर लगेच क्रिकेटचाहत्यांना वेध लागतात, ते पुढील विश्वचषकाचे. जेव्हा २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जगज्जेतेपद पटकावले, तेव्हापासूनच क्रिकेटचाहत्यांना वेध लागले, ते २०१५ साली भारत विश्वचषक राखणार का? याचे. २०१५ साली भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. आॅस्टेÑलियाने पाचव्यांदा विश्वचषक पटकावला. त्यानंतर, चाहत्यांना २०१९च्या विश्वचषकाचे वेध लागले. आता हा क्रिकेटचा महाकुंभ सुरू होत असल्याने त्याबद्दलची उत्कंठा किती असेल, याचा अंदाजच लावलेला बरा. विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी संपूर्ण क्रिकेटविश्व इंग्लंडमध्ये अवतरले आहे. सर्वाधिक म्हणजे, पाचव्यांदा या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाची संधी इंग्लंडला मिळते आहे. क्रिकेटच्या जन्मदात्या असलेल्या या देशाला आतापर्यंत एकदाही विश्वचषक स्पर्धा जिंकता आलेली नाही, हीच या क्रिकेटची खरी गंमत आहे.इंग्लंडने आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत धडक मारली आणि तिन्ही वेळा त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. यंदा कामगिरीत सातत्याचे मोठे आव्हान प्रत्येकापुढे असेल. आतापर्यंतच्या गटवारी स्पर्धेतील धक्कादायक निकाल यंदा कमी प्रमाणात पाहायला मिळतील. कोणताही संघ प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्यास तयार नाही. संभाव्य विजेत्यांत यजमान इंग्लंड, भारत आणि आॅस्टेÑलिया आघाडीवर असले, तरी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातही जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हेही धक्कादायक निकालाच्या जोरावर अनेक संघांची वाटचाल रोखू शकतात. भारतात एकीकडे नवे सरकार सत्तारूढ होत असताना, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी रंगात आलेला असताना, पहिल्या सामन्याचा थरार सर्वांना पाहायला मिळेल. या सामन्यात आपल्या संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत यंदाचा विश्वचषक पटकवावा, अशी प्रत्येक क्रीडा रसिकाची अपेक्षा आहे. यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला शुभेच्छा.