योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केल्यानंतर एक आश्चर्यकारक वर्णन केले जात आहे. आदित्यनाथ यांच्या उदयाची तुलना आता नरेंद्र मोदींच्या उदयाशी केली जाऊ लागली आहे. मोदी यांच्या प्रमाणेच योगीसुद्धा अविवाहित आणि एका गरीब कुटुंबातून आले आहेत, त्यांनीही मोदींप्रमाणे तरु ण वयात घर सोडले होते आणि दोघांचीही जडणघडण हिंदुत्ववादी राजकारणाच्या मुशीतून झाली आहे. मोदींप्रमाणे आदित्यनाथसुद्धा विवादास्पद आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत. आदित्यनाथ यांनादेखील पंतप्रधान मोदींप्रमाणे इंग्रजी भाषेत संवाद साधणाऱ्या बुद्धिजीवींची भीती वाटत असते, शिवाय दोघांचेही दृष्टिकोन संशयाने भरलेले असतात. आम्हाला तर असे सांगण्यात आले आहे की, योगींकडे भविष्यातला पंतप्रधान होण्याच्या पात्रता आहेत. तरीसुद्धा या सांगोपांगी तुलनेत थोडी शंका वाटते. नि:संशय दोघा नेत्यांच्या सुरुवातीच्या काळात, वैचारिक जडणघडणीच्या काळात काही साम्य आहेत; पण त्यांच्यातला फरक त्यांच्या राजकीय उद्याच्या संदर्भात स्पष्टपणे दिसून येतो. मोदी हे संघाच्या शाखेत जात, पुढे ते संघाचे प्रचारकसुद्धा झाले, त्यांनी मोठा काळ भाजपाच्या निर्णय समितीत घालवत पक्ष बांधणीचे काम केले आहे. त्याचमुळे त्यांना भाजपाच्या निर्णय समितीच्या केंद्रस्थानी जागा मिळाली आहे. त्यांना २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजकीय सुरुवात मिळाली, त्यांनी त्यावेळी कुठलीही निवडणूक लढवलेली नव्हती; पण राज्यातील भाजपाच्या यशाचे ते शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले होते.उलटपक्षी आदित्यनाथ हे नेहमीच भाजपात बाहेरचे ठरले आहेत. त्यांची वैयक्तिक लोकप्रियता मोठी आहे, ते पाच वेळा गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तरीसुद्धा उत्तर प्रदेशातील भाजपा नेतृत्वाने त्यांना त्या प्रमाणात स्थान दिले नव्हते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना भाजपाच्या प्रचारात फारसे स्थान दिले नव्हते. आदित्यनाथ यांच्या उदयाला मोठी साथ लाभली ती राममंदिर आंदोलनाची, त्यांना गोरखनाथ मठाचे महंत केल्याचीही भर त्यात पडली होती. विशीत असतानाच त्यांना महंत पद प्राप्त झाले आहे. आदित्यनाथ हे हिंदू महासभेचे सदस्य होते आणि त्यांना संत-साधू समाजात महत्त्वाचे स्थान होते, याच समाजाने अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी जोरदार मागणी केली होती. त्यांनी त्यांचे लष्करी हिंदू राष्ट्रवादाचे वचन कधीच लपवलेले नाही. याच लष्करी हिंदू राष्ट्राच्या वचनाने आदित्यनाथ यांच्या राजकारणाला आकार दिला आहे. आदित्यनाथ यांची हिंदू युवा वाहिनी ही संघटना हिंदू बहुसंख्यत्वाच्या आणि मुस्लिमांनी दुय्यम दर्जा स्वीकारण्याच्या कल्पनेला पुढे रेटत आली आहे. गोहत्त्येला विरोध, घर वापसी आणि लव्ह जिहाद या मोहिमांमध्ये त्यांचे शत्रू नेहमी मुस्लीमच राहिले आहेत.योगींनी १६ व्या लोकसभेतसुद्धा नेहमीच हिंदुत्ववादाला केंद्रस्थानी ठेवून तसेच मुद्दे चर्चेला आणले आहेत, विशेषत: गोहत्त्येचा मुद्दा. मोदींच्या बाबतीत म्हणायचे झाले तर त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक हिंदुत्वाचा नायक अशी उभी करण्यात आली होती. २००२ सालच्या गुजरात दंगली आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे ते हिंदुत्वाचे राष्ट्रीय नायक झाले होते. त्यांची हीच प्रतिमा त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या उभारणीला सहाय्यक ठरली. त्यावेळी मोदींवर चिथावणीखोर वक्तव्ये करण्याचा आरोप लावण्यात आला होता. (हम पाच, उनके पच्चीस, आठवा) त्यांच्यावर विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्या चिथावणीखोर वक्तव्याकडे दुर्लक्षित करण्याचा आरोपदेखील आहे. तोगडियांच्या वक्तव्यांनी दंगलसुद्धा भडकली होती. २००७ साली पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर मोदींनी स्वत:ची प्रतिमा विकासाला प्राधान्य देणारी म्हणून उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याच प्रतिमेने पुढे त्यांचा राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणात उदय केला होता. नंतर त्यांनी तोगडियांपासून अंतर ठेवायला सुरूवात केली होती. रस्त्याच्या कडेला उभ्या, अतिक्रमण करून बांधलेल्या मंदिरांना तोडण्याचे आदेश देऊन त्यांनी विश्व हिंदू परिषदेचा रोष ओढवून घेतला होता. तसा निर्णय घेणे ही त्यांची व्यूहरचना होती की नव्हती माहीत नाही; पण त्यातून हे मात्र सूचित झाले होते की, त्यांना स्वत:ची प्रतिमा बदलायची होती किंवा त्यांना व्यापक राजकारणाचा मुखवटा चढवून घ्यायचा होता.