- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहप्रिय इम्रान खान साहेब,आपले दु:ख मी समजू शकतो. सामना सुरू होण्याच्या आधी न्यूझीलंडने हे म्हणावे की, येथे दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे, आम्ही नाही खेळू शकत. तो संघ परत जातो. मग इंग्लंड तुमच्याकडे येत नाही म्हणून तुमची किरकिर होते, हेही स्वाभाविकच म्हणा! एक तर पाकिस्तानसाठी ही लाजिरवाणी गोष्ट, शिवाय सामन्यातून जो नफा होतो, खिसा भरतो तोही गेला. याला म्हणतात, ‘दुष्काळात तेरावा महिना.’ अशा स्थितीतले दु:ख, बेचैनी स्वाभाविक आहे. न्यूझीलंडचा संघ परत जात होता तेव्हा मला वाटले पाकिस्तानातील दहशतवादाबद्दल आतातरी आपण काही बोलाल. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डात सुधारणा करू म्हणाल; पण आपण हे काय केलेत, न्यूझीलंड संघाला पाठविण्यात आलेल्या धमकीच्या संदेशाचे सूत्रचालन भारतातून झाले होते, ई-मेल भारतातून आला होता, अशी बहुमूल्य माहिती आपले माहिती मंत्री फवाद चौधरी यांना कोणीतरी पुरविली. मुंबईच्या कोणी ओमप्रकाश मिश्रा यांचे नावही आरोपी म्हणून त्यांनी घेऊन टाकले. एखाद्या देशाचा माहितीमंत्री इतक्या मूर्खपणाच्या गोष्टी कशा करू शकतो याचे मला मात्र आश्चर्य वाटले. आता पाहा ना, पाक क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा लगेच म्हणू लागले ‘ही सगळी भारताची चाल आहे.’खानसाहेब, परिस्थिती आपल्या देशात बिघडलेली आहे, आपले लष्कर आणि आयएसआय दहशतवाद्यांना पाळत आहे आणि आरोप भारतावर. खुदाची तरी थोडी भीती बाळगा. आता आपण म्हणत आहात, जागतिक क्रिकेटवर भारताचे नियंत्रण आहे. हां खान साहब, ‘भारत के कंट्रोल में है क्रिकेट!’ ते खरेच आहे आणि ज्याची पात्रता असते, ज्याचे खेळाडू राष्ट्र आणि खेळाविषयी समर्पण भाव बाळगतात, त्याचेच नियंत्रण असते.- मी राष्ट्र हा शब्द इथे मुद्दाम वापरत आहे, ते का, हे कदाचीत आपल्याला समजणार नाही. केरी पॅकर आठवा. १९७७ ते ७९ या काळात पॅकर यांनी अनेक संघ तयार केले. त्यावेळी पाकचे सगळे खेळाडू त्यांच्याकडे गेले. आठवतेय का खानसाहेब, आपणही गेला होतात. त्यावेळी एकही भारतीय खेळाडू तिकडे गेला नाही, कारण पैशापेक्षा त्यांना देशासाठी खेळण्यात धन्यता वाटत होती. आपले किती खेळाडू देशात राहतात आणि किती विदेशात याचाही जरा विचार करा. आपणही जास्त काळ विदेशातच घालविला आहे. विषय निघालाच आहे तर भारतीय क्रिकेटविषयी काही गोष्टी आपणास सांगितल्या पाहिजेत. क्रिकेटचे बाळकडू ज्या ब्रिटिशांकडून आम्ही घेतले त्यांच्याच संघाला आम्ही पहिल्यांदा हरविले होते. पहिली मालिका भारताने पाकविरुद्धच जिंकली होती हे क्रिकेटमधल्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितले असेलच. जागतिक क्रिकेटचे नियंत्रण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडे कसे आले आणि आपण मागे का पडलात, हे जरा पाहू. सगळ्यात पहिली गोष्ट भारतीय बोर्ड सुरुवातीपासून स्वतंत्र संघटन आहे. विशेषत: गेली ३०-४० वर्षे ते ज्या पद्धतीने चालविले गेले ते प्रशंसनीय आहे. १९८३ साली विश्वचषक जिंकल्यावर आमच्याकडे पैसा यायला लागला. त्याचा आम्ही चांगला वापर केला. आज आमच्याकडे प्रत्येक राज्यात चांगले स्टेडियम आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत क्रिकेट खेळले जाते. शाळेपासून विद्यापीठापर्यंत खेळाच्या उत्तम सुविधा पुरविल्या जातात. त्यातून मुले पुढे येतात. मग त्यांना राज्याकडून खेळता येते. त्यानंतर दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफीसाठी त्यांना खेळायला मिळते. ११ खेळाडू खेळत असतात तेव्हा मागच्या रांगेत किती तयारीत असतात हे नाही सांगता येणार. आयपीएलच्या रूपाने आम्ही क्रिकेटला शानदार आकार दिला आहे. जगभरातल्या खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. आपल्या कुरापती सुरू असतात, त्यामुळे पाक खेळाडूंना नाही घेता आले ही गोष्ट वेगळी. पाकिस्तानात भारतासारख्या पायाभूत क्रिकेट सुविधा द्यायला हव्यात असे आपणच म्हणत असता. आता तर आपणच खुद्द पंतप्रधान आहात, मग त्या देत का नाही? जनाब, आपल्याकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डावर सरकारचे नियंत्रण आहे आणि स्थिती अराजकाची! प्रत्येक ठिकाणी राजकारण! आपले देशांतर्गत क्रिकेट बरबाद झाले आहे. जे खेळाडू पुढे येतात ते स्वत:च्या कष्टावर! त्यांना प्रोत्साहन नाही. क्षमा करा, पण आपल्याकडे क्रिकेट खेळाडूंचा अहंकार मोठा असतो. ते आपल्या मर्जीचे मालक! आपण स्वत: तीनदा निवृत्त झाला होतात हे आपणास आठवत असेलच. आपण गोलंदाज म्हणून सुपरस्टार होतात; पण १९९२ साली आपल्याला हुक्की आली आणि म्हणालात आता मी फलंदाज होणार. वाटले तर गोलंदाजीही करीन. खांसाहेब आमच्याकडे कुठल्याही खेळाडूने असा अहंकार नाही दाखविला.जागतिक क्रिकेट आम्ही आमच्या पैशाने चालवितो याचाही अहंकार आम्हाला नाही. क्रिकेट मोठे करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. न्यूझीलंड आपल्याकडून गेले आणि इंग्लंडचा संघ आला नाही, तर त्यात आमचा काही गुन्हा नाही. दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे पाप पाकिस्तानने केले आहे. ३ मार्च २००९ या दिवशी श्रीलंकेच्या संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता हे आपण विसरलात काय, त्यात ६ खेळाडू घायाळ झाले आणि आपल्या सुरक्षा यंत्रणेतल्या ६ जवानांसह ८ लोक मारले गेले होते. अशा स्थितीत आपल्यावर कोण विश्वास टाकील आपल्या घरात जरा डोकवा खानसाहेब. भारतीय क्रिकेट आपल्याशिवाय अधिक कोणाला माहिती असणार, तरी या अशा गोष्टी करता, ही आपली काही राजनैतिक मजबुरी आहे की दबाव, एका खेळाडूची भाषा तर अशी नाही असू शकत, नाही का?
हां खान साहब, भारतके कंट्रोल में है क्रिकेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 5:41 AM