बीड जिल्हा बँक भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई झाल्याने गेल्या पाच वर्षांची कोंडी अखेर फुटली. यानिमित्ताने सहकाराची लक्तरे बाहेर आली.सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार महाराष्ट्राला नवा नाही. गावागावांत अशी प्रकरणे आणि ती चवीने चघळण्यापलीकडे आजवर काही झाले नाही. बीड जिल्हा सहकारी बँकेतील १४१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे भिजत घोंगडे गेली पाच वर्षे पडले नसते. बोगस कर्ज आणि नियमबाह्य कर्ज प्रकरणे करून पैसे दिल्याचे हे प्रकरण आहे. एकूण ही भ्रष्टाचाराची ‘मोडस आॅपरेंडी’ नवी नाही, पण सत्तेचे शकट हाती असेल की नियम, कायदे गुंडाळून ठेवता येतात, ही समजूत राजकारण्यांची झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १0५ जणांना चौकशीसाठी बोलावणे हाच सहकार क्षेत्र आणि प्रस्थापित राजकारण्यांना हादरा आहे. गेल्या आठवड्यापासून संचालकांच्या अटकेच्या अफवा पसरत होत्या, अखेर त्यांच्यावर कारवाई करून पूर्ण अफवांना पूर्णविराम मिळाला. पाच वर्षांपूर्वी या बँकेत झालेल्या घोटाळ्यामध्ये जिल्ह्यातील सारी वजनदार मंडळी आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार अमरसिंह पंडित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, काँग्रेसचे सुभाष सारडा, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, जि.प.चे माजी सभापती धैर्यशील सोळंके (माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे हे भाऊ आहेत.) मंगला मोरे, राजाभाऊ मुंडे, रमेश आडसकर. या नावांवरून नजर टाकली तरी या वजनदारपणाचा अंदाज येतो आणि तपासासाठी उच्च न्यायालयाने पोलिसांना का धारेवर धरले, याची कल्पना होते.या नावांचा पक्षनिहाय विचार केला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा असा हा सर्वपक्षीय गोतावळा आहे. आता हा १ अब्ज ४१ कोटींचा घोटाळा आणि बीड जिल्ह्यातच सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत आणि जिल्हा सहकारी बँका या शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच स्थापन करण्यात आल्या होत्या. जो काही तपास आजवर झाला त्यावरून बँकेत कर्ज वाटप करताना नियम, कायदे गुंडाळण्यात आले हेही थोडे नाही, तर बनावट कर्ज वाटप प्रकरणे मंजूर करून पैसे दिले गेले, असे तपास सांगतो. बँकेवर स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कायम वर्चस्व राहिले. त्यांनी प्रारंभीपासूनच बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा फार्म्युला वापरला. त्यामुळे आरोपींच्या यादीवर पक्षीय नजर टाकली तर सर्व पक्षांच्या नेत्यांचा समावेश दिसतो. आदित्य सारडा हे अध्यक्ष आहेत. एक आरोपी सुभाष सारडा यांचे ते पुत्र. सुभाष सारडांना निवडणूक लढता येत नव्हती म्हणून त्यांनी मुलाला पुढे केले.या सर्वपक्षीय मिलीभगतला सादोळा येथील वि. का.सोसायटीचे सदस्य हरिभाऊ सोळंके यांनी सुरुंग लावला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खा. रजनी पाटील यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली. बोगस संस्थांना कर्ज दिल्याप्रकरणाची चौकशी होत नाही म्हणून ते न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानंतर तपास यंत्रणा कामाला लागली. दोषींची मालमत्ता जप्त करण्यासाठी अर्ज करण्यात आला. त्यानुसार आता आरोपींच्या मालमत्ता शोधण्यास सुरुवात झाली. ही कथा बँकेवरील दरोड्याची. चोर वाटा शोधून दरोडे टाकण्याचे प्रकार नवीन नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व बड्या मंडळींवर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याचे विधान करून सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. धनंजय मुंडेंशी त्यांचे असलेले विळ्या-भोपळ्याचे नाते एकवेळ बाजूला ठेवता येईल. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मंडळींना अडकविण्याचा विचार समजू शकतो; पण रमेश पोकळे, मंगल मोरे, राजाभाऊ मुंडे, राधाकृष्ण होके पाटील, रमेश आडसकर ही तर भाजपाचीच मंडळी आहे. गृह खाते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अख्त्यारीत येते. पूर्वीच्या आघाडी सरकारने कारवाईत चालढकल केली आणि आता हे युती सरकारही अंग चोरत आहे. या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीच आता कारवाईची मागणी केली हे बरेच झाले, आम्ही बोललो असतो तर गदारोळ उडाला असता,’ असा चिमटा तुळजापूर दौऱ्यात काढला. शेवटी पोलिसांनी साऱ्यांचाच येळकोट केला आणि कोंडी फुटली.- सुधीर महाजन
सहकाराचा येळकोट
By admin | Published: June 29, 2016 5:39 AM