आदित्यनाथ यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी चेहऱ्यावर तसा कुठलाही मुखवटा धारण केलेला नाही किंवा त्यांनी त्यांची प्रतिमाही बदललेली नाही. गेल्या दोन दशकात त्यांनी जाहीरपणे केलेल्या वक्तव्यांनी नेहमीच वाद उभे राहिले आहेत. त्या वक्तव्यांमध्ये अल्पसंख्याकांना धमकावणीचा प्रयत्न होता तसेच दंगलीला उद्युक्त करण्याचा प्रयत्नदेखील होता. यातून ते घटनेच्या मूल्यांचे उल्लंघन करत होते आणि राजकीय नैतिक व्यवहार संहितासुद्धा तोडत होते. त्यांचे समर्थक त्यांच्या गोरखपूरमधून पुन्हा पुन्हा निवडून येण्याला त्यांची लोकप्रियता भलेही म्हणतील; पण त्यांना हे कळूच शकत नाही की निवडणुकीतला विजय गुन्हेगारी वागणुकीला कायदेशीर करत नाही. आदित्यनाथ हे बाळासाहेब ठाकरे जास्त आणि नरेंद्र मोदी कमी वाटतात. शिवसेनाप्रमुखांनी विरोधकांना, परप्रांतीयांना आणि राष्ट्रविरोधी मुस्लिमांना धडा शिकवण्यासाठी समर्थकांना उत्तेजित केले आहे. ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते; पण त्यांनी रिमोट कंट्रोल म्हणून राहणे पसंत केले होते. आदित्यनाथ यांनी त्यांच्या इच्छा आहे तशाच ठेवल्या आहेत आणि त्यांना देण्यात आलेल्या मोठ्या बक्षिसाचाही स्वीकार केला आहे.मोदींप्रमाणे आदित्यनाथ यांचीसुद्धा प्रतिमा कणखर, व्यावहारिक प्रशासक, कायदा आणि सुव्यवस्था कठोरपणे राबवणारे म्हणून पुढे करण्यात आली आहे. देशात सर्वात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या राज्याचे प्रशासन राबवणे खरेच गुजरातचे प्रशासन राबवण्यापेक्षा अवघड काम आहे. आदित्यनाथ यांच्या खांद्यावर मोदींच्या खांद्यावर होत्या त्याहून अधिक जबाबदाऱ्या आहेत. विशेषत: योगींसमोर आव्हान असणार आहे ते त्यांच्या समर्थकांना नियंत्रणात ठेवण्याचे, कारण त्यांच्या मनात ही भावना निर्माण झालीच असेल की त्यांचा सुवर्णकाळ चालू झाला आहे. रोड-रोमिओंच्या विरोधात निर्माण करण्यात आलेली पथके आता उपद्रवी ठरतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे म्हणजे भावनेच्या आधारावर सुरू करण्यात आलेल्या राममंदिर आंदोलनाचे पुनरुज्जीवन आहे की काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. २००१ साली जेव्हा संघाने मोदींना गुजरातमध्ये परत पाठवले होते तेव्हा संघाला हे माहीत होते की ते मोठी जोखीम उचलत आहेत; पण त्यांचा निर्णय यशस्वी ठरला आणि गुजरात राज्य हे हिंदुत्ववादी राजकारणाची प्रयोगशाळा ठरले. योगी आदित्यनाथ यांची नियुक्ती करून याही वेळी मोठी जोखीम उचलण्यात आली आहे; पण त्यात संघाला फायदा आहे. ताजा कलम : मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संसदेत योगी आदित्यनाथ भाषण देत होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर एका वरिष्ठ भाजपा खासदाराने माझ्याकडे वळून असे म्हटले होते की, बघा किती किती शांतपणे बोलतात ते, मला खात्री आहे एक दिवस तुम्हा सर्वांना ते आश्चर्याचा धक्का देतील, जसा मोदींनी पंतप्रधान म्हणून दिला आहे. त्या खासदाराचा बोलण्याचा रोख मला असे सुचवत होता की, आम्ही हिंदूंच्या हक्कासाठी लढणाऱ्या नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय बघत आहोत ते तथाकथित बाहेरून आलेले असले तरी शेवटी मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.- राजदीप सरदेसाई -(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
योगींचे हिंदुत्व मोदींपेक्षा काकणभर सरस ठरू शकते!
By admin | Published: March 31, 2017 12:18 AM