गाझामधील दायर-अल-बलाह हा परिसर. तिथला खालिद जोदेह हा नऊ वर्षांचा मुलगा. गाझामध्ये काय चालू आहे, इथे एवढे लोक का मरताहेत? रक्तपात का होतो आहे? जिकडे पाहावं तिकडे मृतदेहांचा खच, लोकांच्या आरोळ्या आणि रुदन का चालू आहे, हे समजण्याचं त्याचं वय नव्हतं. त्याला एकच कळत होतं, आपल्या आईच्या कपाळावर दिवसेंदिवस इतक्या आठ्या का पडताहेत? तिच्या डोळ्यांखाली अचानक इतकी काळी वर्तुळं का दिसायला लागली आहेत? ती एवढी चिंतेत का आहे?... काही तरी फार वाइट होतं आहे, एवढंच त्याला कळत होतं.. पण काय?.. कशामुळे?.. त्यानंतर थोड्याच दिवसांत त्याच्या बाबतीत जे काही सर्वांत वाइट होऊ शकत होतं तेही झालं. त्यांच्या घराजवळ एक मोठा बॉम्ब पडला. जोरदार धमाका झाला, लोकांच्या आरोळ्यांनी आसमंत दणाणून गेला. त्यात परिसरातले अनेक जण ठार झाले. दुर्दैवानं त्याचे सारे कुटुंबीयदेखील त्यात मारले गेले. आई, वडील, भाऊ, बहीण.. संपूर्ण परिवारात फक्त तो आणि त्याचा सात वर्षांचा धाकटा भाऊ एवढेच उरले.
लहान भावाचं नाव तामेर. आई, वडील.. घरातले सारेच जण ठार झाल्याने तो प्रचंड हादरला. आईशिवाय तर रोज त्याचं पानही हलत नव्हतं. या हल्ल्यात छोटा तामेर वाचला असला तरी तोही जखमी झाला होताच. त्याच्या पाठीला आणि एका पायाला मोठ्या जखमा झाल्या होत्या. खालिदही छोटाच. पण आता घरात सगळ्यात ‘मोठा’ तोच होता. घाबरलेल्या लहानग्या भावाला तो सतत धीर देत असायचा. घाबरू नकोस, सगळं काही ठीक होईल. रडणाऱ्या तामेरला तो थोपटून चूप करायचा. त्याला सांगायचा, आपले आई-वडील आकाशातून आपल्याकडे पाहताहेत. तू जर असा रडलास तर त्यांना खूप दु:ख होईल..
मोठ्या भावाचं बोलणं ऐकून धाकट्या तामेरला थोडा दिलासा मिळायचा. पण गाझामधील परिस्थिती काही सुधरेना.. उलट तिथे होणारे हल्ले आणि रक्तपात अधिकच वाढायला लागला. यामुळे खालिदचाही आता धीर खचला. त्यात आधीच जखमी आणि त्यात मनानं खचलेला छोटा भाऊ तामेरनंही काही दिवसांत जीव सोडला. खालिद आता एकटाच. जे कोणी त्यांचे नातेवाइक बचावले होते, त्यांच्या मदतीनं तो कसाबसा जगत होता. त्याच्या आयुष्यात जे जे काही वाइट व्हायचं होतं, ते खरं तर होऊन चुकलं होतं, पण या युद्धाला तेही मान्य नसावं. काही महिन्यांत एका बॉम्बस्फोटात तोही मारला गेला!.. एक संपूर्ण कुटुंब संपलं... इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला ७ ऑक्टोबरला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. या एक वर्षाच्या काळात अशा शेकडो हृदयद्रावक कहाण्या गाझापट्टीत पाहायला, ऐकायला मिळतात.
दुसरी घटना.. गाझामधीलच खान युनिस हा परिसर. रॉयटर्स या संस्थेसाठी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद सालेम यांना कळलं की तिथे एक मोठा हल्ला झाला आहे. अनेक जण ठार आणि जखमी झाले आहेत. ते तातडीनं तिथल्या रुग्णालयात गेले. सगळीकडे हाहाकार, पळापळ आणि रडारड.. तिथेच जमिनीवर एक महिला पडली होती. पोटाशी बाळाला गच्च आवळून ती आक्रोश करीत होती. या हल्ल्यात हे छोटं बाळही मृत्युमुखी पडलं होतं. रुग्णालयातले कर्मचारी तिला बाळाला सोडायला सांगत होते, पण ती बाळाला सोडायला तयार नव्हती. काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात तिच्या कुटुंबातला एकूण एक मारला गेला होता. तिची भाची तेवढी वाचली होती, तीही आता तिला सोडून गेली होती..
तिसरी घटना.. गाझातल्या त्या हॉस्पिटलमध्ये जखमींची इतकी गर्दी आहे की कॉट तर सोडा, जमिनीवरही पडायला जागा नाही. तिथल्या कोणत्याच हॉस्पिटलमध्ये इतकी जागाच नाही, की रुग्णांना सामावून घेता येईल. रुग्णांवर इलाज करताना कागदावर प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायचं तर त्यासाठीही जागा नाही. शेवटी सलाइन लावलेल्या गंभीर जखमी झालेल्या रुग्णाच्या पोटाचाच डॉक्टर ‘टेबल’ म्हणून वापर करतात आणि रुग्णांना औषधं लिहून देतात.. अर्थात ती औषधं मिळणारच नाहीत, याची त्यांनाही खात्री आहे! कारण सगळंच उद्ध्वस्त झालेलं आहे..
निखाऱ्यांतही अन्न शोधणारी मुलं..
अशा अनेक घटना.. या घटना नुसत्या ऐकूनही थरकाप व्हावा. गाझातले जे लोक या वेदना प्रत्यक्ष अनुभवताहेत त्यांच्या परिस्थितीची तर कल्पनाही करता येणार नाही. तरुण, गर्भवती महिलांचं जगणं तर त्याहूनही खडतर.. ज्या महिला गर्भवती होत्या, त्यातल्या बहुतांश महिलांनी बाळांना अकालीच जन्म दिलेला. त्यामुळे ती बाळंही दगावलेली.. बॉम्बस्फोटात लागलेल्या आगी, त्यात मरून पडलेली माणसं आणि त्या धगीतल्या निखाऱ्यांतही अन्न शोधणारी मुलं.. सारंच भयंकर!..